नाशिकमधील 'मेरी' नक्की काय काम करते?

महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट : सरकारी बांधकामांचा मेंदू

नाशिकमध्ये कार्यरत असलेली महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) ही केवळ धरणेच नाही तर राज्यभरातील बांधकामांचा मेंदू आहे. अतिशय शिस्तबद्ध असे मेरीचे कार्य आहे. संशोधन, अभ्यास आणि प्रशिक्षण या त्रिसूत्रीवर मेरीने आपले वेगळेपण प्रस्थापित केले आहे. ही संस्था नेमकी काय आहे आणि कशी कार्य करते याचा घेतलेला हा धांडोळा...

भावेश ब्राह्मणकर

राज्यभरात जी काही धरणे बांधली जातात त्याचे संपूर्ण श्रेय हे महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) संस्थेला जाते. केवळ एवढी एकच ओळख या संस्थेची राज्यभरात आहे. पण, मेरी केवळ तेवढेच कार्य करते का? तर नाही. मेरीच्या कार्याची ओळख करुन घेताना राज्याच्या विकासातील तिचे योगदान तर कळून चुकतेच शिवाय मेरीविषयी आपल्याला मोठा आदर वाटायला लागतो. एखादी प्रशासकीय संस्था मैलाचा दगड ठरावे, असे कार्य किती व कसे करु शकते, याचा प्रत्यय मेरी देत आहे. राज्यभरात रस्ते, धरण आणि इतरही बांधकामे सरकारला करावी लागतात. त्यामुळे या कामांसाठी अभ्यास आणि संशोधन करणारी मातृसंस्था असावी असा विचार पन्नासच्या दशकात आला. यावर बराच खल झाला. संस्था कशी असावी, काय नसावे आणि इतरही बाबींवर मोठा खल झाला. अखेर १९५९ मध्ये मेरीची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली. 

जमिनीचा पोत, बांधकामाच्या साहित्य आणि साधनांचा अभ्यास, तपासणी, महामार्ग, समुद्रकिनारा,रिमोट सेन्सिंग, पाणथळे, जलसंधारणाच्या ठिकाणची वाळू, तेथील खडकांची स्थिती अशा विविध बाबींवर संस्थेने कार्य करावे असे निश्चित झाले. पण, संस्थेच्या कार्याचा व्याप पाहता तिला पोषक असे वातावरण देणे आवश्यक होते. त्यामुळेच मेरीचे स्थलांतर १९७६ मध्ये नाशिकला करण्यात आले. भव्य अशा परिसरात मेरी स्थापन झाली. आता तर हा परिसर बहरला आहे. महासंचालक हे मेरीचे प्रमुख आहेत. मेरीमध्ये एकूण सात विभाग कार्यरत आहेत. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (सीडीओ), महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेटा), नियोजन आणि जल विज्ञान, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, धरण सुरक्षितता संघटना, गुणनियंत्रण मंडळे आणि राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती (टॅक) यांचा त्यात समावेश आहे. 

मेरीच्याच आवारात भूकंप पृथक्करण केंद्र साकारण्यात आले आहे. केवळ भारतातच नाही तर अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपाची नोंद या केंद्रात होते. तशी अधिकृत माहिती मेरीकडून दिली जाते. भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे आहे, किती तीव्रतेचा भूकंप आहे हे या केंद्रातून सरकारला कळविले जाते. राज्यातील भूकंप विषय माहितीची त्रैमासिक पत्रिकाही मेरीकडून प्रसिद्ध केली जाते. भूकंप आणि कंपनांचा बांधकामांवर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास मेरीकडून केला जातो. मेरीमध्ये सुदूर संवेदन तंत्राच्या सहाय्याने पीकक्षेत्र मोजणी, धरणातील गाळ सर्वेक्षण करणे, भूकंप लहरींविषयी माहिती संकलित करुन त्याचे पृथक्करण करणे, धरणाचा सांडवा, कालवे अशा भागांची प्रतिरुपे तयार करुन त्याचे परीक्षण करणे, धरणांवर वेगवेगळी उपकरणे बसविणे, रस्त्यांचे परीक्षण करणे, सिमेंट, वाळू, खडी, लोह आदी बांधकाम साहित्याच्या चाचण्या करणे, प्लेट लोड टेस्ट, काँक्रीट मिक्स डिझाइन आदींचे परीक्षण करणे, विविध जलाशयांवर उभारल्या जाणाऱ्या पुलाचा आराखडा तयार करणे आदी कामे मेरी कडून केली जातात. 

मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेमध्ये चार सुप्रिटेंडिंग इंजिनिअरच्या नेतृत्वाखाली जवळपास २० इंजिनिअर काम करतात. दगडी धरणे, मातीचे धरण, विमोचक, विद्युत गृहे, उपसा सिंचन आदींबाबतच्या संकल्पनांचे काम येथे केले जाते. जलसंपदा विभागातील मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या मुख्य भागाचे संकल्पन करणे, सांडवा, बंधारे, कालवे, वक्राकार दरवाजे, पाण्याचे नियोजन, पूर नियंत्रण, भूगर्भीय संशोधन आदी कामे या विभागात केली जातात. राज्य सरकारच्या बांधकाम, जलसंपदा व अन्य विभागांमध्ये दाखल होणाऱ्या इंजिनिअर्सला प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन १९६४ मध्ये स्टाफ कॉलेजची स्थापना मेरी मध्ये करण्यात आली. त्यानंतर या कॉलेजचे नाव मेटा असे करण्यात आले. एमपीएससीद्वारे सेवेत आलेल्या इंजिनिअर्सला मेटामध्ये प्रशिक्षण दिले जाते. पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे मेटाची तीन विभागीय कार्यालये आहेत. जलसंपदा व बांधकाम विभागातील इंजिनिअर्सच्या वेळोवेळी विविध परिक्षा मेटाकडून घेतल्या जातात. राज्यभरातील धरणांची सुरक्षितता वाहण्यासाठी १९८० मध्ये मेरीत स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला. धरणांना असणारे संभावित धोके ओळखणे व त्यावर उपाय शोधणे, हे या विभागाचे प्रमुख काम आहे. यासाठीच संस्थेकडून राज्यातील सर्व धरणांचे मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर परीक्षण केले जाते. त्याचा अहवाल तयार करुन तो सरकारला सादर केला जातो. 

जागतिक बँकेच्या सहकार्याने देशात राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प घोषित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत मेरीमध्ये १९९५ साली नियोजन व जलविज्ञान विभागाची स्थापना करण्यात आली. संस्थेची दोन मंडळ कार्यालये आणि ८ विभागीय कार्यालये आहेत. पाण्याविषयी माहिती संकलन करुन त्याचे विश्लेषण हा विभाग करतो. हवामानविषयक उपकरणे उभारणे आणि त्याची देखभाल दुरुस्ती विभाग करते. पाणी गुणवत्तेसाठी ३७ विविध मापदंड विभागाने निश्चित केले आहे. विभागाकडे एकूण १२ प्रयोगशाळा आहेत. 

नद्यांचे खोरेनिहाय माहिती संकलन, माहितीचे पृथक्करण, पाण्याचे नियोजन व पाणी उपलब्धता अभ्यास, २५ कोटीपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता, सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीमार्फत केले जाते. गुणनियंत्रण हा स्वतंत्र आणि मोठा विभाग आहे. एकूण ११ विभागीय कार्यालय आहेत तर पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे मंडळ कार्यालय आहे. बांधकामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणे, विविधबांधकाम साहित्याचा दर्जा तपासणी, मानकांप्रमाणे साहित्याची चाचपणी करणे, प्रकल्पाच्या ठिकाणी मृदा व काँक्रीटची तपासणी करणे हे या विभागाचे काम आहे. विविध स्तरावरील कामे व तेथे येणाऱ्या अडचणींवरील उपाय शोधण्याचे काम हा विभाग करतो. 

राज्यात जी काही धरणे बांधली गेली आहेत किंवा जी प्रस्तावित आहेत, त्याचा पूर्ण आराखडा मेरीनेच तयार केला आहे. तसेच, या धरणांच्या सुरक्षेची काळजीही मेरीकडूनच वाहिली जाते. बंधारे आणि कालव्यांचा आराखडाही संस्थाच तयार करते. राज्यातील सिंचन क्षेत्र निर्माण होण्यात मेरीचा मोठा वाटा आहे. जलसंपूर्ण प्रदेश होण्यासाठी आवश्यक जलसंधारणाच्या कामाची रुपरेषाच मेरी निश्चित करीत असल्याने तिचे मूल्य अनन्यसाधारण आहे. निमशासकीय आणि खासगी संस्थांकडून येणाऱ्या कामासंबंधीचे उपयोजित संशोधन व चाचणी हे सुद्धा मेरीत केले जाते. त्यामुळे मेरीचे कार्य हे राज्य आणि देशाच्या विकासावर मूलगामी परिणाम करणारे आहे. अभ्यास आणि संशोधनाद्वारे मेरी नवनवीन प्रकल्पांची पायाभरणी करीत आहे. भारतील उष्णप्रादेशिक हवामान संस्थेप्रमाणेच विविध विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांच्या सहयोगाने पीएचडी आणि संशोधनपर अभ्यासक्रमांना सुरुवात करायला हवी. याद्वारे तरुणांना संशोधनाकडे आकर्षित करतानाच नव्या पिढीला अनेकानेक संधीही प्राप्त होतील. त्याशिवाय राज्याच्या विकासात या संशोधनाचे योगदानही लाभू शकेल. 

bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो. 9423479348
--
Nashik Maharashtra Engineering Research Institute MERI Dam Water Construction Government Department  

टिप्पण्या

  1. अभ्यासपूर्ण आणि माहिती पूर्ण लेख👌👍💐

    उत्तर द्याहटवा
  2. मेरी या संस्थेची छान माहिती आपण दिलेली आहे. मेरी संस्थेने कोणते कार्य करायचे आहे . त्यांची जबाबदारी काय आहे याची सविस्तर माहिती यात आली आहे. या एकमेव असलेल्या संस्थेची सद्य स्थिती काय आहे. व त्यांच्या पूढील आव्हाने काय आहेत व या संस्थेची उपयुक्तता व त्या आक्षेप काय आहे याची माहीती मिळणे आवश्यक आहे . आणिबाणी तर केंद्र सरकारने महाराष्ट्रत असलेल्या या पांढ-या हत्तीची चिकित्सा करुन हे सरकारी अपव्यय बंद करण्याची सूचना कॅग या आर्थिक तपासणी संस्थे दिली होती. आजच्या स्थितीत महाराष्ट्र राज्यात मोठी धरणे व मध्यम नव्या धरणाची उभारणी न करण्याचे धोरण सरकारने घेतले आहे . मोठ्या धर्मापेक्षा जल संधारणा , माथा ते पायथा पाणी अडविण्याची व मिरविण्याची पध्दती जगभर उपयुक्त मानली जाते. अभ्यासाअंती मोठी धरणे पर्यावरणाचा नाश करतात व पाण्याचे समन्याययी वाटप होत नाहीं म्हणुन त्या साठीच्या पूर्वतयारी साठीची या संस्थेचे प्रयोजन रहात नाही. सध्या आटोकॅड सारख्या नव्या संरचना तयार करणारी तंत्र व संगणकिय आरेखना मुळे सेंट्रल डिजाइन आरगनाजेशन हे मोडित निघाले आहे मेरी तील या साठीचे अनेक मोठाली आस्थापने टोळीच्या किड्यांनी जाळी विकून भंगार गृहात रुपांतरीत केले आहे . हवे तेव्हा आधूनिक तंत्राने इंजिनिअर फ्राईंग शासन प्रगत अभियांत्रिकी व्यापारी संस्थांकडून कमी खर्चात आऊट सोरसीग करुन घेऊ शकते . महागडी उठाव नकाशे कंटूर मॅम वरून न करता थ्री डी तंत्रज्ञानाने संगणकाच्या साह्याने संगणकावर तयार होउ शकते त्यासाठी शेकडो एकर ची जमिन अडकविण्याची गरज नाही. शासनाने मेरी साठी दिडशे एकर वर्ग किलोमीटर ची जागा शहरात अडकवली आहे. तिचं कथा हायड्रो रिसर्च ची आहे. अजून एक दुर्दैवाची बाब म्हणजे मेरी तील तिने चारशे अभियंत्यांनी गेल्या २५ वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर मान्य होऊ शकेल असे एकही अभियांत्रिकी शोध , पर्यायी पध्दती, टेक्नोलाॅजी किंवा शोध लावलेला नाही. किंवा उपयुक्त निष्कर्षास येऊ शकेल असा अहवाल बनविला नाही.
    मेरी काॅलनीत मी दहा वर्षे रहात होतो. तेथे कार्यालयात रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम , श्रध्दांजली सभा, सांस्कृतीक स्पर्धा , असेच भरपुर उपक्रम जोरदारपणे होत होते . नव्याने भरती झालेल्या अभियंत्याने दक्षाणा दिल्या शिवाय येथिल परिक्षेत उतिर्ण होणे दूरापास्त होते . कोणी पाट बंधारे खात्यात गैरव्यवहार केले त्याची बदली मेरी येथे करण्याचा शिरस्ता गेली तीस वर्षे होता. हे एक आरामगृहा सारखे आहे . तसे येथे अनेक अध्यायात रेस्टहाऊसही आहेत. येथे उपयुक्त आणि अभियांत्रिकी रिसर्च असे काही नाही आणि नव्हते. हि वस्तुस्थिती आहे . ज्यांचे पोट पाणी त्याची या गोष्टीला सहमती नसणारच आहे . हा डोलारा कधीही कोसळुन पडेल. आधीच पाटबंधारे खाते बंद होण्याच्या मार्गावर आहे . त्या आधी मेरी सांस्कृतिक डोलारा नामशेष होणार आता.

    उत्तर द्याहटवा
  3. वरील टिपणीत स्पेलिंग चुकली आहेत धरणात ऐवजी धर्मा लिहिले गेले आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)