सिंह गर्जना खरोखरच वाढणार? (साप्ताहिक सकाळ)

सिंह गर्जना खरोखरच वाढणार?
गुजरातमध्ये आशियाई सिंहांची संख्या ८९१ पर्यंत वाढल्याचे समोर आले आहे. पाच वर्षांपूर्वी गुजरातमध्ये ६७४ सिंह होते. म्हणजेच, अर्ध दशकात २१७ सिंह वाढले आहेत. ही वाढीव संख्या आनंद साजरे करण्यासारखी आहे का? प्रत्यक्षात सिंह गर्जना नक्कीच वाढेल का? सिंहांची ही आकडेवारी चिंता करायला लावणारी बनली आहे का? या सर्वाचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

भावेश ब्राह्मणकर

गुजरात सरकारच्या नोंदीनुसार, पहिली सिंह गणना १९३६ मध्ये जुनागढच्या नवाबाने केली होती. १९६५ मध्ये गीर अभ्यारण्याची घोषणा करण्यात आली. सिंहासाठीचे हे स्वतंत्र अभयारण्य ठरले. त्यानंतर सिंह गणना सुरू करण्यात आली. आशियाई सिंहांची कमी होणारी संख्या लक्षात घेता दर ५ वर्षांनी सिंह गणना करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार ती केली जाते. यंदाची गणना ही सोळावी आहे.

सिंह प्रकल्प
२०२० मध्ये ७४ वा स्वातंत्र्यदिन देशात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंहांच्या दीर्घकालीन संवर्धन आणि संरक्षणावर लक्ष केंद्रित करणारा सिंह प्रकल्प (प्रोजेक्ट लायन) सुरू केला. त्यासाठी २९२७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या प्रकल्पाची  अंमलबजावणी सध्या केली जात आहे. त्यामुळे सिंहांची संख्या वाढत असल्याचा दावा गुजरात सरकारने केला आहे. तसेच, गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत सिंह प्रकल्पाचा २०४७ पर्यंतचा कृती आराखडा सादर करण्यात आला.

हे सर्वाधिक चिंतेचे
यंदाच्या गणनेतून अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. भावनगर जिल्ह्यात एकाच कळपात सर्वाधिक १७ सिंह आढळून आले आहेत. जुनागड आणि अमरेली जिल्ह्यातील गीर राष्ट्रीय उद्यान व वन्यजीव अभयारण्यांपुरते सिंह मर्यादित राहिलेले नाहीत. ते आता ११ जिल्ह्यांमध्ये दिसतात. वन नसलेल्या आणि किनारी क्षेत्रातही सिंहांचा अधिवास आहे. सिंहांच्या विस्ताराचा ट्रेंड वाढतो आहे. अभयारण्यातील सिंहांची संख्या ३८४ तर अभयारण्याबाहेरील सिंहांची संख्या ५०७ एवढी नोंदली गेली आहे. म्हणजेच मुख्य संरक्षित क्षेत्राच्या बाहेर सिंहांची संख्या अधिक आहे. यामुळे मानवी वस्त्यांशी जवळीक वाढण्याची आणि संघर्ष होण्याची शक्यता वाढते आहे. एका अहवालानुसार, सिंहांकडून जनावरांवर हल्ले होणाऱ्या गावांची संख्या दरवर्षी १० टक्क्याने वाढते आहे तर प्रत्येक गावात मृत्युमुखी पडणाऱ्या पशुधनाची संख्या दरवर्षी १५ टक्क्याने वाढली आहे. मानव-वन्यजीव संघर्ष वाढतो आहे. आणि हेच चिंतेचे कारण आहे.

अधिवास तेवढाच
सिंहांची संख्या वाढत असली तरी त्यांचा अधिवास तेवढाच आहे. त्यामुळे त्यांना पुरेसे भक्ष्य मिळेल का? जर नाही मिळाले तर सिंहांमध्येच संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. यामुळे सिंहांची संख्या घटू शकते.

शिकाऱ्यांना आवतण
सिंहांची संख्या सातत्याने वाढत असल्याने शिकाऱ्यांना जणू प्रोत्साहन मिळते. सिंहांच्या अधिवास क्षेत्रात त्यांची सक्रीयता वाढते. त्यामुळे शिकार रोखण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे.

मानव वन्यजीव संघर्षात वाढ
अभयारण्य सुरक्षित असले तरी मानव व प्राणी संघर्ष खदखदतोच आहे. तो अद्याप सोडविण्यात यश आलेले नाही. बफर झोन किंवा त्याबाहेरच्या परिसरात असलेली वृक्षतोड, अतिक्रमण हा प्रश्नही कळीचा आहे. अभयारण्य परिसरातील घरांचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. 

कॉरिडॉर असुरक्षित
एका अधिवासातून दुसऱ्या अधिवासात जाण्यासाठी सिंह ज्या मार्गाचा वापर करतात त्याला कॉरिडॉर असे म्हणतात. सद्यस्थितीत हे कॉरिडॉर विविध प्रकारच्या समस्यांनी वेढले गेले आहेत. पाणी, धरण, महामार्ग, वाहतूक, खाणी, ऊर्जा अशा विविध पायाभूत सोयी-सुविधा प्रकल्पांमुळे कॉरिडॉर  अडचणीत सापडले आहेत. मानवी हस्तक्षेप वाढला आहे. प्रकल्पांमध्ये सिंह  सुरक्षित असले तरी ते जेव्हा या कॉरिडॉवर येतात तेव्हा ते अत्यंत असुरक्षित असतात. त्यामुळेच त्यांची शिकार होण्यापासून विविध कारणांनी त्यांचा बळी जातो. दिवसेंदिवस कॉरिडॉरची असुरक्षितता वाढतेच आहे.

पर्यटकांचा हैदोस
गेल्या काही वर्षात वन आणि अभयारण्यात पर्यटन वाढले आहे. वनविभागाचे नियम पायदळी तुडविण्याचे प्रकारही सर्रास घडतात. खासकरुन फोटो, सेल्फी आणि रिल्ससाठी सिंहांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न पर्यटक करतात. यामुळे सिंहांमध्ये असुरक्षेची भावना तयार होते. अभ्यारण्याच्या अत्यंत आतल्या भागात पर्यटकांना नेणे, जिप्सीसह अन्य वाहनांचा वावर सिंहांच्या जगण्यावर निर्बंध आणत आहेत. याला लगाम घालणे आवश्यक आहे.

हॉटेल्सचा सुळसुळाट
पर्यटन वाढत असल्याने अभयारण्य आणि कॉरिडॉरलगत किंवा त्याच्या आतल्या भागात हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू करण्याचा आग्रह धरला जातो. काही ठिकाणी तसे झालेही आहे. यामुळे वन्यजीवांचा अधिकाधिक जवळ किंवा आसपास जाण्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे. यातून सिंहच नाही तर त्यांचे भक्ष्यही असुरक्षित बनले आहे. भक्ष्य घटले तर त्याचा परिणाम सिंहांवर होणार आहे.

स्थानिकांना विश्वासात घेणे
सिंहांचा वावर असलेल्या भागातील स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्यांना जर सिंहांचा जाच किंवा त्रास वाटू लागला तर स्वसंरक्षणासाठी ते त्यांचा जीव घेऊ शकतात. तसेच, त्यांच्या प्रकल्पाला विरोध करु शकतात. त्यामुळे स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांच्या सूचना लक्षात घेणे, वन कर्मचारी व अधिकाऱ्यांबरोबर त्यांचा सुसंवाद असणे, स्थानिकांकडून विविध प्रकारची माहिती वारंवार मिळणे, लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे. स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतला जाणार नाही याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच, पर्यटनातून स्थानिकांच्या हाताला काम मिळाले तर तेच अधिक जबाबदारी वागतील.

वनविभागाची सज्जता
केवळ अभयारण्य किंवा गीर राष्ट्रीय उद्यानात वन कर्मचाऱ्यांची उपस्थिती असता कामा नये. सिंहांचे कॉरिडॉर आणि त्यांचा वावर असलेल्या भागात वन कर्मचारी तैनात असायला हवेत. दिवसा आणि रात्रीही त्यांचा पहारा असला तर त्याने वचक निर्माण होतो. शिकार, वृक्षतोड, वनहस्तक्षेप या साऱ्यांना सहाजिकच आळा बसतो. सिंहांच्या पर्यटनातून मिळणारा महसूल हा त्यांच्या संरक्षणावर खर्च करायला हवा. त्यासाठी वन कर्मचाऱ्यांची संख्याही मुबलक असायला हवी. वन कर्मचाऱ्यांकडे पेट्रोलिंगसाठी इलेक्ट्रिक वाहने, शस्त्रास्त्रे, संपर्कासाठी मोबाईल्स किंवा वॉकीटॉकी आदी यंत्रणा असेल तर त्याचा नक्कीच फायदा होईल.

यंदाच्या गणनेची वैशिष्ट्ये
-    १० ते १३ मे दरम्यान दोन टप्प्यात
- ११ जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांमध्ये ३५,००० चौरस किलोमीटर क्षेत्रावर
- प्राथमिक मोजणी १० आणि ११ मे रोजी
- अंतिम मोजणी १२ आणि १३ मे रोजी
- ,००० हून अधिक स्वयंसेवक, प्रादेशिक, विभागीय आणि उपविभागीय  अधिकारी, प्रगणक, सहाय्यक प्रगणक आणि निरीक्षक, सरपंच, स्थानिक नागरिक आदींचा सहभाग 
- अचूकतेसाठी 'डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन' तंत्राचा वापर
- सिंहांची वेळ, दिशा, लिंग, वय, शरीरावरील विशेष खुणा आणि जीपीएस स्थान आदी माहिती रेकॉर्ड
- कॅमेरा ट्रॅप, उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे आणि रेडिओ कॉलर यासारख्या तांत्रिक साधनांचा वापर
- रिअल-टाइम ट्रॅकिंगसह त्रि-स्तरीय गणना पद्धतीचा अवलंब

या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य
जुनागड, गीर सोमनाथ, भावनगर, राजकोट, मोरबी, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका, जामनगर, अमरेली, पोरबंदर आणि बोताड या ११ जिल्ह्यांमध्ये सिंहांचे वास्तव्य आहे. हे सर्व जिल्हे गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात आहेत.

सिंह अभयारण्य
गीर, पानिया, मितियाला, बार्डा, गिरनार
एकूण जिल्हे - ११
एकूण तालुके - ५८
क्षेत्र - ३५,००० चौरस किलोमीटर
गणना - दर पाच वर्षांनी
यंदाची गणना – सोळावी

आकडे बोलतात
वर्ष  - सिंहांची संख्या
२०२० -  ६७४
२०२५  - ८९१
२०१५ - ५२३
२०१० – ४११
२००५ – ३५९
२००१ – ३२७
१९९५ – ३०४
१९९० – २८४
१९८५ – २३९
१९७९ – २०५
१९७४ – १८०
१९६८ – १७७
१९६० -  २००

कुठे, कसे वाढले?
ठिकाण – २०१५ – २०२० – २०२५
गीर उद्यान, पानिया अभयारण्य आणि परिसर – ३१५ – ३४४ – ३९४
गिरणार अभयारण्य – ३३ – ५६ – ५४
मितियाला अभयारण्य – ८ – १६ – ३२
सावरकुंडला अभ्यारण्य, लिलिया व परिसर – ८० – ९८ – १२५
भावनगर – ३७ – ५६ – १०३
दक्षिण पूर्व किनारा – १८ – ६७ – ९४
दक्षिण पश्चिम किनारा – ३२ – २० – २५
भावनगर किनारा – ० – १७ – १५
बार्डा अभयारण्य – ० – ० – १७
जेतपूर – ० – ० – ६
बाबरा-जेसदान – ० – ० – ४
कॉरिडॉर – ० – ० – २२
एकूण – ५२३ – ६७४ – ८९१

असे आहेत सध्याचे सिंह
सिंह - १९६
सिंहीण - ३३०
तरुण सिंह - १४०
छावा – २२५
अभयारण्यातील सिंहांची संख्या - ३८४
अभयारण्याबाहेरील सिंहांची संख्या – ५०७

सातत्यपूर्ण व समर्पित प्रयत्न - भूपेंद्र पटेल, मुख्यमंत्री
सिंहांच्या संख्येत झालेली वाढ ही केवळ अनुकूल भौगोलिक आणि हवामान परिस्थितीमुळेच नाही तर वन्यजीव संवर्धनासाठी राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण आणि समर्पित प्रयत्नांमुळे देखील झाली आहे

रेडिओ कॉलरही लावले - मुलुभाई बेरा, वनमंत्री
वैयक्तिक सिंहांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रे घेण्यात आली. त्यासाठी डिजिटल कॅमेरे आणि कॅमेरा ट्रॅपचा वापर करण्यात आला. काही सिंहांना त्यांच्या आणि त्यांच्या गटांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेडिओ कॉलरही बसवण्यात आले.

अचूकतेसाठी ही काळजी - संजीव कुमार, प्रधान सचिव, वन आणि पर्यावरण
सिंह गणनेसाठी ई-गुजफॉरेस्ट अॅप्लिकेशनचा वापर करण्यात आला. सिंह निरीक्षणांच्या रिअल-टाइम डेटा एंट्रीसाठी तो उपयुक्त ठरला. ज्यामध्ये जीपीएस स्थाने व छायाचित्रे अचूकता आणि कार्यक्षमता दोन्ही वाढवतात.

कृत्रिम प्रज्ञेचा वापर - डॉ. ए.पी. सिंह, प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वन दल प्रमुख
सिंह गणनेसाठी जीआयएस सॉफ्टवेअरप्रणाली वापरण्यात आली. यामुळे सिंहांच्या हालचाली, वितरण पद्धती आणि अधिवास वापराचे निरीक्षण करण्यात आले. याद्वारे सर्वेक्षण क्षेत्रे स्पष्ट करण्यात आणि तपशीलवार नकाशे तयार करण्यात मदत झाली. याव्यतिरिक्त, छायाचित्रांमधून वैयक्तिक सिंह ओळखण्यासाठी आवश्यकतेनुसार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम प्रज्ञा (एआय) आधारित सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला.
--
bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348

माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

Environment, Wildlife, Lion, Census, Report, Gujrat, Gir, Forest, Count, 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)