चमत्कार! …आणि नदी खळाळून वाहू लागली (सामना - उत्सव पुरवणी)

चमत्कार!

आणि नदी खळाळून वाहू लागली

जनता आणि प्रशासन यांनी ठरवलं तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय सध्या उत्तर प्रदेशात येत आहे. कोरडीठाक झालेली नदी चक्क खळाळून वाहू लागली आहे. मात्र, हे काही एका रात्रीत झालेलं नाही. त्यामागं गेल्या दोन वर्षांचे अथक परीश्रम आहेत. कसं घडलं हे सगळं?

भावेश ब्राह्मणकर

सर्वसाधारणपणे पर्यावरण क्षेत्रातील नकारात्मक बातम्याच प्राधान्याने समोर येतात. जसे की, प्रदूषण वाढले, हवामान बदलामुळे एवढे नुकसान झाले, दुष्काळ पडला, झाडे तोडली, जंगल नष्ट झाले, प्राण्यांची संख्या घटली वैगेरे. सकारात्मक घटना किंवा घडामोडींचे प्रमाण अतिशय नगण्य. याची विविध कारणे आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे विकास विरुद्ध पर्यावरण. मात्र, असे चित्र रंगवणे योग्य नाही. शाश्वत विकास याचाच अर्थ पर्यावरणाची काळजी घेत केलेली प्रगती अतिशय प्रभावी ठरते. विविध कारणांनी गाजणाऱ्या उत्तर प्रदेशात एक चांगली घटना घडली आहे. ती म्हणजे, मृत आणि कोरडीठाक झालेली नदी चक्क दुथडी भरून वाहू लागली आहे.


या नदीचे नाव आहे नून. यमुनेची उपनदी असलेली ही नदी खळाळत असल्याने हजारो शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा स्रोत निर्माण झाला आहे. म्हणूनच शेतकरी प्रचंड खूष आहेत. या नदीमुळे परिसरात हक्काचे पिण्याचे पाणीही उपलब्ध झाले आहे. नून नदीला २०१४ मध्ये भीषण पूर आला. ८२ किलोमीटर लांबीच्या नदीची धूप झाली. अतिक्रमणासह विविध कारणांमुळे पुराने परिसरात प्रचंड वाताहतीला तोंड द्यावे लागले. तिच्या सभोवतालची परिस्थिती आणखी बिकट झाली. शेतकरी आणि ग्रामस्थांना पाणी मिळणे दुरापास्त झाले. तसेच, नदी पात्रालगत अतिक्रमण आणखी वाढले. ही नदी चक्क नालाच बनली. अनेक ठिकाणी तर ती कोरडीठाक असल्याने तिच्या पात्रात आणखी काही उद्योग सुरू झाले. नून नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी छोटे छोटे प्रयत्न करण्यात आले. त्यास फारसे यश आले नाही. मात्र, २०२३ हे वर्ष या नदीसाठी अत्यंत महत्वाचे ठरले.

जालौन जिल्ह्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी चांदनी सिंह यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आले. प्रथेप्रमाणे शेतकऱ्यांनी निवेदन दिले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय सविस्तरपणे समजून घेतले. नून नदी कोरडी पडल्याने परिसरात किती भीषण स्थिती निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी विषद केले. शेती, रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच क्षेत्राला फटका बसू लागला आहे. गावातून शहराकडे स्थलांतराचे प्रमाण वाढत आहे. शेती ओसाड बनत आहे. आदी बाबी त्यांनी मांडल्या. त्यानंतर शेतकरी निघून गेले. जिल्हाधिकारी मात्र अस्वस्थ झाले. यासंदर्भात त्यांनी विशेष बैठक बोलावली. विविध सरकारी विभागांचे अधिकारी त्यास उपस्थित होते. नून नदी पुनरूज्जिवीत करायची असेल तर काय करायला हवे, असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी विचारला. अधिकाऱ्यांनी विविध प्रकारच्या सूचना, संकल्पना मांडल्या. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एका विशेष पथकाची स्थापना केली. नून नदी पुनरूज्जिवन कृती आराखडा तयार करण्याचे काम त्यांना दिले. या पथकाने त्यांचा अहवाल सादर केला. त्यावर सांगोपांग चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनीच विशेष रस घेतल्याने विविध विभागाचे सरकारी अधिकारीही झाडून कामाला लागले. स्थानिक ग्रामस्थ आणि विविध संघटनांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली. नदी पहिल्यासारखी वाहती होईल, त्यासाठी काय काय काय करावे लागेल याचे सविस्तर सादरीकरण खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच केले. सर्वांनी माना डोलावल्या. निश्चय झाला.

नून नदीसाठी लागणारा निधी कुठून आणि कसा उपलब्ध करायचा हा प्रश्न होता. शिवाय लोकसहभागाशिवाय हे शक्य नाही हे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पटत होते. अखेर त्यांनी मनरेगा योजनेचा हुकमी पत्ता बाहेर काढला. स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून नदीचे खोलीकरणे, अतिक्रमण काढणे, गाळ काढणे, ठिकठिकाणी बंधारे बांधणे अशा विविध पातळयांवर मनरेगाच्या माध्यमातून काम सुरू झाले. प्रारंभी वेग होता पण काही महिन्यांनी तो कमी झाला. पुन्हा आढावा बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्याला बळ दिले. आणि आता दोन वर्षांनी ही नदी पहिल्यासारखीच खळाळत आहे. वाहती नून नदी आणि त्यालगतचे हिरवे क्षेत्र याचे फोटो सोशल मिडियात सध्या खूप व्हायरल झाले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यासाठी पंचसूत्रीचा प्रभावी वापर केला. मन, कामगार, यंत्र, समर्पण आणि मनोबल. याद्वारे साध्य सिद्ध झाले आहे. पावसाळ्यात कोंच, महेवा, डाकोर या तीन गटातील गावांना नदीच्या पुरापासून दिलासा मिळाला आहे. तसेच ४७ ग्रामपंचायतींच्या २,७८० हेक्टर जमिनीला सिंचनाखाली आली आहे. नदीवर २७ ठिकाणी चेक डॅम बांधण्यात आले आहेत, जे पुरापासून संरक्षण करतानाच सिंचनासाठीही पाणी उपलब्ध करुन देत आहेत. 

नूनचा उगम महेवा भागातील सातोह गावात होतो. महेवा, कोंच, डाकोर, कडौरा या ४७ गावांमधून ८२ किमी प्रवास केल्यानंतर ही नदी शेखपूर गुढा गावाजवळ यमुना नदीला मिळते. नैसर्गिक स्रोतांमधून येणारे पाणी सिंचन आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जात असे. पाऊस कमी होऊ लागला तसे पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागले. पाण्याअभावी नदीकाठी ठिकठिकाणी अतिक्रमण झाले. नदी चक्क नाल्यासारखी झाली. २०१४ मध्ये आलेल्या पुरामुळे नदी पुन्हा जुन्या स्वरूपात आली, परंतु नदीचे पात्र सुकताच अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली.

जिल्हाधिकाऱ्यांनी या कामात स्थानिक नागरिक, शेतकरी आणि गावप्रमुखांसह सामाजिक संघटनांना सहभागी करून घेतले. संबंधित ग्रामपंचायतींच्या मनरेगा कामगारांना कामावर ठेवण्यात आले. त्यामुळे या कामासाठी अतिरिक्त निधीची व्यवस्था करावी लागली नाही. दोन हजारांहून अधिक कामगार दीड महिन्यांहून अधिक काळ कामात गुंतले होते. नदीकाठच्या जमिनीवर शेती सुरू करणाऱ्यांनी स्वेच्छेने जमीन देऊ केली.  सामूहिक कष्टाला फळ आले. नदीत पुन्हा पाणी आले आहे. जुन्या स्वरूपात ती दिसू लागल्याने अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळत आहे.

लोकसहभागाबरोबरच नून नदीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी यूएनओपीएस स्वयंसेवी संस्था आणि परमार्थ सामाजिक सेवा संस्थेने सहकार्य केले आहे. संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परीश्रम घेत नदीचा कायापालट घडवून आणला आहे. परमार्थ समाज सेवा संस्थेचे संचालक संजय सिंह म्हणतात की, ‘लोकसहभागाने आणि प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे नामशेष झालेल्या नून नदीला नवीन जीवन मिळाले आहे. यापुढेही आम्ही सर्वेक्षण आणि श्रमदानासाठी प्रयत्नशील राहू. कोरड्या नदीकडे कुणी ढुंकूनही पाहत नव्हते. आता मात्र सर्वत्र या नदीची दखल घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात नून नदीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तर, केंद्रीय जलशक्ती मंत्री स्वतंत्रदेव सिंह यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी केली आणि सक्रीय सहभाग घेतलेल्यांचे अभिनंदन केले आहे. जालौन जिल्ह्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी चांदनी सिंह यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे काम सध्याचे जिल्हाधिकारी राजेश कुमार पांडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले आहे. सिंह आणि पांडे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे मोठा कायापालट घडला आहे. केवळ ५७ लाख रुपयांच्या निधीतून नदीला पुन्हा जीवन प्राप्त झाले आहे. मात्र, इथून पुढे नदी अशीच रहावी यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. अन्यथा नून नदी पुन्हा कोरडी होण्याचा धोका आहे, असे पांडे यांनी स्थानिक ग्रामस्थांना आवर्जून सांगितले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने हरित राज्य साकारण्यासाठी एक जिल्हा एक नदी हा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत नून नदीसारखे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. जनतेने निश्चय केला आणि प्रशासनाने सतत साथ दिली तर येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात एक तरी नदी पुनरुज्जिवीत झालेली पहायला मिळेल.

--

bhavbrahma@gmail.com

पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो.
9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

Uttar Pradesh, Environment, Noon, River, Rejuvenation, Success Story, Peoples Participation, Water, 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)