ट्रम्प यांचं करायचं काय? (नवशक्ती)

ट्रम्प यांचं नेमकं चाललंय काय?

डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील चर्चेचा (खरं तर वादावादीचा) व्हिडिओ जगभरात तुफान व्हायरल झाला आहे. त्यावर जोरदार टीका-टीपण्णी सुरू आहे. तसेच, येत्या २ एप्रिलपासून भारत व चीन या देशांसाठी जशास तसे कर धोरण लागू केले जाणार आहे. महासत्तेचे सर्वेसर्वा असलेल्या ट्रम्प यांचं नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न यानिमित्ताने अनेकांना पडत आहे.

भावेश ब्राह्मणकर

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभर खळबळ उडवून दिली आहे. त्यांची विविध वक्तव्ये असो की कृती साऱ्यालाच अफाट प्रसिद्ध मिळते. भारतासारख्या देशातही ट्रम्प तुफान लोकप्रिय आहेत. आज त्यांनी काय निर्णय घेतला किंवा काय केले हे जाणून घेण्यासाठी सर्वसामान्यही उत्सुक असतात. आता निमित्त आहे ते ट्रम्प यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे. ट्रम्प आणि अमेरिकन उपाध्यक्ष जी डी व्हान्स यांच्यासमवेत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की या व्हिडिओते आहेत. राजनैतिक बैठकीतच प्रसारमाध्यमांचे कॅमेरे असल्याने या मान्यवरांमध्ये काय संभाषण होते हे चित्रीत झाले. ट्रम्प आणि व्हान्स यांनी झेलेन्स्की यांच्याशी अवमानजनक भाषेत संवाद साधला. युद्धग्रस्त देशाच्या प्रमुखांनी सर्वाधिक बलाढ्य देशाच्या अध्यक्षांसमोर नमते घेतले नाही, आपले म्हणणे ठामपणे आणि शांततेत मांडले हे सुद्धा यातून दिसून आले. याउलट ट्रम्प आणि व्हान्स यांची अपरिपक्वताही स्पष्ट झाली. राजनैतिक शिष्टाचाराचे नियम डावलून अक्षरशः जसे काही कट्ट्यावरील मित्रांच्या गप्पा सुरू असल्याचा हा प्रकार जगभर चर्चेचा बनला. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडून अशा प्रकारची चूक होणे हेच कल्पनातीत. हा व्हिडिओ मराठीसह जगभरातील अनेक भाषांमध्ये डब केला गेला. कुणी शेतीच्या वादाची बोलणी तर कुणी मित्रांचा रंगलेला फड दाखवून या व्हिडिओद्वारे कोट्यवधी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. असो.

यानिमित्ताने ट्रम्प यांचा कारभार, शैली, बोलणे, वागणे, स्वभाव, विचार हे सारेच चर्चा आणि टीकेचेही बनले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर कब्जा करण्यासाठी युद्ध छेडले. त्यास आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत. युक्रेनसोबतचे करार पुतिन यांनी लाथाडले. याची दखल घेत अमेरिकेने रशियावर असंख्य निर्बंध लादले. युरोपातील देशही रशियाच्या विरोधात उभे ठाकले. असे असताना ट्रम्प यांनी चक्क पुतिन यांची बाजू घेऊन हे युद्ध थांबविण्याचे सूतोवाच केले. त्यासाठी रशिया आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींची आखातात बोलणीही झाली. विशेष म्हणजे, ज्या देशावर आक्रमण झाले त्यांचा प्रतिनिधी त्यात नव्हता. त्यामुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. एवढेच करुन ट्रम्प थांबले नाही, तर हे युद्ध युक्रेनच्या झेलेन्स्की यांनी सुरू केल्याचा आरोपही केला. युक्रेनला आम्ही आजवर भरपूर मदत केली. आता त्यांनी तेथील खनिजे आम्हाला द्यावीत. अन्यथा आम्ही मदत बंद करु, असा इशारा दिला. यासाठी करार करण्याचेही त्यांनी सूचित केले. त्याची दखल घेत झेलेन्स्की अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये आले आणि जे काय घडले त्याचा व्हिडिओ सर्वांसमोर आहे. कराराविनाच झेलेन्स्की तेथून परतले. अमेरिकेचे आभार मानतानाच इथून पुढे सहकार्य मिळेल, अशी आशा व्यक्त केली. पण, ट्रम्प यांनी युक्रेनची सर्व मदत रोखण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व प्रकारामुळे ट्रम्प यांच्याकडे बघण्याचा सर्वांचाच दृष्टीकोन बदलला आहे, बदलत आहे.

ट्रम्प यांना अचानक अण्वस्त्र नियंत्रणाचा पुळका आला आहे. म्हणूनच त्यांनी रशियाशी जवळीक साधण्यास प्रारंभ केला आहे. लवकरच ते रशिया किंवा पुतिन हे अमेरिका दौरा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जे कधी घडले नाही ते घडण्याचे संकेत यातून मिळत आहेत. यापूर्वीही अण्वस्त्र नियंत्रण आणि बंदी याचे प्रयत्न झाले. मात्र, आपण बाळगायचे, इतरांनी नाही या धोरणामुळे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. आताही त्याला यश येईल का? हे मोठे कोडेच आहे. मात्र, ट्रम्प त्यासाठी काय काय करतात यावर ते अवलंबून आहे. दरडावणे, धमकावणे यापलिकडे जर त्यांनी काही देशांना खिंडीत गाठले तर कदाचित नाईलाजास्तव अण्वस्त्र नियंत्रणाला चालना मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे, अमेरिका विरुद्ध सर्व देश असे चित्र नजिकच्या काळात निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कारण, सद्यस्थितीत अमेरिका विरुद्ध युरोप असे काहीसे वातावरण तयार झाले आहे. अशा प्रकारे तिसऱ्या महायुद्धाच्या ठिणग्या उडण्यास प्रारंभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जशास तसे कराचा फेरा
येत्या २ एप्रिलपासून भारत आणि चीन या देशांवर जशास तसे (रेसिप्रोकल) कर लागू करण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिले आहेत. चीनने अमेरिकन उत्पादनांवर १५ टक्के कर लागू करतानाच जागतिक व्यापार संघटनेकडे अमेरिकेविरोधात खटला दाखल करण्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकावारी आणि ट्रम्प भेट फलद्रुप झालेली नाही. ट्रम्प यांनी रेसिप्रोकलचे गिफ्ट भारताला दिले आहे. ते एप्रिल फुल ठरण्याची किंचितही शक्यता नाही. या निर्णयामुळे भारताच्या अडचणी प्रचंड वाढणार आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी घसरण्याची चिन्हे आहेत. कर वाढल्याने भारतीय वस्तू, उत्पादने अमेरिकेत महागतील. परिणामी, त्यांना उठाव राहणार नाही. शिवाय अमेरिकन उत्पादनांवरील कर भारताने कमी केल्यास अर्थिक झळही सहन करावी लागणार आहे. एवढ्यावरच हे संकट थांबणार नाही तर पहिला आणि थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर होणार आहे. सेन्सेक्स कोसळण्याची भीती आहे. यातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लाखो जणांचे मोठे नुकसान होणार आहे. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या जीवनावश्यक उत्पादनांवर भारताने कमी कर आकारला आहे. तर, हार्डले डेव्हिडसन सारख्या महागड्या बाईकवर अधिक कर आहे. मात्र, जशास तसे करामुळे हे सारे गणित बिघडणार आहे. फार्मा, ऑटोमोबाईल, इंधन, आयटी, धातू अशा विविध क्षेत्रात भारताला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेचा भारताबरोबर वस्तूंचा व्यापार १२९.२ अब्ज डॉलर एवढा होता. तर, भारताची अमेरिकेतील निर्यात ८७.४ अब्ज डॉलर एवढी होती. अमेरिकेची भारतातील निर्यात ४१.८ अब्ज डॉलर एवढी होती. तर, अमेरिकेची भारताबरोबरच्या व्यापारातील तूट ४५.७ अब्ज डॉलर एवढी आहे. हे आकडेच खुप काही बोलत आहेत. अमेरिकेच्या या धोरणाविरोधात भारत जागतिक व्यापार संघटनेकडे धाव घेणार का, हे महत्वाचे आहे. ट्रम्प यांचा स्वभाव आणि त्यांची वक्तव्ये पाहता ते या धोरणात नरमाईची भूमिका घेतील याची शक्यता कमीच आहे. अशावेळी भारताचा पवित्रा काय राहणार हे सुद्धा महत्वाचे आहे. तेजस या लढाऊ विमानाचे इंजिन तसेच अन्य संरक्षण उत्पादनांसाठी भारताची मदार अमेरिकेवर आहे. तसेच, अन्य क्षेत्रही आहेत. त्यामुळे अमेरिकन तंत्रज्ञान, उत्पादने ही भारताची गरज आहे. तर, भारतीय उत्पादनांसाठी अमेरिकन बाजारपेठही अनन्यसाधारण आहे. ट्रम्प यांच्या अन्य निर्णयांचेही परिणाम भारतावर होऊ घातले आहेत. या सर्वातून तोंडगा काढण्यात मोदी आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा कस लागणार हे मात्र नक्की

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

USA, America, Donald Trump, India, Reciprocal Tax, Export, Import, Trade,  Business,  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)