सोना कितना ‘सोना’ है? (नवशक्ती)
सोना कितना ‘सोना’ है?
सोन्याच्या दरांनी ८७ हजारांचा ऐतिहासिक आकडा पार केला आहे. आणि लवकरच हा आकडा ९० हजारांवर जाईल, असा अंदाज आहे. अचानक सोने महाग का झाले? लग्नसराईत काय होणार? सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर आहे का? आंतरराष्ट्रीय पातळीवर काय स्थिती आहे?
भावेश ब्राह्मणकर
महिला वर्गात सर्वाधिक पसंतीचे असलेले सोने गेल्या
काही दिवसांपासून फारच भाव खात असल्याचे दिसून येत आहे. प्रति ग्रॅमला ८७०० एवढा
उच्चांकी दर नोंदला गेला आहे. सोन्यात अचानक एवढी तेजी का आली? भारतात
लग्नसराई सुरू झाली म्हणून की आणखी काही कारणे आहेत? काही महिन्यांपूर्वी चीनने आंतरराष्ट्रीय
बाजारातून भरमसाठ सोने खरेदी केले त्याचे काही कनेक्शन आहे का? की अमेरिकेच्या
अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्याचा हा परिणाम आहे? हे सारेच
विस्ताराने समजून घेणे आवश्यक आहे.
केवळ आभूषणांपुरते सोन्याचे मूल्य नाही. प्रतिष्ठेचे
ते एक लक्षण आहे. शिवाय सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. भारतीय मानसिकता ही गुंतवणुकीकडे
अधिक असते. मोलमजुरी करणाऱ्यापासून ते गडगंज श्रीमंतांपर्यंत सारेच सोन्यात सुख
शोधत असतात. वेळेप्रसंगी हेच सोने कित्येकपटीने मौल्यवान बनते. आरोग्य, शिक्षण,
व्यवसाय किंवा लग्नकार्यासाठी चक्क आपले मंगळसूत्र गहाण ठेवणाऱ्या महिलांचीही
उदाहरणे आपण पाहतो. म्हणजेच, सोने खरेदीमुळे दागिना अंगावर मिरवतानाच
भविष्यकाळातील संकटासाठीची तरतूदही केलेली असते. गेल्या काही वर्षात तर अनेक जण
शेअर बाजाराऐवजी सोन्यात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. हक्काचा परतावा हे
त्यामागचे कारण आहे. अनेकांनी बँक लॉकरमध्ये सोन्याची गुंतवणूक सुरक्षित केली आहे.
काहींनी याच सोन्यावर कर्ज मिळवून आपली गरज भागविली आहे. भारतातच हा ट्रेण्ड आहे
का? तर असे नाही.
परदेशातही सोन्याचे आकर्षण कमी नाही. किंबहुना सुरक्षितता आणि परतावा या दोन्ही
पातळीवर सोन्याचे महत्व इतर पर्यायांपैकी कित्येक पट अधिक आहे. त्यामुळे सोन्याला
खरोखऱच सोन्याचे दिवस आले आहेत.
जागतिक सुवर्ण परिषदेचा अहवाल कालच प्रकाशित झाला
आहे. २०२४ या वर्षात भारतामध्ये तब्बल ८०२ टन सोन्याची विक्री झाली आहे. २०२३
मध्ये हीच विक्री ७६१ टन होती. म्हणजेच वर्षभरात ४१ टन अधिक सोने खरेदी झाले आहे. केवळ
गुंतवणूक म्हणून भारतात २३९ टन सोन्याची खरेदी झाली आहे. हेच प्रमाण २०२३ मध्ये १८५
टन एवढे होते. सहाजिकच सोन्याची अधिक आयात भारताला करावी लागत आहे. आता हीच
आकडेवारी जागतिक पातळीवर पाहूया. २०२३ मध्ये ४९४५ टन एवढी सोन्याला मागणी होती.
२०२४ मध्ये त्यात एक टक्का वाढ झाली. आता २०२५ या वर्षात सोन्याला मागणी वाढण्याची
शक्यता आहे. छोटे आणि मोठे गुंतवणूकदारही सोन्याकडे वळण्याची चिन्हे आहेत. दर वाढत
असले तरी त्याची मागणी कमी होणार नाही, असाच तज्ज्ञांचा अंदाज आहे.
रशिया-युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील हिंसक
संघर्ष याचा सोन्याच्या दरांवर परिणाम झाला. या दोन्ही युद्धांमुळे सोन्याची मागणी
काही प्रमाणात घटेल असाही अंदाज होता. पण तसे झाले नाही. गेल्या वर्षभरात चीनने आंतरराष्ट्रीय
बाजारातून तब्बल २०० टन सोने खरेदी केल्याचे समोर आले. अचानक चीनने ही खरेदी का
केली?
याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. कारण, जेव्हा जेव्हा चीन मोठी खरेदी करतो
तेव्हा काही तरी घडणारच असते, असा आजवरचा अनुभव आहे. पीपीई कीटची विक्री ठप्प करुन
आंतरराष्ट्रीय बाजारातून हे कीट खरेदी करण्याचा सपाटा चीनने लावला तेव्हाच
अनेकांना शंका आली. त्यानंतर कोरोनाच्या महामारीने जगभर हाहाकार माजवला. आताही चीनच्या
खरेदीनंतर सोन्याचे दर ९० हजाराकडे कूच करीत आहेत. हा योगायोग आहे की त्याचा थेट
संबंध आहे हे शोधण्यासाठी अनेक संशोधक कामाला लागले आहेत.
