लोकहिताचे भांडवल हरवले (नवशक्ती)

लोकहिताचे भांडवल हरवले 

टाटा उद्योग समुहाची धुरा सांभाळणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने आपल्यातला माणूस हरपल्याची भावना जवळपास सर्वांचीच आहे. आजवर अनेक उद्योगपती गेले पण त्यावेळी असे झाले नाही. टाटा त्याला अपवाद ठरले. कारण त्यांची कार्यशैली, विचार, नम्रता, वागणूक आणि साधेपणा. असा व्यक्ती कोट्यवधीत एखादाच असतो. आपण आता त्यालाच मुकलो आहोत.

भावेश ब्राह्मणकर

सामान्य कामगारांच्या रांगेत उभे राहणे, त्यांच्यासोबत जेवण घेणे आणि संपूर्ण दिवस त्यांच्याबरोबर राहून सेवानिवृत्ती घेणे...

२६-११च्या दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेल बाहेर उभे असलेले, आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी तिळतिळ तुटणारे, मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाचा आधारवड बनणारे, मोठ्या हिमतीने कोट्यवधी खर्चून हॉटेल पुन्हा सेवेत आणणारे...

पावसात स्कूटरवर जाणाऱ्या त्रिकोणी कुटुंबाकडे पाहून नॅनो कारचे स्वप्न पाहणारे आणि ते प्रत्यक्षात आणणारे...

डोकोमो कंपनीला ७६०० कोटी रुपयांचे देणे टाटांना होते. सरकारने परवानगी नाकारली. अखेर कोर्टात जाऊन त्यांनी हे देणे दिले...

अत्यंत प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरविण्यासाठी ब्रिटनचे युवराज चार्ल्स यांनी आमंत्रित केले... पण, आपल्या लाडक्या कुत्र्याची तब्ब्येत बरी नसल्याने पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाही, असे नम्रपणे पत्राद्वारे कळविणारे...


ही सारी उदाहरणे आहेत ती ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची. त्यांच्या निधनाने आपल्या सर्वांचीच किती मोठी हानी झाली आहे हे मोजता येणार नाही. मोठ्यांपासून लहानग्यांपर्यंत सर्वांसोबत असंख्य आठवणींनी रतन टाटा यांचे जीवन समृद्ध बनले. म्हणूनच ते सामान्यातले असामान्य होते. त्यांना प्रत्यक्ष भेटता किंवा पाहता आले नाही किंवा त्यांच्याशी बोलताही आले नाही, असे असतानाही सर्वच क्षेत्रातील व्यक्तींचा कंठ दाटून येतो हीच टाटा यांची खरी कमाई आहे. त्यांच्याविषयी वाटणारा आदर आणि आपुलकी ही अलौकिक आहे. आपल्याच घरातील व्यक्ती दूरच्या प्रवासाला निघून गेल्याची भावना देशभर पहायला मिळणे, हा तसा दुर्मिळ योगच. तोच रतन टाटा यांच्या निधनाने अनुभवास आला.

उद्योगपतीच्या घराण्यात जन्म झालेली व्यक्ती म्हणजे काही तरी वेगळीच असते. तामझाम, बडेजाव, अधिकार गाजवणे, इतरांना तुच्छ लेखणे या आणि अशा कितीतरी बाबी आपल्याला सहज दृष्टीस पडतात. मात्र, रतन टाटा त्याला अपवाद ठरले. बॉम्बे हाऊसमध्ये त्यांची एण्ट्री अगदीच सामान्यांसारखी असायची. लिफ्टमधून जाण्यासाठी ते रांगेत उभे रहायचे. अब्जावधीची उलाढाल असलेल्या कंपनीचे मालक असे साधेसुधे कसे असू शकतात यावर अनेकांचा विश्वास बसायचा नाही. इतकेच काय तर, एकदा ते बॉम्बे हाऊसमध्ये आले आणि त्याचवेळी पावसामुळे एक भटका कुत्रा सुरक्षेसाठी हाऊसमध्ये शिरला. हेच निमित्त ठरलं कुत्र्यांसाठी स्वतंत्र खोली तयार करण्याचे. भारत किंवा जगाच्या कॉर्पोरेट जगतात कदाचित हे पहिलेच भटक्या कुत्र्यांसाठी हक्काचे आश्रयस्थान असेल. भूतदया म्हणजे नक्की काय याचा प्रत्यय रतन टाटा यांच्या आयुष्यातून मिळतो.

जगातील १००हून अधिक देशांमध्ये टाटा उद्योग समुहाचा विस्तार आहे. अब्जावधींची उलाढाल आहे. असे असतानाही त्यांनी हे कधी मिरवले नाही की तसा प्रयत्नही केला नाही. चहामध्ये साखर मिसळावी आणि तिला गोडपणा आणावा अगदी तसेच टाटा होते. भलेही ते टाटा समुहाची धुरा सांभाळत होते पण त्यांनी त्यांच्या बोलण्या किंवा वागणातून कधीही, कुणालाही त्याची जाणिव करुन दिली नाही. आपण आपले काम चोख करावे, या विचाराने ते कार्य करीत. इतरांनाही तसे करायला सांगत. किंबहुना करुन घेत.

वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी टाटा समुहातून सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारणपणे अशा दिवशी कॉर्पोरेटसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी बोलवून, आपल्या प्रतिष्ठेचे प्रदर्शन करीत आणि माध्यमांना मुलाखती देत तो दिवस सेलिब्रेट केला जातो. पण रतन टाटा यांनी त्यांच्या विचारसरणीला अनुसरुनच जे केले ते कल्पनातीतच होते. पुण्यातील टाटा मोटर्सच्या कारखान्यात ते आले. कामगारांसोबत दिवसभर राहिले. त्यांच्याशी गप्पा, चर्चा केल्या. त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत फोटो काढले. कँटीनमध्ये रांगेत उभे राहिले. कामगारांसोबतच जेवण घेतले. किती नशीबवान असतील ते कामगार? आज किती जणांना असे वाटत असेल की आपण त्यावेळी तेथे हवे होतो?

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात अतिरेकी ताज हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी विध्वंस घडवला. हॉटेलची नासधूस तर केलीच पण कर्मचारी आणि हॉटेलमध्ये असलेल्या ग्राहकांचाही जीव घेतला. काही जखमी झाले. अशावेळी हॉटेलचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी जीव वाचविण्यासाठी पळून गेला नाही. शेवटपर्यंत ते झटत राहिले, हॉटेलमधील प्रवासी आणि ग्राहकांची सेवा करीत राहिले. कारण की, टाटा उद्योगाप्रती असलेले समर्पण आणि उद्योगाकडून मिळणारी वागणूक. रतन टाटा यांच्या विचारांमुळे कंपनी किती उच्च पातळीवर कार्य करु शकते याचा हा वास्तुपाठच नाही का?

मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलने आजवर लाखो रुग्णांवर अत्यंत माफक आणि निशुल्क दरात उपचार केले आहेत. हे कार्य आजवरही सुरूच आहे. यापुढेही राहिल. देशाच्या अनेक भागात असेच हॉस्पिटल उभारुन तेथेही देशसेवा करण्याचा निर्णय टाटा समुहाच्या बांधिलकीचे दर्शन घडवितो. आरोग्य क्षेत्रातील या कार्याची तर मोजदादही करता येणार नाही. त्यामागे होते ते रतन टाटाच.

भारतातील, आशिया खंडातील किंवा जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत आजवर कधीच टाटा दिसले नाहीत. यापुढेही दिसणार नाहीत. कारण, त्याची अहमहमिका त्यांना कधीच नव्हती. आपले जे काही आहे ते समाजासाठी हीच धारणा घेऊन ते जगले. त्यामुळेच सेवानिवृत्तीनंतर ते अगदी छोट्याशा फ्लॅटमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात ना त्यांची गडगंज संपत्ती आहे, ना धन. हीच रतन टाटा यांची खरीखुरी श्रीमंती आहे.

टाटा मोटर्स ही कंपनी डबघाईला आली. त्यामुळे ती विक्री करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. रतन टाटांनीही होकार दर्शविला. ब्रिटनच्या विख्यात फोर्ड कंपनीचे मालक बिल फोर्ड यांच्याकडे टाटा मोटर्सच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव घेऊन स्वतः टाटा शिष्टमंडळासह गेले. त्यावेळी फोर्ड हे अपमान करण्याच्या स्वरात म्हणाले की, मोटारीचा व्यवसाय हा येड्यागबाळाचे काम नाही. ज्ञान नसताना तुम्ही तो का चालवला?’ अत्यंत जिव्हारी लागावे असे हे वाक्य होते. मात्र, रतन टाटा हे तेथून परतले. टाटा मोटर्समधील दोष दूर करत त्यांनी अत्यंत भरभराटीचे दिवस आणले. टाटा इंडिका या कारने भारतासह परदेशातही जलवा दाखविला. त्याचनंतर २००८ मध्ये फोर्ड कंपनीच्या शिष्टमंडळाने रतन टाटा यांची भेट घेऊन जग्वार अँड लँड रोव्हरचा व्यवसाय विकत घेण्याची विनंती केली. टाटा यांनी अपमानाची परतफेड न करता त्यांना चांगली वागणूक दिली. तो व्यवसाय खरेदी केला आणि कंपनी यशस्वी करुन दाखविली.

निवृत्तीनंतर टाटा यांनी तरुणांसोबत वेळ घालविण्याला, त्यांना समजून घेण्याला अधिक प्राधान्य दिले. म्हणूनच अनेकानेक स्टार्टअपमध्ये त्यांनी गुंतवणूक केली. त्यातून नफा मिळावा हा हेतू नाही तर सर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणाऱ्या संकल्पनांना बळ देण्यासाठी आणि तरुणांना प्रेरीत करुन पुढे जाण्यासाठी. अनेकांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजनच म्हणता येईल.

कुत्र्यांवर त्यांचे जिवापाड प्रेम. म्हणूनच कुत्र्यांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेला, स्टार्टअपला त्यांनी मुक्त हस्ते मदत केली. वृद्धांसाठी कार्य करणाऱ्या नवोन्मेषी कंपनीलाही त्यांनी पाठबळ दिले. जीवदयेचा हा वास्तुपाठ त्यांची करुणाच प्रतित करतो.

राजकारण्यांपासून चार हात लांब राहून आणि सर्व सरकारांशी चांगले संबंध ठेवून टाटा यांनी जी कार्यशैली प्रदर्शित केली ती कल्पनेपलिकडचीच आहे. माझे कुणाशी किती घनिष्ट संबंध आहेत आणि आपला उद्योग वाढविण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल, हा विचारही त्यांच्या आसपास फिरकला नाही. भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले तो काळ भारतीय उद्योगांची खरी परीक्षा घेणारा होता. टाटा यांनी ती संधी मानून आपल्या उद्योग समुहासह देशालाही पुढे नेले. मीठापासून ते सॉफ्टवेअरपर्यंत सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या टाटा उद्योग समुहाने कमावलेला विश्वास हीच त्यांची खरी ओळख आहे. आणि तोच विश्वास प्रदान करण्यात रतन टाटा यांचा सिंहाचा वाटा आहे. नफा, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी उद्योग नाही तर त्यातून समाज आणि देशसेवा करता येते, हे रतन टाटा यांनी दाखवून दिले. त्यांच्याविषयी लिहिण्या, बोलण्यासाठीही शब्द थिटे पडतात यातच त्यांची उंची आणि कारकीर्द लपलेली आहे. त्यांच्यासारखी व्यक्ती पुन्हा होईल की नाही हाच खरा प्रश्न आहे.

--

bhavbrahma@gmail.com
लेखक मुक्त पत्रकार आहेत

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Industrialist Ratan TaTa Industry Trust Chairman Legend Welfare Socialwork common man Icon 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)