अनिश्चिततेच्या हिंदोळ्यांवर आव्हानांनी समृद्ध नवे वर्ष! (नवशक्ती)

नव्या वर्षात भारतासमोर नव्या आव्हानांचा डोंगर उभा आहे. शेजारी प्रथम, पूर्वेकडे पहा, कृतीयुक्त पूर्व यासारखे परराष्ट्र धोरण भारताने राबविले आहे. काळाच्या ओघात त्यात बदल आणि कल्पक डाव टाकणे आवश्यक आहे.

भावेश ब्राह्मणकर

अमेरिका
महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प हाती घेणार आहेत. त्यांचे विचार, ध्योयधोरणे ही केवळ भारतच नाही तर जगावर परिणाम करणार आहेत. त्यांनी दिलेल्या संकेतांनुसार, भारतीय उत्पादनांवर अधिक शुल्क लावण्याचा निर्णय ते घेऊ शकतात. भारतातून अमेरिकेत शिक्षण आणि नोकरीसाठी जाणाऱ्यांना मिळणाऱ्या व्हिसाचा प्रश्न कळीचा बनू शकतो. भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानांना अद्यापही अमेरिकेने इंजिनचा पुरवठा केलेला नाही. शस्त्रास्त्रांसह अन्य करार अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाहीत. शिवाय ट्रम्प हे अचानक कुठला घोषणा बॉम्ब फोडतील हे सांगता येत नाही. त्यामुळे भारताला अमेरिकेसंदर्भात विशेष धोरण ठरवणे आवश्यक आहे.

चीन
शेजारी असलेला आणि अतिमहत्वाकांक्षा, महासत्तालोलुप व विस्तारवादाने झपाटलेल्या चीनने गेल्या वर्षाच्या अखेरीस नमते घेत गलवान सीमावादावर काहीसा पडदा टाकला. पुर्वीप्रमाणेच चांगले संबंध प्रस्थापित होतानाच दोन्ही देशांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार होणे गरजेचे आहे. भारत-चीन थेट विमानसेवा, कैलास मानस सरोवर यात्रा दृष्टीपथात आहे. चिनी कंपन्यांची भारतात गुंतवणूक वाढीस लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर १०० टक्के शुल्क लावले तर सहाजिकच भारतीय बाजारपेठ चीनसाठी महत्वपूर्ण असेल. अशावेळी भारत काय करणार
? भारतीय उत्पादनांचे काय होणार? असे अनेक प्रश्न आहेत.     संपूर्ण सीमावाद संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देश काही ठोस निर्णय घेणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्रह्मपुत्र नदीवरील प्रस्तावित महाकाय धरण, चीनकडून भारतीय किनाऱ्यांवर पाठविला जाणारा कचरा, हिंद महासागरातील घुसखोरी, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताला विरोध आदींचा विचार करता भारताला चीनसंदर्भात नव्याने विशेष धोरण आखण्याची गरज निर्माण झाली आहे. या वर्षात त्याला चालना मिळेल का?

श्रीलंका
नव्याने सत्तारुढ झालेल्या अनुरा कुमार दिसनायके यांनी सर्वप्रथम भारताचा दौरा करुन नवे पर्वारंभले. मात्र, चीनने चपळाई दाखवत दिसनायके यांना विविध आमिषे दाखविली. या महिन्यातच त्यांचा चीन दौरा प्रस्तावित आहे. परिणामी, तेथे काय घडेल
? दिसनायके यांची पुढील वाटचाल कशी असेल? भारतीय संबंध दृढ होतील की चीनच्या जाळ्यात श्रीलंका पुन्हा अडकेल? हे आताच सांगणे अवघड आहे. पण भारताला अधिक सजग राहून श्रीलंका हा भारतविरोधी भूमिका किंवा चीनच्या अधिक जवळ जाऊन भारताचे असंख्य हित डावलणार नाही हे पहावे लागेल. सौहार्दाचा पूल दोन्ही देशात घट्ट उभा राहिल, असे वातावरण तयार करावे लागेल.

बांगलादेश
अस्थिर आणि हंगामी सरकारच्या तावडीत असलेल्या या देशाने गेल्या वर्षाच्या अखेरीस दाखवलेल्या रंगाने भारताला काळजीत टाकले. या वर्षात तेथे निवडणूक होऊन नवे सरकार स्थापन होणार का
? मोहम्मद युनूस हे भारत दौरा करणार का? भारताशी चांगले संबंध ठेवण्यासाठी काही ठोस निर्णय होणार का? चीन आणि पाकिस्तानशी केलेली जवळीक भारताला आणखी किती हानी पोहचविणार? अमेरिकेची भूमिका काय राहणार? शेख हसिनांचे प्रत्यार्पण करावे लागणार का? मोदी बांगलादेशला भेट देणार का? भारताला त्रास देण्यासाठी परकीय शक्ती बांगलादेशचा वापर करणार का? भारताच्या बांगलादेशातील व्यापारात तूट होणार का? अशा प्रश्नांच्या मालिका आहेत. भारताला हे सारेच गांभिर्याने घ्यावे लागेल.

नेपाळ
सत्तांतराच्या हिंदोळ्यावर आरुढ या देशाने भारताऐवजी चीनला जवळ केले आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये (बीआरआय) सहभाग घेतला आहे. ही बाब भारताला सामरिकदृष्ट्या डोकेदुखीची आहे. चीन हा नेपाळचा वापर भारतविरोधासाठी करु शकतो. नवा नकाशा, भारतीय भूभागावर आपला दावा सांगणे, वाद निर्माण करुन अविश्वासाचे वातावरण तयार करणे अशा नेपाळी कृतींनी भारताला सातत्याने डिवचले जात आहे. हे सारेच चिंताजनक आहे. त्यामुळे या देशाबाबतही भारताला या वर्षभरात सर्वंकष अशी पावले उचलावी लागतील.

