कृत्रिम प्रज्ञेच्या वावटळात जग! (नवशक्ती)

कृत्रिम प्रज्ञेच्या वावटळात जग!

फ्रान्समधील कृत्रिम प्रज्ञा परिषद... एलन मस्क यांना हवे असलेले चॅटजीपीटी... सॅम अल्टमनचा मस्कला जबर टोला... ५०० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीतून स्टारगेट कंपनीची ट्रम्प यांची घोषणा...अशा प्रकारे कृत्रिम प्रज्ञेच्या वावटळाने जग प्रभावित झाले आहे. आता पुढे काय?

भावेश ब्राह्मणकर

गेल्या आठवड्याभरात जगभर ज्या वेगवान घडामोडी घडल्या त्या कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या भोवतीच होत्या. त्यामुळे त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. तसे पाहता आता कुठे कृत्रिम प्रज्ञेचा शिरकाव विविध क्षेत्रात होत आहे. त्याचवेळी वावटळ उठणे स्वाभाविक आहे. ८० ते ९०च्या दशकात असेच वावटळ आले ते कॉम्प्युटरचे. मात्र, कृत्रिम प्रज्ञा जगभर नक्की काय काय घडवेल याचा अंदाज जाणकारांनाही येईनासा झाला आहे. त्यामुळे सध्या घडलेल्या घडामोडींकडे बारकाईने पाहणे आवश्यक आहे.

फ्रान्समध्ये कृत्रिम प्रज्ञेची जागतिक परिषद संपन्न झाली. भारत हा सहआयोजक होता. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास हजेरी लावली. तर, अनेक देशांचे उपाध्यक्ष, नेते, महत्वाचे मंत्री, कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विख्यात कंपन्यांचे प्रमुख, जाणकार, संशोधक, तज्ज्ञ असे सारेच जातीने हजर होते. कृत्रिम प्रज्ञा ही महाकाय संधी आहे की संकट याबाबत संदिग्धता आहे. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच कृत्रिम प्रज्ञेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानालाही आहेतच. त्याचा वापर कोण आणि कसा करतो यावर सारे काही अवलंबून आहे.

फ्रान्सच्या परिषदेत कृत्रिम प्रज्ञेबाबत सांगोपांग चर्चा झाली. या क्षेत्रात कुणा एकाची मक्तेदारी असता कामा नये, सर्वांना संधी मिळावी, क्षमतानिर्मिती आणि वापर यामध्ये लोकशाही पद्धतीने सर्वांना मुभा अशा मागण्या प्रामुख्याने झाल्या. नफेखोरी, सायबर गुन्हे घडू नये. व्यक्ती किंवा देश स्वातंत्र्यावर घाला येऊ नये, मक्तेदारीचा विळखा पडू नये अशा भावनाही व्यक्त झाल्या. कृत्रिम प्रज्ञा हे शस्त्र न बनता शाश्वत विकासाचे माध्यम बनावे यासाठी सर्वांनीच आग्रह धरलेला दिसतो. इथून पुढे कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात काय घडामोडी घडतात यावर या परिषदेचे फलित अवलंबून राहिल. कृत्रिम प्रज्ञेला या जगातील नवा आणि शक्तीशाली आविष्कारही म्हटले जात आहे. पण तो जगाच्या किंवा मानवाच्या कल्याणासाठी की विध्वंसासाठी अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. त्यामुळे याबाबत अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांना चॅटजीपीटी या कृत्रिम प्रज्ञेवरील तंत्रज्ञानावर मालकी हवी आहे. त्यासाठीच त्यांनी ओपन एआय कंपनीला थेट ९७.४ अब्ज डॉलरची ऑफर दिली. अर्थात आम्ही त्यास भीक घालत नसल्याचे ओपन एआयचे संस्थापक सॅम अल्टमन यांनी म्हटले आहे. तसेच, मस्क यांच्या मालकीचे एक्स (पूर्वाश्रमीचे ट्विटर) ९.७४ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याची भाषा अल्टमन यांनी बोलून दाखविली आहे. त्यामुळे मस्क आणि अल्टमन यांच्यात संघर्ष पेटतो की काय, अशी शंका वर्तविली जात आहे. मस्क हे अमेरिकन अध्यक्षांच्या टीमचा भाग आहेत. त्यामुळे मस्क हे चॅटजीपीटीसाठी धाकदपटशा वापरतील का, कृत्रिम प्रज्ञेच्या तंत्रज्ञानावर वर्चस्व मिळविण्यासाठी मस्क कुठल्याही थराला जातील का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, ओपन एआयच्या स्थापनेवेळी मस्क हे अल्टमन यांच्यासोबत होते. काही वर्षांनी ते त्यातून बाहेर पडले. ओपन एआयला नफेखोरीची लागण झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर मस्क यांनी ओपन एआयच्या विरोधात अनेक खटले दाखल केले आहेत. असे असताना अचानक ही कंपनी स्वतःकडे का घ्यायची आहे? त्याचे कारण म्हणजे, कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात डीपसीकद्वारे चीनचा झालेला शिरकाव. आगामी काळात जवळपास सर्वच क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेचाच बोलबाला राहणार आहे. अशावेळी आपल्याकडे हुकमी एक्का असावा असा मस्क यांचा प्रयत्न आहे. चॅटजीपीटी हे सर्वाधिक लोकप्रिय तंत्रज्ञान आहे. परिणामी, त्यावरची मालकी आगामी काळात सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि बरेच काही देणार असल्याने मस्क कासावीस झाल्याचे दिसते. ज्या पद्धतीने ट्विटरला ऑफर दिली आणि नंतर मस्क मालक झाले तसेच चॅटजीपीटीच्या बाबतीत होते की मस्क आणि अल्टमन यांचे द्वंद्व पहायला मिळते याबाबत आता काहीच स्पष्टता आलेली नाही.

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे स्विकारताच कृत्रिम प्रज्ञेचे महत्व लक्षात घेऊन तब्बल ५०० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीतून स्टारगेट ही कंपनी सुरू करण्याची घोषणा केली. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचे संचालक मंडळही घोषित केले. त्यात अल्टमन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मस्क यांची संपत्ती आहे ४३३ अब्ज डॉलरची आणि स्टारगेटची गुंतवणूक ५०० अब्ज डॉलर. यावरुनच तिचे महाकाय महत्व प्रतित होते. डेटा सेंटर्सची निर्मिती, मायक्रोचीपचे उत्पादन यावर अधिक भर दिला जाणार आहे. उद्योजक असलेल्या ट्रम्प यांनी भविष्याचा वेध घेऊनच स्टारगेटची मूहूर्तमेढ रोवली आहे. या कंपनीद्वारे कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात अमुलाग्र क्रांती घडविण्याचा मानस ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. याद्वारे अमेरिकेत एक लाख नव्या रोजगार निर्मिती होणार आहे. अमेरिका प्रथम या धोरणाचाच एक भाग आहे. संशोधन आणि विकास याद्वारे कृत्रिम प्रज्ञेचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित करण्यात येणार आहे. बदलत्या काळानुसार या क्षेत्रातही अमेरिका महासत्ता राहिल, अशी तजवीज ट्रम्प करीत आहेत.

भारतानेही आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारीत कृत्रिम प्रज्ञेचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे घोषित केले आहे. जगाच्या तुलनेत आपण मागे राहू नये आणि मक्तेदारीच्या काळात आपल्याही म्यानात तलवारी हव्यात हा हेतू त्यामागे आहे. पुढील सहा महिन्यात हे तंत्रज्ञान विकसित होईल, अशी मनिषा मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात भारताने हे तंत्रज्ञान विकसित केले आणि बाजारात उपलब्ध करुन दिले तर ती बाब जागतिक पातळीवर गेमचेंजर ठरु शकेल. मात्र, स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित होण्यात कालापव्यय होऊ नये, अशीच मनोकामना अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

कृत्रिम प्रज्ञेच्या तंत्रज्ञानाने जगभरात आनंद, कुतुहल, भीती आणि चिंता निर्माण केली आहे. आजवर लागलेल्या अनेक मानवी शोधांनी जगभर काय चित्र उभे राहिले ते पहायला हवे. बॉम्ब असो की अण्वस्त्र किंवा आरोग्यासाठीचे काहीही. निर्मितीवेळी असलेला हेतू प्रत्यक्षात वापरावेळी भलताच बनल्याचा इतिहास आहे. कृत्रिम प्रज्ञेच्या बाबतीत ते होऊ नये, अशी प्रार्थना सर्वत्र होत आहे. कारण, हे अतिशय घातक, अदृष्य आणि प्रचंड शक्तीशाली तंत्रज्ञान आहे. शिवाय त्यावर कुणा एका-दोघांची मक्तेदारी जगाची चिंता वाढवणारी ठरेल. म्हणूनच या तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत विकास, शांती आणि असंख्य जटील समस्या सोडविण्यासाठी झाला पाहिजे. जागतिक परिषदेचे सहयजमानपद स्वीकारुन भारताने जगाला योग्य तो संदेश दिला आहे. आगामी काळात या क्षेत्रात कुठेही कमी न पडता संशोधन आणि उत्पादनाच्या क्षेत्रात भारताला मोठी मुसंडी मारावी लागेल. अन्यथा अमेरिका, चीन या देशांच्या कंपन्या कृत्रिम प्रज्ञेच्या माध्यमातून काय काय करतील, घडवतील याचा अंदाज कुणीही बांधू शकत नाही. काळाचा सांगावा ओळखणाराच टिकतो आणि पुढे जात राहतो. अर्थात सूज्ञास सांगणे न लगे!

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

Artificial Intelligence, World, USA, America, India, France, Technology, Human, Development, 

 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)