संसदीय कामकाज व्हायला हवे (नवशक्ती)

एखाद्या देशाशी थेट युद्ध करण्याऐवजी अप्रत्यक्ष युद्धाची अनेकानेक आयुधे उपलब्ध झाली आहेत. संसदीय कामकाजाला भूसुरुंग लावण्याचे शस्त्र त्यापैकीच एक आहे. गेल्या १०-१५ वर्षातील भारतीय संसदेचा इतिहास काय सांगतो?

भावेश ब्राह्मणकर

सीमेवर सैनिक आणि शस्त्रास्त्रांसह युद्ध करण्याचा प्रघात आजच्या आधुनिक युगात मागे पडला आहे. शत्रूला समजणारही नाही अशा पद्धतीने त्याच्यावर भले मोठे अदृष्य आघात करणे, त्याला नामोहरम करणे, सर्वाधिक क्षती पोहचविणे किंवा पार वाताहत करणे अशा प्रकारच्या अत्याधुनिक युद्धशास्त्राचा सर्वत्र बोलबाला आहे. सायबर हल्ला हे त्यातील सर्वाधिक चर्चिले जाणारे शस्त्र आहे. मात्र, त्यापलिकडेही अनेक आयुधे आहेत. ज्याचा वापर अतिशय चपखल पद्धतीने केला जात आहे. खासकरुन गेल्या काही दशकातील भारतीय संसदेच्या कामकाजाचा आढावा घेतला तर ते प्रकर्षाने समोर येईल.

भारतीय लोकशाही बळकट होण्यामध्ये संसदीय कामकाज अतिशय महत्वाचे आहे. जनतेने निवडून दिलेले खासदार देश की बडी पंचायतमध्ये येतात. सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही एकाच ठिकाणी जमतात. देशाचा गाडा योग्य पद्धतीने सुरू राहण्यासाठी, चुकत असेल तर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी, सरकारचे धोरण काय आहे, वादग्रस्त प्रकरणात सरकारची बाजू काय आहे, आगामी काळासाठी सरकारचे काय नियोजन आहे, नवीन कायदे करणे, जुन्या कायद्यांमध्ये सुधारणा करणे, कामकाजात सुसूत्रता आणि सुधारणा करण्यासाठी विशेष आदेश काढणे या आणि अशा बहुविध बाबींसाठी संसदीय कामकाज अतिशय महत्वाचे ठरते. भविष्याचा विचार करुन राजधानी दिल्लीत भव्य संसद भवन नुकतेच उभारण्यात आले आहे. त्यामुळे संसदीय कारभाराला गती येईल अशी अपेक्षा आहे. मात्र, इतिहास काय सांगतो? वास्तव काय आहे?

हिवाळी, पावसाळी आणि अर्थसंकल्पीय असे तीन प्रकारचे संसद अधिवेशन होते. सर्वसाधारणपणे प्रत्येक अधिवेशन हे सरासरी दीड महिने तरी चालावे अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात वर्षभरामध्ये ८० ते १०० दिवसांचेही कामकाज होत नसल्याचे दिसून येते. याचा थेट आणि मोठा फटका देशाच्या विकासाला बसतो आहे. हे कामकाज न होण्यामागे राजकारण मुख्य असले तरी त्याला अनेक कंगोरे आहेत. विशेष म्हणजे, संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रकाशित होणारे खळबळजनक अहवाल, कारवाई आणि बातम्या यांचा वाटा मोठा आहे. आताचेच उदाहरण घ्या, उद्योगसम्राट गौतम अदानी यांच्याविरुद्ध लाच प्रकरणी अमेरिकेत गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे पडसाद सध्या उमटत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून संसदेचे कामकाज ठप्प झाले आहे. विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे तर सत्ताधाऱ्यांनी याप्रकरणी ठोस आश्वासन न दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. अशाच प्रकारे गेल्या अनेक संसद अधिवेशनांमध्ये गोंधळ झाला आहे. मणिपूर हिंसाचार, हिंडनबर्गचा अदानी अहवाल, गलवान खोऱ्यातील संघर्ष, माधवी बूच प्रकरण या आणि अशा कितीतरी प्रकरणांचे पडसाद उमटले. अपेक्षित कामकाज झाले नाही. वारंवार संसद तहकूब करण्याची नामुष्की ओढावली. प्रसंगी अनेक खासदारांचे निलंबनही करण्यात आले. रडतखडत चाललेल्या कामकाजाने देशाच्या विकासकार्यावरही विपरीत परिणाम झाला आहे.

सर्वसाधारणपणे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संसदेचे कामकाज चालते. त्यात दुपारी १ ते २ अशी जेवणाची सुटी असते. शनिवार आणि रविवार संसदीय कामकाज नसते. म्हणजेच सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवसच कामकाज असते. त्यातही एखादा सण किंवा उत्सव आला तर तेव्हाही कामकाज बंद असते. असे असले तरी विहित वेळेत लोकसभा किंवा राज्यसभेचे काम पूर्ण क्षमतेने होत नाही. विशेष म्हणजे, संसदेच्या कामकाजावर प्रति मिनिटाला तब्बल अडीच लाख रुपये खर्च होतात. म्हणजेच, एक तासाला जवळपास दीड कोटी रुपये खर्ची होतात. हा खर्च संसदेचे कर्मचारी, अधिकारी, अधिवेशन काळात दिल्या जाणाऱ्या सुविधा, वाहनांचा वापर, खासदारांचा भत्ता यावर असतो. गेल्या दोन दिवसात काहीच काम झाले नसल्याने किती कोटींचा फटका देशाला बसला याचा अंदाज येऊ शकतो. हे पैसे करदात्यांकडचेच आहे.



संसदेचे कामकाज प्रभावी न होण्यास सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही जबाबदार आहेत. मात्र, दोघांनाही त्याचे काहीच सोयरसूतक वाटत नाही. आपल्या वर्तणुकीमुळे किंवा आडमुठेपणामुळे आपल्या देशाची अपरिमीत हानी होते आहे, याची जाणिव त्यांना नाही. मतदारांनी आणि देशाने जो आपल्यावर विश्वास दाखविला आहे त्यास आपण जागतो आहे की नाही याचा विचारही करण्यास त्यांना वेळ नाही. गेल्या वर्षी एकाच दिवसात तब्बल ७८ खासदारांचे निलंबन करण्याचा विक्रमही नोंदला गेला. काँग्रेसचे खासदार सध्या संसद चालू देत नाही असा आरोप भाजप करीत आहे. मात्र, २०१२ मध्ये कोळसा खाण प्रकरणावरुन भाजप खासदारांनी सलग १२ दिवस संसदेचे कामकाज बंद पाडल्याची नोंद आहे.

१९९२ मध्ये संसदेचे कामकाज ८० दिवस चालल्याची नोंद आहे. त्यानंतर गेल्या तीस वर्षातील चित्र निराशाजनक असेच आहे. लोकशाही सुदृढ व्हावी असे वाटत असेल तर त्यासाठी संसदेचे कामकाजही भक्कम, पारदर्शी आणि सुरळीत सुरू राहणे आवश्यक आहे. केवळ निवडणुका घेऊन काहीच होणार नाही. सत्ताधारी आणि विरोधक यांनी परिपक्वता दाखवून देशहिताचा विचार करायला हवा. सत्ताधाऱ्यांनी सत्तेची मस्ती अंगी न लागू देणे आणि विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध ही भूमिका सोडून द्यायला हवी. संसद अधिवेशनाच्या तोंडावर प्रसिद्ध होणाऱ्या खळबळजनक अहवालांमागे काय गौडबंगाल आहे, याची सुदधा पडताळणी करायला हवी. अर्थात त्याची दखल घ्यायची असे नाही तर कायदेशीर आणि अन्य पर्यायांचाही विचार व्हायला हवा. अहवालांमुळे थेट संसद अधिवेशन बाधित होणे हे देशासाठी अतिशय मारक आहे. यामुळे संसदेतील अनेक मुद्दे प्रलंबित राहतात, खासदारांना त्यांचे प्रश्न विचारता येत नाहीत, अनेक ध्येय-धोरणांवर टीका-टीपण्णी होत नाही, नवे कायदे आणि नियम मंजूर होत नाहीत की एखाद्या विषयावर सखोल आणि सांगोपांग चर्चा होत नाही. हे सारेच अतिशय चिंताजनक असे आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा परदेशात प्रसिद्ध होणाऱ्या खळबळजनक अहवालांचे टायमिंग, त्याद्वारे केले जाणारे लक्ष्य, त्याचे संभाव्य परिणाम हे सारेच विचार करण्यासारखे आहे. गेल्या काही वर्षातील अनुभव तर तेच सांगतो आहे. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे प्रमुख अस्त्र संसदेत असले तरी त्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्नही सत्ताधारी जाणिवपूर्वक करतात. अशाने तात्पुरती सोडवणूक होत असली तरी त्यातून देशाचे मात्र मोठे नुकसान होत आहे. परवा संविधान दिनानिमित्त देशभरात जोशपूर्ण कार्यक्रम झाले. मात्र, याच संविधानात संसदीय कामकाजाचाही उल्लेख आहे. त्याचा अंगीकार आपण कधी करणार आहोत?

--

bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.
मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--



India, Parliament, Politics, Democracy, Session, Sansad, Country, Development, Loksabha, Rajyasabha,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)