लढाऊ पंख ते डिफेन्स हब (साप्ताहिक सकाळ)
लढाऊ पंख ते डिफेन्स हब
देशाच्या संरक्षण क्षेत्रात नाशिकचे योगदान अतुलनीय आहे. लढाऊ विमानांच्या निर्मितीमुळे नाशिक संरक्षणाच्या नकाशावर आले. आता तर नाशिकची वाटचाल डिफेन्स हब अशी होत आहे.
भावेश ब्राह्मणकर
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत
काम करणाऱ्या हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या ओझर येथील कारखान्यात
लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाते. याच कारखान्यात उत्पादित होणाऱ्या विमानांना
लागणारे असंख्य सुटे भाग नाशिकमधील संरक्षण उद्योगांकडून पुरविले जातात. अधिकाधिक
सुटे भाग पुरवावेत यासाठी एचएएलकडून खासगी उद्योजकांना आवाहन केले जात आहे.
आणखी १२ सुखोई विमानांचे उत्पादन
भारत सरकारने रशियन सरकारसोबत करार केल्यानंतर ओझर येथे मिग आणि सुखोई या लढाऊ
विमानांची निर्मिती करण्यात आली. याच केंद्रात आता १२ सुखोई ३० एमकेआय लढाऊ
विमानांचे उत्पादनांच्या निर्मितीसाठी १३,५०० रुपयांचे कंत्राट देण्यात आले ही
विमाने स्वदेशी बनावटीची आहेत. त्यांना लागणारे सुटे भाग नाशिकच्या संरक्षण
उद्योगांकडूनच खरेदी केले जात आहेत.
तेजस विमानांसाठी नवे केंद्र
तेजस या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानांची निर्मिती ओझरमध्ये केली जात आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. एकूण ८३ तेजस विमानांच्या उत्पादनासाठी ४५,४६८ कोटी रुपयांचा करार झाला. मोठ्या गतीने येथे काम सुरू आहे. येत्या काही महिन्यात पहिले तेजस विमान हवाई दलाकडे सुपूर्द केले जाणार आहे. या विमानासाठीसाठीचे सुटे भागही नाशिकच्या खासगी उद्योगांकडून पुरविले जात आहेत.
प्रशिक्षण विमानांचेही उत्पादन
हवाई दलाच्यावतीने लढाऊ विमानांच्या पायलटला एकूण तीन प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात एचटीटी ४० या विमानाचा समावेश आहे. हे विमान पूर्णपणे एचएएलने विकसित केले आहे. ओझऱ एचएलला एचटीटी ४० या विमानांच्या उत्पादनांचे काम मिळाले आहे. ६,८२८ कोटी रुपयांच्या या ऑर्डरद्वारे एकूण ८० विमानांचे उत्पादन सध्या केले जात आहे.
२५०हून अधिक उद्योग
संरक्षण क्षेत्राला आवश्यक सुटे भाग पुरविणाऱ्या
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा नाशिकमध्ये उत्तम जम बसला आहे. नाशकातील सातपूर
आणि अंबड, सिन्नरमधील मुसळगाव आणि माळेगाव या औद्योगिक वसाहतींसह मुंबई-आग्रा
महामार्गावरील गोंदे आणि वाडीवऱ्हे या परिसरात संरक्षण उद्योग कार्यरत आहेत. या
उद्योगांची संख्या आता २५०च्या वर गेली आहे.
नौदलालाही पुरवठा
नाशिकच्या खासगी संरक्षण उद्योगांकडून भारतीय हवाई दल आणि नौदल यांनाही सुट्या
भागांचा पुरवठा होतो. हवाई दलाचे ओझर तर नौदलाचे गोव्यात लढाऊ विमान देखभाल,
दुरुस्ती केंद्र आहे. या केंद्रातील सुखोई आणि मिग विमानांसाठी नाशकातून सुटे भाग
पुरविले जातात.
या सुट्या भागांचा
लढाऊ विमानांसाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटस, फायबर,
रोबोटिक्स, मेकॅनिकल आदी सुट्या भागांचा पुरवठा नाशिकमधील उद्योगांकडून होतो.
पुढील अनेक वर्षे उत्पादन
ओझर एचएएलकडे सध्या तेजस, सुखोई ३० एमकेआय आणि एचटीटी या विमानांच्या निर्मितीची
कोट्यवधी रुपयांची ऑर्डर आहे. पुढील किमान दहा वर्षे तरी ही काम सुरू राहणार आहे.
तर, सुखोई आणि मिग या विमानांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम ओझर एचएएल, हवाई दल आणि
नौदल यांच्याकडे सुरूच राहणार आहे. विशेष म्हणजे, जुन्या लढाऊ विमानांचे
अद्ययावतीकरणही या केंद्रांमध्ये केले जाते. त्यामुळे लढाऊ विमानांसाठी लागणाऱ्या
सुट्या भागांचा पुरवठा करण्याची सुवर्णसंधी नाशिकच्या संरक्षण उद्योगांना लाभली
आहे.
पुणे, मुंबई, अहिल्यानगर
नाशिकमधील संरक्षण उद्योगांकडून अहिल्यानगर आणि पुणे येथे असलेल्या संरक्षण
उत्पादनांच्या कंपन्यांना सुट्या भागांचा पुरवठा केला जातो. पुण्यामध्ये संरक्षण
आणि विकास संशोधन संस्था (डीआरडीओ) आहे. तर, विविध संरक्षण उत्पादने निर्मिती
करणारे खासगी उद्योग पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि अहिल्यानगर येथे कार्यरत आहेत.
त्यांच्या आवश्यकतेनुसार, नाशिकमधील संरक्षण उद्योग विविध सुटे भाग पुरवित आहेत.
डिफेन्स इनोव्हेशन हब
देशातील दुसरे डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकमध्ये घोषित
झाले आहे. हे हब
विकसित झाल्यास नाशिकच्या औद्योगिक विकासाला मोठी
चालना मिळेल. या हबच्या विस्तृत प्रकल्प अहवालात (डीपीआर) नाशिक परिसरात कुठले
संरक्षण उद्योग आहेत, त्यांना नक्की काय
मदत हवी आहे, कुठल्या सुविधा हव्या आहेत, येथे संरक्षण उद्योगवाढीसाठी काय उपाययोजना करायच्या आहेत हे स्पष्ट होईल.
एचएएल आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बेल) या सरकारी कंपन्यांची नोडल एजन्सी
म्हणून नेमणूक आहे. या हबद्वारे खासगी उद्योगांना संशोधन व विकासासाठी अधिकाधिक
प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांची उत्पादने खरेदी केली जातील. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता, संशोधनाचे
पेटंट मिळण्यासंदर्भातील मदत, उत्पादनांच्या निर्यातीला चालना दिली जाईल. लष्कर,
हवाईदल आणि नौदलाला नक्की काय हवे आहे हे उद्योगांना सांगितले जाईल.
आयात घटवून देशांतर्गत भागात उत्पादनांच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. यातून
नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येईल आणि रोजगाराचीही
मोठी निर्मिती होईल.
नाशकातील महत्त्वाची संरक्षण केंद्रे
१. कॅट
नाशकातील कम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग सेंटर (कॅट) येथे लष्कराकडील हेलिकॉप्टर्स वैमानिकांना
प्रशिक्षण दिले जाते. भारतातील हे एकमेव केंद्र आहे. येथे दरवर्षी शंभराहून अधिक वैमानिक
प्रशिक्षीत होतात.
२. तोफखाना केंद्र
देवळाली कॅम्प परिसरात भारतीय लष्कराचे तोफखाना
केंद्र आहे. लष्कराकडील तोफा हाताळणी, अचूक लक्ष्य भेदणे आदींचे प्रशिक्षण
जवानांना या केंद्रात दिले जाते. देशातील हे सुद्धा एकमेव केंद्र आहे.
३. डीआरडीओ केंद्र
भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)चे केंद्र ओझर येथील एचएएललगत
आहे. संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या विविध शस्त्रास्त्रे, उत्पादनांबाबत या
केंद्रामध्ये संशोधन केले जाते.
४. तोफखाना संग्रहालय
वडनेर गेट येथे लष्कराने अत्याधुनिक तोफखाना संग्रहालय साकारले आहे. आशिया खंडातील
हे एकमेव आहे. आजवर जगभरामध्ये वापरण्यात आलेल्या तोफा, त्यांची वैशिष्ट्ये,
त्यांचा इतिहास आदींची माहिती येथे मिळते. विविध तोफा येथे प्रत्यक्ष पहायला
मिळतात.
५. बोरगड हवाई दल केंद्र
हवाई दलाचे सिग्नलिंग युनिट येथे आहे. अत्याधुनिक रडारद्वारे देशाच्या पश्चिम
भागाच्या हवाई क्षेत्रावर नजर ठेवली जाते.
--
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र
संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348
--
Nashik, Defence, Hub, Establishments, Trade, Business, Security, Production, HAL, Fighter, Aircraft, Sukhoi,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा