ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?
तिबेटमध्ये जगातील सर्वात मोठे धरण ब्रह्मपुत्र नदीवर चीन उभारणार असल्याचे वृत्त जसे धडकले तसे अनेकांचे फोन आणि मेसेज सुरू झाले. भारताचा यावर काय परिणाम होणार? चीन खरोखरच हे महाकाय धरण बांधणार आहे का? ब्रह्मपुत्र नदी कोरडी होणार का? भारताच्या जलविद्युत प्रकल्पाचे काय? या सर्वांचा घेतलेला हा धांडोळा...
भावेश ब्राह्मणकर
अखेर चीनने आपल्या भात्यातील
ब्रह्मास्त्र बाहेर काढले आहे. ते म्हणजे जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याचा. त्सांगपो
किंवा यारलुंग झांबो (यार्लुंग त्सांग्पो) अर्थात ब्रह्मपुत्र नदीवर हे धरण असणार
आहे. आपल्याच अधिपत्याखाली असलेल्या तिबेटच्या भूभागावर हे धरण तब्बल १३७ अब्ज
डॉलर खर्चून बांधले जाणार आहे. या धरणामुळे पर्यावरण किंवा कुठल्याही क्षेत्रावर विपरीत
परिणाम होणार नाहीत, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग
यांनी केला आहे. तसेच, भारत किंवा बांगलादेश यांना मिळणारे पाणीही कमी होणार नाही,
असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात हा चिनी कावा नक्की काय आहे, हे जाणून
घेणे आवश्यक आहे.
तिबेटच्या या महाकाय धरणाची बिजे
रोवली आहेत ती १९ व्या शतकातील ५० च्या दशकात. नागरी उठावानंतर चीनमध्ये सत्तांतर
झाले खरे त्याचबरोबर चीनचे भौगोलिक क्षेत्रही बदलले. माओंच्या नेतृत्वातील चिनी
सरकारने थेट तिबेटवर कब्जा केला. मोठ्या माशाने छोटा मासा गिळंकृत करावा तसाच हा
प्रकार. तिबेटसारखा छोटा देश मिळवून चीनने नक्की काय साध्य केले हे अनेकांना उमगले
नाही. मात्र, काही दशकातच त्याचा उलगडा झाला. यातून अनेक देशांना आणि धुरिणांनाही
मोठा धक्काच बसला.
जगभरात जेवढे गोडेपाणी उपलब्ध आहे
त्यापैकी एक तृतीयांश पाण्यावर चीनने मालकी मिळविली. कारण, हिमालयीन प्रदेश
असलेल्या तिबेटवर मिळविलेला हक्क. चीनच्या या साऱ्या कारभाराला १९५९ मधील घटना
कारणीभूत आहे. तिबेटवर हक्क मिळवून चीनने अनेक संदेश जगभरात दिले. जगातील सर्वाधिक
जलसमृद्ध अशा तिबेटियन परिसर थेट चीनच्या अधिपत्याखाली आला. आशिया खंडातील हा
सर्वाधिक समृद्ध जलस्त्रोत आहे. कारण तिबेटमधील हिमनद्या आणि जलस्त्रोतावर शेजारील
देशांची तब्बल १.३ अब्ज लोकसंख्या अवलंबून आहे. खास म्हणजे, जगातील ही एक पंचमांश
लोकसंख्या आहे. एवढ्या लोकसंख्येसाठीच्या पाण्यावर हक्क मिळणे तसे दुर्मिळच. पण
चीनने ते करुन दाखविले आहे. म्हणजे महाकाय धरणाची चर्चा आपण आता करीत असलो तरी
प्रत्यक्षात चीनने तिबेट प्रदेश आणि त्यातील जलस्त्रोतांचा किती दूरगामी विचार
केला होता हे कळून चुकते.
आता जाणून घेऊया ब्रह्मपुत्र
नदीविषयी. तिबेट प्रदेशात उगम पावणारी ब्रह्मपुत्र ही आशिया खंडातील प्रमुख नदी
आहे. हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये ती उगम पावते.
तिबेटमध्ये तिचे नाव आहे त्सांगपो किंवा यारलुंग झांबो (यार्लुंग त्सांग्पो). ब्रह्मपुत्र
ही जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे आणि तिच्या सरासरी पाणी विसर्गाच्या
संदर्भात पाचव्या क्रमांकावर आहे. ही नदी हिमालयाच्या कैलास पर्वतरांगांमधून ५३००
मीटर उंचीवर उगम पावते. तिबेटमधील ब्रह्मपुत्रेचे पाणलोट क्षेत्र २,९३,००० चौकिमी एवढे आहे. तर, भारत आणि भूतानमध्ये
२,४०,००० चौकिमी आणि बांगलादेशात ४७,००० चौकिमी एवढे आहे. ब्रह्मपुत्रेची सरासरी
रुंदी ५.४६ किमी आहे. ब्रह्मपुत्र खोऱ्याची सरासरी रुंदी सुमारे ८० किमी आहे. यावरुनच
या नदीचे महत्व लक्षात येते.
उगमानंतर ब्रह्मपुत्र नदी पूर्वेकडे
वाहते आणि भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते. अरुणाचल व आसाममधून
नैर्ऋत्य दिशेने वाहत जाऊन ती बांगलादेशामध्ये शिरते. बांगलादेशमध्ये तिला जमुना
या नावाने ओळखले जाते. बांगलादेशात ब्रह्मपुत्रेला प्रथम पद्मा ही गंगेपासून
फुटलेली नदी व नंतर मेघना ह्या दोन प्रमुख नद्या मिळतात. गंगेच्या त्रिभुज
प्रदेशामध्ये येऊन ब्रह्मपुत्र बंगालच्या उपसागराला मिळते. आसाम राज्यामधील बहुतेक
सर्व मोठी शहरे ब्रह्मपुत्रेच्या काठावरच वसली आहेत. भारतात प्रवेश करेपर्यंत
नदीचा उतार खूपच उंच आहे. नदीचा उतार अचानक सपाट झाल्यामुळे आसाम खोऱ्यात ही नदी
वेणीसारखी आहे. आसाम खोऱ्यात कोबो ते धुबरी या नदीच्या प्रवासादरम्यान तिच्या
उत्तर किनाऱ्यावर सुमारे २० महत्त्वाच्या उपनद्या आणि दक्षिण किनाऱ्यावरील १३
नद्या जोडल्या जातात. उच्च गाळाचा भार आणणाऱ्या या उपनद्यांना जोडल्याने ब्रह्मपुत्रेचे
पात्र फार मोठे झाले आहे. ब्रह्मपुत्रेचे निचरा क्षेत्र भारताच्या एकूण भौगोलिक
क्षेत्राच्या जवळपास ५.९ टक्के आहे. उत्तरेला हिमालयाने, पूर्वेला आसाम-ब्रह्मदेश सीमेवर वाहणाऱ्या टेकड्यांच्या पाटकरी रांगेने,
दक्षिणेला आसामच्या टेकड्या आणि पश्चिमेला हिमालय आणि कड्यांनी
वेढलेले आहे.
भारत आणि बांगलादेशातील मोठी लोकसंख्या, अर्थव्यवस्था, ग्रामीण जीवन हे सारे ब्रह्मपुत्र नदीवर अवलंबून आहे. आता हे जाणून घेऊ की, चीनच्या महाकाय धरणाचा काय आणि कसा परिणाम होणार आहे.ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरण बांधून तेथे अब्जावधी लीटर पाणी अडविण्याचे कारस्थान चीन करीत आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यावर मोठा परिणाम होणार आहे. हे धरण पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मपुत्र ही भारतात आणि बांगलादेशात चक्क तिमाही किंवा चारमाही वाहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वसाधारणपणे हिमालय पर्वतरांग आणि तिबेटच्या पठारात अतिवृष्टीचे प्रमाण अधिक असते. परिसरात जे काही पावसाचे पाणी असते ते सहाजिकच प्रमुख नदी असलेल्या ब्रह्मपुत्रेमध्ये मिसळते. शिवाय या नदीला मोठा उतार आहे. त्यामुळे हे पाणी अवखळ होऊन बसते. याच महाकाय धरणाच्या ठिकाणी भव्य असा जलविद्युत प्रकल्पही उभारण्याचा चीनचा पवित्रा आहे. म्हणजेच, पाणी तर मिळेलच पण ऊर्जा निर्मितीही होईल. हवामान बदलाचे संकट पाहता जलविद्युत ही पर्यावरणस्नेही आहे. शिवाय शेजारील देशांना खिंडीत गाठण्याचे कारस्थानही. म्हणजेच, चीन या धरणाच्या माध्यमातून अनेक पक्षी एकाचवेळी मारणार आहे.
