अमेरिकेला भारत काय प्रत्युत्तर देणार? (नवशक्ती)
अमेरिकेला भारत काय प्रत्युत्तर देणार?
‘भारतावर महासंकट घोंघावत आहे’, असे याच स्तंभात तीन आठवड्यांपूर्वी मांडल्यानंतर आता त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. २५ टक्के आयात शुल्क आणि दंडाची घोषणा करून ट्रम्प यांनी मोठा गहजब उडवून दिला आहे.
भावेश ब्राह्मणकर
जगभरात दबदबा, धाकदपटशा निर्माण
करणारे आणि मनमानीपणा, लहरी, तामसी तसेच तर्कट म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोनाल्ड
ट्रम्प यांनी अखेर भारतीय वस्तूंवर थेट २५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली
आहे. विशेष म्हणजे ते केवळ एवढ्यावरच थांबलेले नाहीत. रशियाकडून तेल आणि लष्करी सामुग्री भारत खरेदी करीत
असल्याने वाढीव शुल्क आकारण्याचेही जाहीर करून टाकले आहे. भारत-अमेरिका व्यापार
करार शिष्टमंडळाची बोलणी अद्याप पूर्ण झालेली नाही. चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या
आहेत. सहावी फेरी ऑगस्टमध्ये प्रस्तावित आहे. अशातच ट्रम्प यांनी शुल्काचा गोळा
टाकून खळबळ उडवून दिली आहे. एवढ्यावरच हे थांबलेले नाही तर ट्रम्प यांनी एक
धक्कादायक विधान केले आहे. ते म्हणतात की, ‘अमेरिका
लवकरच पाकिस्तानबरोबर तेलसाठे विकसित करीत आहे. कदाचित एक दिवस तेथून भारताला तेल
विकले जाईल.’ तर, इराण आणि रशिया यांच्यासोबत
पेट्रोकेमिकल व्यवहार करणाऱ्या सहा भारतीय कंपन्यांना अमेरिकन परराष्ट्र
मंत्रालयाने थेट बंदी घातली आहे. यामुळे भारतातील पेट्रोकेमिकल उद्योगावर मोठा
परिणाम होणार आहे. या सर्व निर्णयांनी भारत चांगला
अडचणीत सापडला आहे.
गुरुवारी सकाळीच शेअर बाजार कोसळल्याने
गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या पडझडीनंतर आता अमेरिकेशी होणाऱ्या
व्यापारावर गंडांतर आले आहे. भारत-अमेरिकेत गेल्या वर्षी (२०२४-२५) १८६ अब्ज डॉलर
एवढा व्यापार झाला. त्यात भारतातून अमेरिकेत ८६.५ अब्ज डॉलरच्या वस्तू आणि २८.७
अब्ज डॉलरची सेवा निर्यात झाली. तर, अमेरिकेतून भारतात ४५.३ अब्ज डॉलरच्या वस्तू
आणि २५.५ अब्ज डॉलरच्या सेवा आयात करण्यात आल्या. या व्यापारात मोठी तूट आहे. भारत
अमेरिकेकडून कमी खरेदी करतो, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. भारताचा रशियासोबत मोठा
व्यापार असल्याने ट्रम्प यांचा जळफळाट होत आहे. याच स्तंभात दोन आठवड्यांपूर्वी मी
नमूद केले होते की, भारतावर महासंकट घोंघावत आहे. आणि ट्रम्प यांनी आयात शुल्क
लादण्याची घोषणा करून तसे स्पष्ट केले आहे.
युक्रेनविरूद्ध संघर्ष करणारा रशिया
सध्या ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतो आहे. रशियावर यापूर्वीच अमेरिकेने कडक निर्बंध
लादले आहेत. अमेरिकेला शिंगावर घेण्याची ताकद रशियामध्येच आहे. त्यामुळे त्याला
आणखी अडचणीत आणण्यासाठी त्याच्याशी व्यापार करणाऱ्यांवर बडगा उगारण्याचा चंग
ट्रम्प यांनी बांधला आहे. याचाच एक भाग म्हणून ‘रशिया
निर्बंध कायदा २०२५’ त्यांनी आणला आहे. हे विधेयक संमत
होण्यापूर्वीच ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५ टक्के शुल्क आकारतानाच वेगळा दंडही
करण्याचे जाहीर केले आहे. यातून भारत-रशिया व्यापारावर गंडांतर येणार आहे. एकाच
निर्णयातून ट्रम्प यांनी अनेक साध्य सिद्ध केले आहेत.
रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल घेऊन
त्यावर भारत प्रक्रिया करतो. हेच तेल युरोपिय देशांना विकतो. ट्रम्प यांच्या
निर्णयाने हा सारा व्यापारच ठप्प होण्याची शंका आहे. प्रत्यक्षात तसे झालेच तर
भारताला अमेरिकेकडून तेल खरेदी लागेल. जे कदाचित चढ्या दराचे असू शकते. तसेच, युरोपासह
विविध देशांना होणारी भारताची तेल विक्री बंद होईल. म्हणजेच भारतीय व्यवस्थेवर जणू
त्सुनामी प्रहार होणार आहे. त्याचबरोबर भारतात कच्चे तेल, पेट्रोलिअम उत्पादने, कोळसा,
कोक, विद्युत यंत्रे, पैलू पाडलेले हिरे, सोने आदी अमेरिकेतून येतात. हा
कोट्यवधींचा व्यवहारही अडचणीत सापडेल. केवळ एवढ्यावर हे थांबणार नाही. तर,
भारतातून अमेरिकेत विक्री होणारी औषधे, फॉर्म्युलेशन, बायोलॉजिकल्स, दूरसंचार उपकरणे,
मौल्यवान आणि अर्धमौल्यवान खडे, पेट्रोलिअम उत्पादने, वाहन आणि त्यांचे सुटे भाग,
सोने आणि इतर मौल्यवान धातंचे दागिने, सुती कपडे, लोखंड, पोलाद, कृषी उत्पादने महागडी
होतील. त्यामुळे अमेरिकेत त्यास उठाव राहणार नाही. परिणामी, या निर्यातीवरही भारताला
पाणी सोडावे लागेल.
अमेरिकेत व्यापार वाटाघाटी करुन
परतलेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल अत्यंत उत्साहात सांगत होते की, 'वाटाघाटीत
फँटॅस्टिक प्रगती झाली आहे.' आणि आता ट्रम्प म्हणताय
की, 'भारताशी झालेल्या वाटाघाटी निराशाजनक आहेत.' यात नेमके कोण खरे बोलते आहे? मात्र, ट्रम्प यांनी
शुल्क आणि दंडवाढीचा जो घाव घातला आहे तो भारताची वर्मी बसणार आहे. भारतावर अधिक दबाव
आणण्यासाठी ट्रम्प यांची ही खेळी असू शकते. ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या व्यापार
वाटाघाटींवर त्याचा परिणाम दिसू शकेल. ट्रम्प मुळात व्यापारी असल्याने धाकदपटशा,
इशारा किंवा भोकाडा पसरवून ते समोरच्याला गुडघे टेकायला लावतात. भारताबाबतीतही
त्यांनी तीच खेळी खेळली आहे.
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
अमेरिकन निवडणुकीत ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ असा नारा दिला. आता तेच ट्रम्प मोदींसोबतच्या मैत्रीला जागत नसल्याचे
स्पष्ट होते. त्याचबरोबर भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानला अधिकाधिक ते जवळ करत
आहेत. पाक लष्कर प्रमुख मुनीर यांच्या खासगी अमेरिकन दौऱ्यात ट्रम्प त्यांच्यासोबत
जेवण करतात. आता तर पाकसोबत पेट्रोलिअम कंपनी स्थापून त्यातील पेट्रोल भारताला
विक्री करण्याचे बोलून दाखवतात. भारत-पाक यांच्यातील ‘ऑपरेशन
सिंदूर’ मीच थांबविले, त्यासाठी व्यापार बंदीचा धाक दाखवला,
असे ट्रम्प जगजाहीरपणे जवळपास एक दिवसाआड बोलत आहेत. हे सारेच चिंताजनक आहे.
रशियाने भारताला संकट काळात अनेकदा
साथ दिली आहे. संरक्षण सामग्री, तंत्रज्ञान, कच्चेतेल आणि अन्य बाबतीतही आजवर
त्याची मोठी मदत झाली आहे. याउलट अमेरिकेने भारताला अडचणीतच आणले आहे. तसेच, संकटसमयी
अमेरिकेने मदतीचा हात तर पुढे केलाच नाही पण भारताचे संकट अधिक गहिरे कसे होईल हेच
पाहिले आहे. इस्रोमध्ये हनीट्रॅप झाल्याचा कांगावा हा अमेरिकेच्या सीआयए या
गुप्तहेर संस्थेचाच कट होता. याद्वारे भारताची क्रायोजेनिक इंजिन निर्मिती आणि अवकाशात
उपग्रह पाठविण्याची योजना अनेक वर्षे पुढे ढकलली गेली. त्यानंतर अणू चाचणीवरुन
अमेरिकेने भारतावर अनेक कडक निर्बंध लादले. आता भारताला पाचव्या पिढीचे स्वदेशी
तेजस हे लढाऊ विमान उपलब्ध होऊ नये याचा धूर्त डाव टाकला आहे. या विमानांसाठी
इंजिन पुरवण्याचा करार अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक्स कंपनीसोबत भारताने केला आहे.
मात्र, ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून इंजिनच देत नाहीय. आता मिग २१ विमाने
भारतीय वायूसेनेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्याजागी नवी विमाने भारताकडे नाहीत. खरं
तर ती येऊच नयेत यासाठी अमेरिकेने षडयंत्र रचले आहे.
ट्रम्प यांना युक्रेनचे दुःख दिसते पण
इस्राईलकडून गाझात होणारा नरसंहार नाही. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकला ते अधिक
गोंजारत आहेत. अमेरिकेकडून ज्या पद्धतीने
भारताला अधिकाधिक कात्रीत पकडण्याची खेळी केली जात आहे. त्यातुलनेत भारताकडून फारसे
प्रभावी प्रत्युत्तर दिले जात नाहीय. संसदेत खुले आव्हान मिळूनही पंतप्रधान मोदींनी
ट्रम्प यांचे साधे नावही उच्चारले नाही. आता तर त्यांच्या मित्रानेच घात करत आयात
शुल्क आणि जबर दंडाचा वरवंटा फिरवण्याचा पवित्रा घेतला आहे. व्यापार शुल्कावरुन भारत
उघडपणे चीनसारखा थेट अमेरिकेशी पंगा घेणार नाही. पण, यानिमित्ताने भारताच्या परराष्ट्र
धोरण आणि मुत्सद्देगिरीची खरी कसोटी आता लागणार आहे, हे मात्र नक्की.
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र
संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
India, USA, Trade, Import, Export, Duty, War, Tariff, Penalty, America, Donald Trump,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा