ट्रम्प पर्वाचे प्रश्र्नोपनिषद! (नवशक्ती)

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. अतिशय स्फोटक अशी प्रतिमा असलेले ट्रम्प पुन्हा सत्तेत का आले? सत्ताधारी कमला हॅरीस यांचा पराभव का झाला? ट्रम्प यांची ध्येयधोरणे काय असतील? आगामी काळात भारतासह जगभर काय परिणाम होतील?

भावेश ब्राह्मणकर

जगातील बलाढ्य राष्ट्र असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विराजमान होणार आहेत. अमेरिकनांनी दिलेला कौल स्पष्ट झाला आहे. सत्ताधारी डेमोक्रेटिक पक्षाला जनतेने नाकारले आहे. त्यामुळेच साडेचार वर्षांच्या कालावधीनंतर ट्रम्प पुन्हा सत्तेत आले आहेत. मात्र, पहिल्यांदा सत्तेत आलेले ट्रम्प आणि आताचे यात कमालीचा फरक आहे. त्याचे संदर्भही वेगळे आहेत आणि परिणामही. महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष निवडीचा जगभरातील विविध क्षेत्रावर परिणाम होतो. आताही तो होणारच आहे. तत्पूर्वी ट्रम्प का आले, हॅरिस का पराभूत झाले हे पाहणेही महत्वाचे आहे.

ट्रम्प यांना २९४ (५०.८ टक्के) तर हॅरिस यांना २२३ (४७.५ टक्के) इलेक्टोरल मते मिळाली आहेत. विजयासाठी २७० मतांची आवश्यकता होती. हॅरिस यांच्यापेक्षा ३.२ टक्के अधिक मते मिळवून ट्रम्प यांनी परिवर्तन घडवून आणले आहे. सत्ताधारी पक्षाला पराभवाची धूळ का चाखावी लागली याची अनेक कारणे आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडन यांची प्रतिमा, त्यांचे वयोमान, त्यांचा कारभार हे सारे आहेच. पण, अमेरिकेचे अध्यक्ष कमकुवत असल्याने त्याचे प्रचंड परिणाम अमेरिकन जनतेला भोगावे लागले, हे ठसविण्यात ट्रम्प यशस्वी ठरले. बायडेन यांनी पुन्हा उमेदवारी करण्याचा घेतलेला निर्णयही पक्षाच्या अंगलट आला. आणि शेवटच्या क्षणी माघार घेत हॅरिस यांना चाल देण्यात आली. पण, ती बाब फारशी योग्य ठरली नाही. कमी कालावधीत स्वतःला सिद्ध करणे हॅरिस यांना अवघड बनले. विशेष म्हणजे, ट्रम्प हे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करतानाच राष्ट्राध्यक्षपदासाठी आपण कसे योग्य आहोत, हे ठसविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यात त्यांना यश आले. अमेरिकन जनतेच्या भावना, अडी-अडचणींना साद घालतानाच जणू काही मी जादूची कांडी फिरवून सारे काही सूतासारखे सरळ करेन, हे सुद्धा त्यांनी बिंबविले. अमेरिकानांच्या रोजगारावर होत असलेला परिणाम, आक्रमण आणि वाढती महागाई यामुळे जनतेने ट्रम्प यांच्या पारड्यात मताचे दान टाकले. बायडेन यांनी जनतेच्या जिव्हाळ्याचे विषय हाताळण्यात कुचराई केली, असाच या निकालाचा अर्थ आहे. तसेच, ट्रम्प यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला हा सुद्धा या निवडणुकीला कलाटणी देणारा ठरला. ट्रम्प यांच्या कानाला बंदुकीची गोळी लागली. त्यातून रक्तस्त्राव झाला. कानाला पट्टी बांधलेली आणि त्याच्या आजूबाजूला असलेले रक्त अशा अवस्थेत ट्रम्प जनतेसमोर गेले. त्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. शिवाय हॅरिस यांना कुठलीही संधी न देता ते आक्रमकपणे प्रचार करीत राहिले. हॅरिस या बाहेरच्या आहेत हे अमेरिकनांवर बिंबविण्याची त्यांची खेळी परिवर्तन घडविणारी ठरली. बायडेन यांच्या नेतृत्वातील कारभार, शेवटच्या क्षणी मिळालेली उमेदवारी, ट्रम्प यांची रणनिती भेदण्यात आलेले अपयश आणि अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका ठळक करण्यात हॅरिस कमी पडल्या. सहाजिकच मतदारांनी ट्रम्प यांच्या झोळीत दान टाकून सत्तांतर घडविले.

ट्रम्प यांच्या विजयाने अमेरिकनांचे सर्व प्रश्न चुटकीसरशी निकाली निघतील असे नाही. कारण, २०१७ ते २०२१ या काळात ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होते. मात्र, ट्रम्प यांच्या ध्येयधोरणांचा आणि निर्णयांचा मोठा परिणाम तेथे होणे अपेक्षित आहे. किंबहुना त्याचे धक्के देशोदेशी बसणार आहेत. अमेरिकेत रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. बाहेरच्या देशातील व्यक्ती येतात आणि स्थानिकांचा रोजगार हिसकावतात हा तेथे कळीचा मुद्दा आहे. एच१बी व्हिसा द्वारे बाह्य देशातील कुशल कामगार, तंत्रज्ञ, इंजिनीअर, कर्मचारी हे अमेरिकेत वास्तव्य करतात. आणि आता तोच तेथे अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. ट्रम्प यांनी यासंदर्भात कठोर निर्णय घेतला तर भारतासह अनेक देशातील तरुणांवर संक्रांत ओढावण्याची चिन्हे आहेत. केवळ नव्याने अमेरिकेत येणाऱ्या नाही तर सध्या याच व्हिसावर तेथे वास्तव्य असलेल्यांना मायदेशी परत जाण्याची नामुष्की ओढावू शकते. महागाईने अमेरिकेला ग्रासले आहे. मिळकतीपेक्षा खर्च अधिक होत असल्याने नागरिकांचे आर्थिक संतुलन बिघडले आहे. परिणामी, आर्थिक आघाड्यांवर कठोर निर्णय ट्रम्प यांना घ्यावे लागतील.

ट्रम्प यांच्या विजयाने पर्यावरण विश्वात खळबळ उडाली आहे. कारण, जागतिक हवामान बदलाच्या संकटाबाबत झालेला पॅरिस आंतरराष्ट्रीय करार ट्रम्प यांनी लाथाडून लावला होता. विशेष म्हणजे, याच महिन्यात अझरबैजान येथे जागतिक हवामान परिषद (कॉप२९) होत आहे. हवामान बदल ही समस्याच नाही आणि त्यास अमेरिका जबाबदार कशी अशी ठाम भूमिका ट्रम्प यांनी यापूर्वीच घेतली आहे. त्यामुळे महासत्ता अमेरिकाच या परिषदेतून बाहेर पडली तर सारेच बारगळल्यात जमा होणार आहे. ही बाब वैश्विक चिंतेची आहे. कारण, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अनेक अहवालांनी हवामान बदलाच्या तीव्रतेची आणि त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची वेळ निघून गेल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आपली वाटचाल ही विनाशाकडेच असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.


ट्रम्प यांच्या विजयाने सर्वात मोठा झटका बसला आहे तो चीनला. त्यांना याचा अंदाज आलाच होता. कारण, चिनी उत्पादनांसाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करायची असेल आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन द्यायची असेल तर बाहेरच्या देशातून येणाऱ्या उत्पादनांना लगाम घालण्याचाच सक्षम पर्याय उरतो. ही बाब लक्षात घेऊनच चिनी उत्पादनांवर कठोर आयात शुल्क लावले तर त्याचे असंख्य धक्के सहन करणे चीनला अवघड जाणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच भारतीय बाजारपेठेत अधिकाधिक शिरकाव करण्यासाठी चीनने भारतासोबतचा सीमा प्रश्न तात्पुरता निकाली काढला आहे. सध्या चीनमध्ये महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचा प्रश्न उग्र झाला आहे. ट्रम्प यांच्या धडाकेबाज निर्णयांनंतर चीन आणखी संकटात जाऊ शकतो.

ट्रम्प यांच्या ध्येय-धोरणांचा भारतावरही मोठा परिणाम अपेक्षित आहे. सद्यस्थितीत भारत-अमेरिका यांच्यात २०० अब्ज अमेरिकन डॉलर एवढा व्यापार होतो. अमेरिकन उत्पादनांवर भारताने लावलेले आयात शुल्क कमी करावे अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली तर भारताला मोठ्या महसूलावर पाणी सोडावे लागू शकते. त्याचा परिणाम देशातील विकासकामे आणि विविध घटकांवर होणार आहे. अमेरिकन उत्पादनांच्या मूल्यावर परिणाम झाल्याने देशांतर्गत उद्योग आणि व्यवसायालाही फटका बसणार आहे. संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात भारताला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

रशिया-युक्रेन आणि इस्त्राईलचे हमास, लेबनॉन, इराण यांच्याशी घमासान युद्ध चालू आहे. या युद्धांना पुर्णविराम देण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले आहे. आता तसे करण्याची वेळ आली आहे. त्यात ते यशस्वी होतात की नाही हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे. तसेच, ट्रम्प यांनी गर्भपातावर बंदी घालण्याचे आदेश काढले तर त्यात नवल राहणार नाही. अर्थात त्यावेळी अमेरिकन महिलांची भूमिका काय असेल, त्या आक्रमक होतील का, आंदेलने घडतील का, हे सुद्धा महत्वाचे आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर देशोदेशीच्या शेअर बाजारांवर परिणाम दिसून आला आहे. म्हणजेच, आर्थिक गुंतवणूकदारांवरही तेथील निवडणुकीचा प्रभाव आहे. यापुढील काळात ट्रम्प हे रौद्र रुप दाखवितात की अक्रास्ताळेपणाचा प्रत्यय देतात की बेधडक घोषणांचा धडाका लावून अनेकांची झोप उडवितात की दूरगामी विचार करुन निर्णयांचे बीज रोवतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, देशाला पहिली महिला अध्यक्ष करण्याचा आणि इतिहास घडविण्याची संधी अमेरिकनांनी हुकविली आहे. याचा अर्थ काय? महिलेचे नेतृत्व स्वीकारण्यास जनता तयार नाही की अन्य काही?

--

bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी व पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार
मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

International USA America President Donald Trump Kamala Harris Election Results 

टिप्पण्या

  1. भावेश, तुझा अभ्यास खूपच आहे. तुला लिखाणाचे मर्म गवसले आहे. मुद्देसूद लिखाण आणि प्रवाही मांडणी या मुळे तुझे लेख वाचनीय आहेत. खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशिर्वाद.
    मकरंद भारद्वाज

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)