श्रीलंकन अध्यक्षांचा भारत दौरा किती सफल, संपूर्ण? (नवशक्ती)
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके यांनी पहिल्याच विदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली. त्यानुसार ते दिल्लीत आले. या दौऱ्यात काय घडलं? भारताच्या दृष्टीने या दौऱ्याला किती महत्त्व आहे? यापुढील काळात दोन्ही देशांचे संबंध कसे असतील? कुणाला अधिक फायदा होईल?
भावेश ब्राह्मणकर
दक्षिण आशियातील छोटा घटक आणि भारताचा
सागरी शेजारी असलेल्या श्रीलंकेत नुकतेच नवे सरकार सत्तारुढ झाले. डाव्या विचारसरणीचे
अनुरा कुमार दिसनायके (एकेडी) यांच्या नेतृत्वात श्रीलंकेची वाटचाल सुरू झाली आहे.
देशवासियांच्या जिव्हाळ्याचे विषय आणि समस्यांना हात घालणाऱ्या आणि त्या
सोडविण्याची आशा असलेल्या एकेडी यांच्यावर खुप मोठी जबाबदारी आहे. अनेक आव्हाने
असली तरी त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. डावी आणि
मार्क्सवादी विचारांच्या चीनला अधिक जवळ करण्याऐवजी एकेडी यांनी पहिल्या विदेश
दौऱ्यासाठी भारताला प्राधान्य दिले. यातूनच त्यांची आगामी वाटचाल ही अतिशय चाणाक्षपणे
राहिल, असे संकेत मिळाले आहेत. चीनने श्रीलंकेतील बंदर विकसित केले आहे. शिवाय
महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणारा आणि एकाच विचारांचा असलेला चीन मात्र एकेडी यांना
फार जवळचा वाटत नाही. याचे कारण देशहित. श्रीलंकेला समस्यांच्या गर्तेतून बाहेर
काढण्यासाठी एकेडींनी मनोमन एक कृती आराखडा तयार केला आहे. त्याची हळूहळू
अंमलबजावणी करण्याचे त्यांचे प्रयत्न दिसत आहेत. भारत दौरा हा त्याचाच एक भाग आहे.
या दौऱ्यातून त्यांनी अनेक संदेश तर दिलेच शिवाय श्रीलंका हित सर्वप्रथम
असल्याचेही सूचित केले आहे.
भारत, चीन किंवा अन्य देशांच्या
भांडणांमध्ये पडून श्रीलंकेचे सँडविच करणार नाही, असे एकेडी यांनी अध्यक्षपदाची
सूत्रे घेतानाच स्पष्ट केले होते. ते खरेही आहे. कारण भारताची बाजू घेतली तर चीनला
राग. आणि चीनची घेतली तर भारताचा आसूड. त्यातल्या त्यात आर्थिक आणि असंख्य संकटांचा
ससेमिरा. देशवासियांचे जीवनमान उंचावण्यासाठी आजवर ठोस प्रयत्न न झाल्याने परिस्थिती
अतिशय गंभीर झाली आहे. याची जाणिव एकेडी यांना आहे. त्यामुळेच त्यांनी सावधगिरी
आणि अतिशय हुशारीने एक एक पाऊल पुढे टाकण्याचे निश्चित केलेले दिसते. सख्खा शेजारी,
विश्वासू, नेहमी मदतीला धावणारा आणि कपटी नसलेल्या भारताला अधिक जवळ करण्याचा
त्यांचा पवित्रा आहे. एकेडी यांच्या शिष्टमंडळाने भारत दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी
मूर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर, वरिष्ठ अधिकारी यांची भेट
घेतली. या दौऱ्यानंतर ते समाधानाने लंकेत गेले आहेत.
एकेडी यांच्या भेटीमुळे दोन्ही
देशांच्या संबंधांमध्ये नवी उर्जा आणि गतिशीलता येण्याची अपेक्षा आहे. आर्थिक
भागीदारीत गुंतवणूक प्रणित वृद्धी आणि संपर्कव्यवस्थेवर भर देण्यात आला आहे. भौतिक, डिजिटल आणि
ऊर्जा कनेक्टिव्हिटी हे दोन्ही देशांच्या भागीदारीचे प्रमुख स्तंभ असतील. विद्युत
ग्रीड कनेक्टिव्हिटी आणि बहु-उत्पादन पेट्रोलियम पाईपलाईन्स स्थापन करण्यासाठी
दोन्ही देश काम करणार आहेत. लंकेतील सामपूर सौर ऊर्जा प्रकल्पाला भारत गती देणार
आहे. श्रीलंकेच्या ऊर्जा प्रकल्पांना एलएनजीचा पुरवठा, द्विपक्षीय व्यापाराला
चालना, आर्थिक आणि तंत्रज्ञान सहकार्य करार (ईटीसीए) लागू करण्याबाबत सकारात्मक
चर्चा झाली आहे.
भारताने श्रीलंकेला आतापर्यंत ५ अब्ज डॉलर्स पत मर्यादा आणि अनुदान
दिले आहे. श्रीलंकेच्या सर्व २५ जिल्ह्यांमध्ये भारताचा सहयोग आहे. माहो ते
अनुराधापुरम रेल्वे सेक्शन आणि कनकेसन्थुराई बंदर यांची सिग्नल प्रणाली
पुनरुज्जीवित करण्यासाठी अनुदान सहाय्य देण्याचा निर्णय भारताने जाहीर केला आहे. शैक्षणिक
सहकार्याचा भाग म्हणून जाफना आणि श्रीलंकेच्या पूर्व भागातील विद्यापीठांमधील २०० विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती, पुढील ५ वर्षात १५०० श्रीलंकन नागरी सेवकांना भारतात प्रशिक्षण, गृहनिर्माणाबरोबरच
नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधांसाठी कृषी, दुग्धोत्पादन
आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात पाठबळ देणार आहे. श्रीलंकेतील वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल
ओळख प्रकल्पासाठी भारत भागीदारी करणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांचे सुरक्षा हित
एकमेकांशी निगडित आहे. याबाबत एकेडी आणि मोदी यांनी सहमती दाखविली आहे. सुरक्षा
सहकार्य कराराला त्वरीत अंतिम स्वरूप देण्याचा निर्णय या भेटीत झाला आहे. ही अतिशय
महत्त्वाची बाब आहे. हिंद महासागरात हायड्रोग्राफीवर सहकार्य करण्याचा निर्णयही
धोरणात्मक आहे. या भेटीनंतर मोदी म्हणाले की, कोलंबो सुरक्षा परिषद हे प्रादेशिक
शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. याअंतर्गत सागरी
सुरक्षा, दहशतवादाचा बिमोड, सायबर सुरक्षा, तस्करी आणि
संघटित गुन्हेगारीविरोधात लढा, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या
बाबींमध्ये श्रीलंकेला सहाय्य पुरवले जाईल.
भारत आणि श्रीलंकेतील जनतेच्या संबंधांचे मूळ हे आपल्या संस्कृतीमध्ये
आहे. जेव्हा भारताने पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तेव्हा श्रीलंकेत त्याचा
आनंद साजरा झाला. नागापट्टिनम-कनकेसंथुराई फेरी सेवा आणि चेन्नई-जाफना हवाई
संपर्कामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच सांस्कृतिक संबंधही मजबूत झाले आहेत. आता रामेश्वरम आणि तलाईमन्नार दरम्यान फेरी सेवा तसेच बौद्ध सर्किट आणि
श्रीलंकेच्या रामायण ट्रेलच्या माध्यमातून पर्यटनातील अफाट क्षमता साकारण्यासाठी
काम सुरू केले जाणार आहे. मच्छिमारांच्या उपजीविकेशी संबंधित समस्यांवरही चर्चा करुन
मानवतावादी दृष्टिकोन अवलंबण्यावर सहमती झाली आहे. भारताला आशा आहे की, श्रीलंका
सरकार तमिळ लोकांच्या आकांक्षा पूर्ण करेल. श्रीलंकेच्या राज्यघटनेची पूर्ण
अंमलबजावणी आणि प्रांतीय परिषदेच्या निवडणुका आयोजित करण्याप्रति त्यांच्या
वचनबद्धतेची पूर्तता करतील. राष्ट्र उभारणीच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये भारत एक
विश्वासू आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून उभा राहील, अशी ठोस ग्वाही भारताने एकेडी
यांना दिली आहे.
भगवान गौतम बुद्धांना बोधी वृक्षाच्या छायेत ज्ञान प्राप्त झाले त्या
बोधगया या पवित्र स्थळी एकेडी यांच्यासह शिष्टमंडळाने भेट दिली. श्रीलंकेचा वापर
भारताविरुद्ध करु दिला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही एकेडी यांनी दिली आहे. कारण,
हंबनटोटा बंदराचा विकास करुन त्याचा वापर लष्करी हेतूने करण्याचा चीनी कावा
श्रीलंकेला लक्षात आला आहे. तसेच, अवास्तव कर्जाच्या विळख्यात पाडून श्रीलंकेवर
वर्चस्व गाजविण्याचा चीनचा हेतू आहे. याने एकेडी सावध झाले आहेत. म्हणूनच सजगपणे निर्णय
घेताना कुठलीही चूक होणार नाही याची खबरदारी एकेडी बाळगत आहेत. अदानी समूहाच्या
श्रीलंकेतील प्रस्तावित प्रकल्पांच्या आसपासच्या मुद्द्यांबद्दल कोणतीही स्पष्टता
दौऱ्यात आली नाही. अदानींच्या प्रकल्पांचे श्रीलंकेत पुनरावलोकन केले जात आहे. कोलंबो
बंदरात टर्मिनल विकसित करण्याची बोलीही अदानींनी लावली आहे.
मच्छिमार आपल्या पाण्यात घुसखोरी करीत असल्याचा आरोप दोन्ही देश करतात.
मच्छिमारांना पकडतात. दोन्ही देशांच्या भांडणात सागरी संसाधनांचा नाश होतो आहे. ही
सुद्धा चिंतेची बाब आहे. तर श्रीलंकेच्या बंदरांमध्ये चिनी जहाजे डॉकिंग करत आहेत
हा भारतीय सुरक्षेला धोका आहे. दूरदृष्टीकोनातूनच भारत आणि श्रीलंका यांना आपले
संबंध दृढ करावे लागणार आहेत. तेच शहाणपणाचे आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सूत्रे
हाती घेऊन चीनच्या महासत्ता वाटचालीवर वरवंटा फिरविण्याची चिन्हे आहेत. हे लक्षात
घेऊनच चीनने अन्य देश आणि तेथील बाजारपेठांकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे काही
देशांशी चीनने सलगी दाखविली तरी वेळीच शहाणे होण्याची गरज आहे. भारत आणि चीन यांना
हे लक्षात आले आहे. एकेडी यांच्या दौऱ्याचा हाच अन्वयार्थ आहे.
--
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि
पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348
--
आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा
--
माझे WhatsApp चॅनल फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v
--
International, South Asia, India, Sri Lanka, AKD, Anura Kumara Dissanayake, Visit, Policy, Foreign Relation,
छान लेख
उत्तर द्याहटवा