भारतानेही गेल्यावर्षी चीनच्या या हालचाली पाहून काही
निर्णय घेतले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंग्लंडमधील आपले १०२ टन सोने मायदेशी आणून
ठेवले. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने जवळपास १५ टन सोने नव्याने खरेदी केले. असाच
कित्ता अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आदी देशांना गिरविला. परिणामी, सोन्यात
तेजी दिसून आली. जागतिक पातळीवर अस्थैर्य असतानाही सोन्याच्या मागणीवर त्याचा
परिणाम झाला नाही. आता तर अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच डोनाल्ड
ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. कॅनडा, मेक्सिको आणि चीन यांच्या मालावर
आयातशुल्क वाढविण्याची घोषणा त्यांनी केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून चीननेही आयातशुल्क
वाढविले आहे. यातून व्यापार युद्धाला तोंड फुटल्याचे बोलले जात आहे. याचा प्रभाव
सोन्याच्या दरावर पडला आहे. त्यामुळेच सोन्याच्या दराने उसळी घेतल्याचे तज्ज्ञांचे
म्हणणे आहे. पश्चिम आशियातील इस्त्राईल आणि हमास यांच्यात युद्धबंदी करार झाला
आहे. त्यामुळे तेथील तणाव तात्पुरता निवळल्याची चिन्हे आहेत. मात्र, अद्यापही
रशिया-युक्रेन युद्ध शमलेले नाही. त्यामुळे सोन्याचे दर कमी होणार नाहीत, असे दिसून
येते.
गाझापट्टी ताब्यात घेऊन तिचा विकास करण्याची
घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली. जगातील सर्वाधिक
वादग्रस्त, हिंसाचार, नुकसान, जिवीतहानी आणि हालापेष्टा असलेला भाग म्हणून गाझाची
ओळख आहे. बॉम्ब वर्षावांपासून घरे जमीनदोस्त होण्यापर्यंत सारेच चिंताजनक आहे. आपल्या
हक्काचा प्रदेश असावा या अस्मितेने या भागात हाहाकार माजवला आहे. आणि आता त्याच
प्रदेशावर ताबा मिळविण्याची ट्रम्प यांची वल्गना नजिकच्या काळात वांशिक संघर्षाला
पेटविणारी तर ठरणार नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे. पश्चिम आशियातील अरब
आणि अन्य देशांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प
यांनी खरोखरच गाझावर वर्चस्व मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या तर पश्चिम आशियात
पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. तर, दुसरीकडे ट्रम्प यांच्या अमेरिका
प्रथम या धोरणाची झळ बसणाऱ्या अनेक देशांकडून विविध प्रकारचे कठोर निर्णय घेतले जाऊ
शकतात. खासकरुन अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध तीव्रतेचे होऊ शकते. तसे
झाले तर ते फक्त व्यापारापुरतेच सीमीत राहिल की लष्करी पातळीवरही जाईल हे सांगता
येत नाही. त्यामुळे जगभरातील या घडामोडी आणि हालचाली सोन्याच्या मागणी आणि
किंमतीवर निश्चितच परिणाम करणाऱ्या आहेत.
घरगुती किंवा मोठ्या ग्राहकांना घरबसल्या
सोन्याचे कर्ज देण्याची चढाओढ वित्त संस्थांमध्ये पहायला मिळत आहे. या सेवेमुळेही
सोन्याची मागणी वाढत आहे. कारण, संकट किंवा गरजेप्रसंगी घरबसल्या पैसे मिळत आहेत. परिणामी
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला चालना मिळत आहे. तर, वित्त संस्थांनाही मोठा फायदा
होत आहे. व्याज तर मिळतेच पण जर ग्राहकाने कर्जाची परतफेड केली नाही तर सोने जप्त
केले जाते. बाजारमूल्यापेक्षा ६० ते ७० टक्केच कर्ज ग्राहकाला दिले जाते. कर्जाची
रक्कम थकली तर वित्त संस्था हेच सोने बाजारात विक्री करतात. त्यामुळे कर्ज
देतेवेळचा भाव आणि सोने विक्री करतानाचा भाव यात मोठी तफावत असते. परिणामी वित्त
संस्था प्रचंड नफा कमावतात. स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याभोवती
असे अर्थ आणि गुंतवणूककारण गुंफले गेले आहे. सोन्याची झळाळी दिवसागणिकच वाढते आहे.
आयटी आणि अन्य क्षेत्रात कार्य करणारे तरुण सोन्याकडे वळण्यामागे त्याचे आकर्षण
नाही तर सुरक्षित आणि हमखास परतावा देणारा धातू हेच आहे. जगभरात सोन्याचे ग्राहक
वाढत आहेत. दर चढे असो की अस्थैर्य सोन्याच्या मागणीत तोळाभरही फरक पडत नाही.
त्यामुळे सोना कितना ‘सोना’ है याचे उत्तर
तुम्हाला मिळालेच असेल!
--
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि
पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
Gold, Investment, Rate, Trade, Demand, Supply, Economics,
Mast
उत्तर द्याहटवा