तिसऱ्या महायुद्धाची वाढती भीती (नवशक्ती)

तिसऱ्या महायुद्धाची वाढती भीती 

इस्त्राइल-हमास, इस्त्राइल-लेबनॉन, इस्त्राइल-इराण किंवा रशिया-युक्रेन या संघर्षामध्ये दररोज शेकडो निष्पाप मृत्युमुखी पडत आहेत. लहान मुले, स्त्रिया, पुरुष, वृद्ध असे कुणीही अपवाद नाही. विशेष म्हणजे, जगभरातील ७९५ कोटी लोकसंख्या हे सारे निमूटपणे पाहत आहे.

भावेश ब्राह्मणकर

तब्बल अडीच वर्षांपासून रशिया-युक्रेन तर गेल्या वर्षभरापासून मध्य पूर्वेत इस्त्राईलचा विविध देशांशी हिंसक संघर्ष सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत जवळपास १ लाख सैनिक आणि २० हजाराहून अधिक नागरिक ठार झाले आहेत. तर, इस्त्राईलचा विविध देशांशी असलेल्या संघर्षात १० हजाराहून अधिक सैनिक व नागरिकांचा बळी गेला आहे. (हानीची ही आकडेवारी प्रत्यक्षात अधिकच आहे) म्हणजेच जगातील या दोन द्वंद्वामध्ये सव्वा लाखाहून अधिक प्राण गेले आहेत. एवढे होऊनही युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत. उलट ती भडकतच आहेत. आणखी किती जणांचा जीव घेतला जाईल, हे कुणीही सांगू शकत नाही. ही बाब अतिशय गंभीर आणि चिंताजनक असली तरी जगभरातील १९० हून अधिक देश हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आहेत. हीच खरी शोकांतिका आहे.

आजवरच्या इतिहासात मानवी संहाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्धच नाही तर देशोदेशी झालेले हिंसक संघर्ष, नागरी उठाव, लष्करी कारवाया, क्रांती आदींमध्ये हजारो प्राण गेले आहेत. पहिले महायुद्ध (१५ ते ३० दशलक्ष), दुसरे महायुद्ध (५० ते ८५ दशलक्ष), रशिया नागरी उठाव (७ ते १२ दशलक्ष), चीनमधील मांचू संघर्ष (२५ दशलक्ष), मंगोलियातील उठाव (२० ते ५७ दशलक्ष), तैपिंग क्रांती (२० ते ३० दशलक्ष), चिनी क्रांती (८ ते ९ दशलक्ष), दुसरे कांगो युद्ध (३ ते ६ दशलक्ष).... ही अशी न संपणारी यादी आहे. आजवर कोट्यवधींचे प्राण गेले. सध्या दिवसाला शेकडो जणांचा बिनदिक्कतपणे जीव घेतला जातोय. हे कसले द्योतक आहे? ही कुठली प्रगती आहे? हा कोणता विकास आहे?

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली. जगात शांतता नांदावी, देशोदेशीचे तंटे सामंजस्याने मिटविले जावेत, सलोखा नांदावा हा हेतू त्यामागे होता. तो कितपत य़शस्वी झाला? खरंच संयुक्त राष्ट्र पारदर्शकपणे कार्य करते आहे का? या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे अतिशय निराशाजनक आहेत. संयुक्त राष्ट्राच्या स्थापने वेळी ज्यांचा हिरीरीने सहभाग होता त्यांचाच दबावही या संघटनेवर आहे. निधीच्या रुपाने त्यांचा सहभाग मोठा आहे. त्यामुळे त्यांचा वरचष्मा आहे. म्हणूनच ही संस्था तटस्थपणे कार्य करताना दिसत नाही. रशिया-युक्रेन आणि मध्य पूर्वेत बिनबोभाटपणे मानवसंहार सुरू असताना संयुक्त राष्ट्र संघटना कुठे आहे? तिने आजवर शांततेसाठी काय आणि किती प्रयत्न केले? हे प्रयत्न अयशस्वी झाले का? संघर्ष का थांबू शकला नाही? सामंजस्य किंवा शांततेसाठी काय पावले उचलली गेली? या प्रश्नांची उत्तरे म्हटलीत तर आहेत आणि नाही सुद्धा.

अविकसीत किंवा विकसनशील देशांमध्ये एखादी घटना घडली तर तातडीने त्या देशाला जाब विचारण्यासाठी संयुक्त राष्ट्रासह अन्य आंतरराष्ट्रीय संघटना सक्रीय होतात. त्यांना सळो की पळो करुन सोडतात. महासत्ता असलेले देश विविध निर्बंध आणून त्या देशाला जेरीस आणतात. मेटाकुटीला आलेला तो देश अखेर शरणागती पत्करतो. आणि त्यातच संयुक्त राष्ट्र आणि बडे देश धन्यता मानतात. हेच योग्य आहे का? आणि जे निर्बंधांना भीक न घालता बिनदिक्कतपणे काहीही करतात त्यांना रोखण्याचे काय? एकविसाव्या शतकात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रगती केल्याचा बोभाटा होतो आहे. पण, याच काळात माणुसकीचे काय? दिवसाढवळ्या, रात्रीबेरात्री, हॉस्पिटल्स किंवा शाळा, रहिवासी ठिकाणे यांच्यावर तोफगोळे, बॉम्ब, ग्रेनेड, क्षेपणास्त्र बिनदिक्कतपणे टाकले जात आहेत. जीव मुठीत धरणारे अनेकांच्या डोळ्यांदेखत निघृणपणे आणि तडफडून जीव सोडत आहेत. हे सारेच काळीज हेलावून सोडणारे आहे. असे असले तरी त्याचा पाझर कुणालाही का फुटत नाही?

समोरासमोर युद्ध करण्याचे दिवस आता नाहीत. अप्रत्यक्ष, ऑनलाईन पद्धतीने, थेट अवकाशातून हल्ले करीत निष्पापांचा बळी घेणारे आजचे आधुनिक संघर्ष हे प्रगतीचे लक्षण मानायचे की अधोगतीचे? पेजर, वॉकीटॉकी सारखी इलेक्ट्रॉनिक यंत्रे हातात घेतली आणि त्याचे एखादे बटण दाबले तर त्याचा अचानक होणारा स्फोट, त्यातून होणारी जिवीतहानी, जखमींचे आक्रोश, बचावलेल्यांच्या डोळे आणि मनातील भीती हे सारेच धस्स करणारे आहे. काही आठवड्यांपूर्वी लेबनॉनमध्ये झालेले हे हल्ले सर्व जगातच चिंता निर्माण करणारे ठरले. अनेकांनी मोबाईल, टॅब, लॅपटॉप, स्मार्ट वॉच, हेडफोन्स, कॅमेरासारख्या इलेक्ट्रॉनिक यंत्रांचा वापर करण्यापूर्वी चारदा विचार केला. आपले डिव्हाईस स्फोटकांनी भरलेले आहे की नाही? अशी सतत शंका येत राहिली. मध्य पूर्वेत तर हजारो नागरिकांनी काही दिवस इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस न वापरणे किंवा त्याला हात न लावण्याचा निर्णय घेतला. यातूनच आपल्याला त्याची भीषणता स्पष्ट होते.

मध्य पूर्वेतील संघर्ष दिवसागणिकच चिघळतो आहे. इस्त्राईल आणि हमास यांच्यात सुरू असलेले द्वंद्व पसरून लेबनॉन, इराण यांच्यापर्यंत जावून पोहचले आहे. ते आणखी तीव्र होतानाच अन्य शेजारी देशांमध्येही पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. यातूनच इस्त्राईल-अरब संघर्षाची चिंता सतावत आहे. केवळ मध्य पूर्वेपर्यंत हे युद्ध मर्यादित नाही. जागतिकीकरण, आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण यामुळे या युद्धाची झळ देशोदेशी पहचली आहे. भारतासारखा विकसनशील देश असो की श्रीलंकेसारखा अविकसीत देश किंवा मालदीवसारखा अत्यंत छोटा देश. साऱ्यांनाच कमी-अधिक प्रमाणात झळ सहन करावी लागत आहे. हा संघर्ष जितका सुरू राहिल तेवढ्या अडीअडचणी वाढणारच आहेत.

महासत्ता असलेल्या अमेरिकेची भूमिका या युद्धात महत्वाची ठरली आहे. अमेरिकेने युक्रेनला पाठिंबा दर्शविला असला तरी प्रत्यक्ष तेवढी सक्रीयता ठेवलेली नाही. कारण, समोर रशिया सारखा महाकाय देश आहे. आणि तोच पूर्वापार अमेरिकेचा शत्रूही आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांनंतर शीतसंघर्षात सुद्धा हेच दोन देश एकमेकांविरुद्ध उभे होते. नाटोसारख्या लष्करी संघटनेचा पाठिंबा युक्रेनला आहे. मात्र, नाटो देशांनी अद्याप सबुरी ठेवली आहे. नाटो देश रशिया विरोधात उतरले तर रशियाकडून थेट अण्वस्त्रांचा वापर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच या संघर्षाचे अद्याप महायुद्धात रुपांतर झालेले नाही.

मध्य पूर्वेत अमेरिकेचा इस्त्राईलला भक्कम पाठिंबा आहे. वेळेप्रसंगी युद्धनौका, हवाई दल, क्षेपणास्त्रे आदींचा वापर करण्याची सज्जता अमेरिकेने केली आहे. याची जाणिव इस्त्राईलच्या विरोधातील देशांना आहे. त्यामुळे सध्या हा संघर्ष इस्त्राईल-हमास, इस्त्राईल-लेबनॉन, इस्त्राईल-इराण असा आहे. अमेरिकेने पूर्वीपासूनच इराणला विरोध केला आहे. आता इराणने इस्त्राईलवर क्षेपणास्त्र डागल्याने अमेरिका या संघर्षात उतरण्याची दाट चिन्हे आहेत. तसेच, अरब देशही इस्त्राईलवर तुटून पडतील का ही सुद्धा भीती व्यक्त होत आहे. तसे झाले तर हे तिसरे आणि या पृथ्वीवरचे अंतिम युद्ध ठरण्याची दाट शक्यता आहे.

विस्तारवाद, अहंकार, स्पर्धा आणि हव्यास यामुळे अनेक देशांची भूमिका, आक्रमकता, धोरणे प्रभावित झाली आहेत. संवाद, चर्चा आणि सामंजस्याला काहीच थारा नाही. जगात सुरु असलेल्या युद्धांमध्ये एवढा मोठा नरसंहार होत असताना मानवाधिकार संघटना काय करते आहे? महिला व बालकांसाठी कार्य करणाऱ्या संघटना कुठल्या बिळात लपल्या आहेत? आंतरराष्ट्रीय न्यायालय काय करते आहे? जी२०, जी७ यासह ढीगभर संघटना का शांत आहेत? असे असंख्य प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. स्वार्थाच्या लवलेशाने माणुसकी सुद्धा लोप पावली आहे. या युद्धात दररोज शेकडो जखमी होत आहेत, अपंग बनत आहेत, काही गंभीर आजारांनी ग्रस्त होत आहेत, काहींना मानसिक विकारांनी घेरले आहे, हजारो नागरिक विस्थापित होत आहेत. हे सारे भयावह असले तरी काल्पनिक नसून प्रत्यक्ष घडते आहे. जगभर हे सर्व निमूटपणे पाहिले जात आहे. यातच सारे काही आले. भलेही मानव चंद्र किंवा आंतराळात जाण्याच्या विकास गमजा मारत असेल, पण माणसाला सुरक्षित जगण्याची मुभा न देण्याची वृत्ती याच मानवाला खुजे ठरवत आहे. हेच वैश्विक सत्य (Universal Truth) आहे.

bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो. 9423479348

International Crisis War Conflict Human Death Peace United Nations Truth Israel Hamas Lebanon Iran Russia Ukraine  

टिप्पण्या

  1. कोण होईल जगाचा शांतीदूत ?
    भावेशजी लेख अभ्यासपूर्ण लिहीला
    आहे. केवढे कौर्य हे.!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)