म्यानमार, मालदीव
म्यानमारमधील लष्करी राजवट आणि सीमेवर तारेचे कुंपण या दोन महत्वाच्या बाबी आहेत. पुन्हा नागरी उठाव होऊन तेथे लोकशाही प्रस्थापित होणार का
? भारताची निर्यात वाढणार का? भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारचा उपयोग केला जाणार का? हे कळीचे आहे. तर, बिघडलेल्या संबंधात पुन्हा आशेचे किरण निर्माण झालेल्या मालदीवचा वर्षभरात मूड काय असेल? भारतीय नौदल पुन्हा मालदीवच्या भूभागावर गस्तीसाठी जाईल का? मालदीव चीनच्या जाळ्यात किती ओढला जाणार? आदी प्रश्नांनी उकल होण्यासाठी हे वर्ष महत्वाचे असणार आहे.

युद्धांचा भयकंप
रशिया-युक्रेन आणि पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धांना यंदा पूर्णविराम मिळणार का
? ट्रम्प यातील एक तरी युद्ध थांबविणार का? युद्धाचा भडका आणखी उडणार का? अण्वस्त्रांचा वापर होणार का? रशिया नमते घेणार का? इराणमधील चाबहार बंदरातील भारतीय गुंतवणुकीचे काय होणार? भारताचा पश्चिम आशियातील व्यापार पुन्हा बहरेल का? या जटील प्रश्नांसाठी हे वर्ष महत्वाचे असेल.

युरोप आर्थिक कॉरिडॉर
भारतापासून सुरू होणारा आणि पश्चिम आशियामार्गे थेट युरोपात जाणारा आर्थिक कॉरिडॉर अस्तित्वात येणार का
? चीनच्या महत्वाकांक्षी बीआरआयला हा क़रिडॉर शह देणार का? त्याला हाणून पाडण्यासाठी चीन काय खेळी करणार? भारत या कॉरिडॉरसाठी पुढाकार घेणार का? त्याला अन्य देश किती प्रतिसाद देणार? हे सारेच महत्वाचे आहे.

शीत युद्ध
अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये शीत युद्धाचा भडका उडण्याची दाट शक्यता आहे. ते खरे ठरणार का
? ट्रम्प यांच्या आक्रमक आणि कठोर निर्णयांना शह देण्यासाठी चीन कुठली चाल खेळणार? हे सारेच कल्पनेपलिकडचे आहे. शेकडो अमेरिकन कंपन्यांच्या उत्पादनांची निर्मिती चीनमध्ये होणे, ईव्हीसह अनेक क्षेत्रात चीनने निर्माण केलेला दबदबा, चिनी उत्पादनांचा वरचष्मा, अनेक क्षेत्रातील चिनी आघाडी आदींचा विचार करता दोन्ही देश कितपत ताणून धरतील? या शीतयुद्धाचा भारतावर किती आणि कसा परिणाम होणार? हे सांगणे कठीण आहे. विशेष गट स्थापून भारत तत्काळ उपाययोजनांद्वारे वाटचाल सुरू करु शकतो.

पनामा, तैवान
ट्रम्प यांनी पनामा कालव्यावर दावा केला आहे. सिंहासनारुढ होताच ते यादृष्टीने प्रत्यक्ष पावले उचलणार का
? चीन यावर काय प्रतिक्रीया देणार? तणावपूर्ण स्थितीत पनामा कालव्यातील व्यापार ठप्प होणार की सुरूच राहणार? भारतीय व्यापारावर त्याचा किती परिणाम होणार? हे सारे या वर्षभरात घडणार आहे. तिकडे तैवानला सतत घाबरवून सोडणारा चीन प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी सरसावणार का? अमेरिका तैवानच्या मदतीला धावून चीनशी थेट पंगा घेणार का? याची उत्तरे या वर्षी अपेक्षित आहेत.

रशिया
युद्धाने पिचलेल्या रशियाची आर्थिक आघाडीवर घसरण होत आहे. भारताला सर्वाधिक तेल पुरवठा रशियाकडून होतो. शिवाय संरक्षण उत्पादनेही. युक्रेन सोबतचे युद्ध कुठल्या वळणावर जाते, त्याचा भारतावरही परिणाम होणार आहे. एस ४०० या हवाई क्षेपणास्त्रांसह, पाणबुडी आणि अन्य संरक्षण सामुग्री भारताला मिळण्यातील अडचणी दूर होणार का
? यासाठीही हे वर्ष महत्वाचे आहे.

एकंदरीतच, देशोदेशीच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवतानाच भारताला सर्वंकष अशा धोरण आणि डावपेचांची आवश्यकता आहे. विकसित भारत आणि पहिल्या तीन अर्थव्यवस्थांच्या मार्गक्रमणात त्याचा वाटा मोलाचा आहे. वर्षभरात काय काय घडते? त्यावर क्रिया-प्रतिक्रीया काय उमटतात? भारताचा प्रतिसाद कसा असेल? हे यथावकाश स्पष्ट होईलच. तूर्त अनिश्चिततेच्या हिंदोळ्यांवरील आणि आव्हानांनी समृद्ध नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे 

https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

--

India, International Relations, Foreign Affairs, International, New Year, Challenges, Trade, World, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)