तिबेटमधून वाहताना ब्रह्मपुत्रेतून
केव्हा आणि किती पाण्याचा विसर्ग होतो आहे याची कुठलीही माहिती भारताला प्राप्त
होत नाही. भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणलेले असल्याने चीनकडून कुठल्याही
प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण होत नाही. ती झाली तर नदीच्या खालच्या भागात
असलेल्या अरुणाचल आणि आसाम राज्यात योग्य ती उपाययोजना केली जाऊ शकते किंवा करता
येईल. मात्र, चीनकडून तिबेटमधील अतिवृष्टी, ब्रह्मपुत्रेचा प्रवाह, विसर्ग
यासंबंधीची कुठलीही माहिती दिली जात नाही. परिणामी, अचानक नदी महापुराचे रुप घेते.
त्यामुळे अरुणाचल आणि आसाम या राज्यांमध्ये प्रचंड दैना उडते. दरवर्षी असंख्य
निष्पाप बळी यात जातात. म्हणजेच, ब्रह्मपुत्र नदीला चीनने आपले अस्त्र बनविले आहे
आणि ते तो भारतावर वापरत आहे. धरणाच्या माध्यमातून या अस्त्राला आणखी धार चढणार
आहे.
पाणी राहिले तरच आपण जगावर वर्चस्व
गाजवू शकतो या होऱ्याने चीनचा माओवाद आक्रमक बनतो आहे. असे असले तरी, नद्यांचे
प्रदूषण ही एक मोठी समस्या चीनला भेडसावते आहे. विनाप्रक्रिया नदीत मिसळणारे
सांडपाणी, हवामान बदल, दुष्काळामुळे कोरड्या पडणाऱ्या नद्या,
घटते भूजल या संकटाला चीन सध्या तोंड देत आहे. यावर पर्याय म्हणून जलस्त्रोत
असलेल्या भागातून दुष्काळी भागात जलदगतीने पाणी नेण्याचा आश्वासक पवित्रा चीनचा आहे.
याचाच एक भाग म्हणून मेकॉन आणि सॉल्विन या नद्यांवर नऊ मोठी धरणे चीनने बांधली
आहेत. आता ३० हून अधिक धरण बांधण्याचा आराखडा चीनने अंतिम केला आहे. या साऱ्याचा
मोठा परिणाम दक्षिण पूर्व आशियाई देशांवर होणार आहे. उत्तरेकडील प्रदेशाचा दुष्काळ
संपविण्यासाठी दक्षिणेकडील पाणी नेण्याचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या
चीनमध्ये आकाराला येत आहे. तिबेटियन जलस्त्रोतांचे पाणी उत्तरेकडील बिजींगपर्यंत
पाईपलाईनने नेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. जगात असे महाकाय काम आजवर कुठेच झालेले
नाही. प्रचंड महत्त्वाकांक्षा हा त्यामागचा कणा आहे. ब्रह्मपुत्रेवर बांधले जाणारे
धरण हे भारत, बांगलादेश आदी देशांसमोर संकट निर्माण करणारे आहे.
चीनशी थेट पंगा घेणे आजच्याघडीला
कुठल्याही देशाला शक्य नाही. तसे भक्कम स्थान चीनने निर्माण केले आहे. पर्यावरण
तज्ज्ञांच्या मते, आज चीन जे काही आडाखे बांधतो आहे किंवा महत्वाकांक्षेपोटी जे
करतो आहे त्यातून जलयुद्धच निर्माण होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण
विषयक कार्यक्रमात अनेक वर्षे काम पाहिलेल्या व्यक्ती चीनच्या या आक्रमक धोरणावर
टीका करीत आहेत. तिबेटवर हक्क मिळवून चीनने आशियाचा जल नकाशा (वॉटर मॅप) बदलला
आहे. आता या पुढील काळात पाण्यावर सर्वाधिक मालकी मिळवून किंवा सर्वाधिक पाणी
आपल्या ताब्यात घेऊन चीन जगाला वेगळा संदेश देऊ पहात आहे. वाढत्या महत्त्वाकांक्षांपुढे
मानवताही फिकी पडत आहे. तसा शुष्की अन् कृत्रिम मानवी स्वभाव तयार झाला आहे. यातून
पाण्याचे उग्र होणारे रुप युद्धाला चालना देणारेच आहे.
घटती जमीन, वाढती लोकसंख्या, भूजलाचा
वारेमाप उपसा, नैसर्गिक आपत्ती अशी संकटांची मालिका जगात सुरू आहे. बिजींग
प्रांतात भूजलाचा उपसा एवढा प्रचंड आहे की, वर्षाला चार इंच पाणी पातळी कमी होत
आहे. त्याचा कुठलाही सारासार विचार होताना दिसत नाही. जगातील सर्वाधिक
जलदुर्भिक्ष्य जाणवणारे शहर म्हणून आज चीनची राजधानी बिजींगची ओळख तयार झाली आहे.
यापुढील काळात हा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. एक लाख वीस हजार किलोमीटर वर्ग एवढ्या क्षेत्रावरील भूस्तर (नॉर्थ चायना
प्लेन अॅक्विफर) बाधित झाल्याच्या नोंदी आहेत. शांघाय, मेक्सिको, कॅलिफॉर्नियातील
सेंट्रल व्हॅली ही शहरेही पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. २०३०पर्यंत जगातील
भूजलामध्ये मोठी तूट निर्माण होईल, असे संयुक्त राष्ट्राचे अनेक अहवाल सांगत आहेत.
अरब राष्ट्रांमधील ६० दशलक्ष नागरिकांना पाणी पुरविणारी अरेबियन अॅक्विफर सिस्टीम,
भारत-पाकिस्तानला तारणारे इंडस बेसिन अॅक्विफर आणि उत्तर अफ्रिकेची तारणहार मुरझुक
दाज्डो बेसिन सध्या संकटात आहे. ही चिंताजनक बाब आहे.
चीन आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये
यापुढील काळात मोठे वाद उदभवणार आहेत. कारण, चीनचे आडाखे आणि त्यांनी पाण्याच्या
मालकीसाठी आक्रमकपणे सुरू केलेली कामे. आज जगात सर्वाधिक धरणे ही चीनमध्ये आहेत.
तेथे तब्बल ९० हजारापेक्षा अधिक धरणे असली तरी चीनने आणखी काही धरणे आणि ब्रह्मपुत्र
नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याचा निर्धार केला आहे. अनेकदा चीन बोलण्याऐवजी
प्रत्यक्ष कृती करुनच सांगतो. आता चीनने महाकाय धरणाविषयी माहिती दिली आहे. म्हणजे,
मोठ्या गतीने तो हे साकारणार यात तिळमात्र शंका नाही. चीनच्या या खेळीला शह कसा
द्यायचा असा भारत आणि बांगलादेशपुढे प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय न्यायालय
किंवा अन्य जागतिक संघटनांना चीन जुमानत नाही. त्यामुळे थेट युद्धाचाच पर्याय आहे.
मात्र, तो दोन्ही देशांना परवडणारा नाही. कारण दोन्ही देश अण्वस्त्रधारी तर आहेच
शिवाय शस्त्रास्त्र आणि सैन्याच्या बाबतीतही बलाढ्य आहेत. परिणामी, चीनचे हे
महाकाय धरण जलयुद्ध घडविणार की आणखी काही हे येत्या काळात स्पष्ट होईल.
--
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि
पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
‘चीन हा भारताच्या पर्यावरणावर
नक्की कसा परिणाम करतो आहे?’ हे जाणून घेण्यासाठी ‘अंतरीचे प्रतिबिंब’ या दिवाळी अंकातील माझा लेख नक्की
वाचा....
Environment, China, Tibet, Dam, Brahmaputra, River, India, Bangladesh, Water, Hydroelectricity, Storage
अभ्यासपूर्ण लेखन 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा