असा सुटेल बिबट्यांचा प्रश्न

असा सुटेल बिबट्यांचा प्रश्न

शहरे आणि गावांमध्ये तसेच मानवी वस्तीकडे बिबट्या येण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. दबा धरुन असलेल्या या बिबट्याने भीतीचे वातवरण तयार होते. बिबट्यांच्या या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.

भावेश ब्राह्मणकर

मार्जार कुळातला प्राणी असलेला बिबट्या हा वन्यप्राणी आहे. मात्र, गेल्या काही वर्षात त्याचा अधिवास धोक्यात आल्याने तो सातत्याने मानवी वस्तीकडे येण्याचे प्रकार घडत आहेत. यातूनच मग, मानव आणि वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत आहे. परिणामी, लहान बालकांना उचलून नेणे, बिबट्याच्या हल्ल्यात काही जण जखमी होणे, शेतपिकांची नासाडी होणे, बिबट्याचा वावर असल्याने त्या परिसरात शेतीची कामे खोळंबणे अशा कितीतरी बाबी घडत आहेत. यातूनच बिबट्यांविषयी कणव न वाटता थेट बिबट्यांचा संहार करण्याची मानसिकताही बळावत आहे. बिबट्या हा नकोसा होणे हे तसे आशादायी चित्र नक्कीच नाही. कारण, निसर्ग साखळीतील एक महत्त्वाचा घटक म्हणूनही बिबट्याचे अस्तित्व मोलाचे आहे. पण, विविध कारणांमुळे बिबट्यांचे घर असुरक्षित बनले आहे आणि यातूनच ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर प्रभावी तोडगा आवश्यक असला तरी ठिगळ लावण्यातच धन्यता मानली जात आहे. यातून हा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिक, नगर, पुणे, ठाणे, जळगाव, सांगली, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांमध्ये बिबट्या मानवी वस्तीकडे येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गोदावरी काठालगत असो की अन्य नद्यांच्या परिसरात बिबट्या सर्वसामान्यांना दृष्टीस पडतो आहे. भक्ष्य शोधण्यासाठी तो सैरावैरा होतो आहे. काही ठिकाणी तर तो विहीरीत पडलेलाही आढळून आला आहे. अखेर वनविभागाच्या मदतीने त्याला विहीरीतून सुखरुप काढण्यात येत आहे. आदिवासी भागांमध्येही बिबट्यांचा प्रश्न दिसू लागला आहे. ही बाब तशी चिंताजनकच आहे. कारण, आदिवासी बांधव हे शक्यतो वनांच्या क्षेत्रात किंवा सान्निध्यात राहतात. आणि तेथेही बिबट्यांचा प्रश्न निर्माण होणे हे तेथील वनांचे क्षेत्र कमी होण्याचेच द्योतक आहे. घनदाट जंगल विरळ झाल्याने हिरव्याकंच शेतांमध्ये बिबट्या येणे स्वाभाविकच बनले आहे. त्यामुळे बिबट्यांचा मानवी वस्तीकडे ओढा आणि त्यातून हल्ला-प्रतिहल्ला घडत आहे. पण, हे सारे असेच घडत राहणार का? या साऱ्या प्रकरणाची प्रामुख्याने जबाबदारी असलेला वनविभाग केवळ पिंजरा लावणे, बिबट्यांना पकडणे आणि सोडून देणे हेच सोपस्कार पार पाडणार का? हे प्रश्न उपस्थित होत आहेत.

बिबट्यांनी हल्ला केला आणि त्यात कुणी व्यक्ती जखमी झाली तर त्यास वनविभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते. पण ही भरपाई देण्यातच धन्यता मानावी का? नुकसान भरपाई देणे ही काही प्रभावी उपाययोजना नाही. बिबट्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई वनविभागाकडून वेळेवर दिली जात नसल्याच्या तक्रारी वारंवार होतात. पण, वनविभागाच्या कामकाजावर त्याचा काहीही फरक पडत नाही. घटना घडल्यानंतर सरकारी पद्धतीनुसार सर्व प्रक्रिया पार पडते. लोकांचे जनावर मेले की वनविभाग मदत देते. ही बाब योग्य नाही. मदत मिळविण्यासाठी वनविभाग किंवा सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची वेळ येणे हीच मोठी शोकांतिका आहे. खासकरुन दुर्गम भागात राहणाऱ्यांना वनविभागाकडे चकरा मारणे दुरापास्त बनते. यातूनच स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरते आणि नैराश्यही येते. परिणामी, वनविभागाला हक्काचे सहकार्य करणाऱ्या व्यक्ती दूरावतात. यातून वनसंपत्तीसह जैविक विविधतेचे अतोनात नुकसान होते. यासाठीच वनविभागाने काही नुकसान होऊ नये यासाठीच ठोस पावले उचलायला हवीत आणि घटना घडलीच तर तातडीने पंचनामा करुन मदतही द्यायला हवी.

ग्रामीण भागात गाय, बैल, शेळ्या यासारखी जनावरे ही मोकळी असल्याने ती बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनावरांना बंदिस्त ठेवणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने कांदा चाळ बनविण्यासाठी अनुदान दिले जाते. तसे शेळी ठेवण्यासाठीचे शेड बांधण्यासाठी वनविभागाने मदत केली तर त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. बिबट्या हा पूर्वीपासूनच मानवी वस्तीच्या परिसरातच राहत असल्याचे नमूद आहे. त्याला असुरक्षित भासले किंवा स्वसंरक्षणासाठी बिबट्या हल्ला करीत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे बिबट्या मानवी वस्तीत आला तर त्याला बंदिस्त कसे करता येईल, याचा विचार केला पाहिजे. एखाद्या खोलीत किंवा घरात बिबट्याला बंदिस्त करता आले तर त्याला पकडणे शक्य होते. अन्यथ मोठी कसरत करावी लागते. यातून काही आपत्ती किंवा दुर्घटना घडणार नाही, याचीही खबरदारी घेताना नाकी नऊ येते. बिबट्या मानवी वस्तीत आला तर त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडते. अशा प्रसंगी नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करणे आवश्यक असते. पण, वनविभाग आणि ग्रामस्थांमध्ये संवाद राहिला नाही तर फोटो काढण्याच्या नादातही काही अपप्रकार घडतात. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक यांच्यातील अत्यल्प संवाद हा अतिशय चिंतेची बाब आहे. बिबट्या आल्याची माहिती देण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर हे आमच्या हद्दीत नाही तुम्ही त्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांना फोन करा, असे सांगितले जात असल्यानेही वनविभागाविषयी तीव्र नाराजी आहे.

सर्वसाधारणपणे नैसर्गिक नियम पाळणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. म्हणूनच आपण जगताना इतरांनाही जगू देणे आवश्यक आहे. परदेशात वन्यप्राणी मानवी वस्तीत आले की त्यांना ठार केले जाते. आपल्याकडे पूर्वीपासून अनेक प्राण्यांना देवाचा दर्जा दिलेला आहे. गाव स्वच्छ ठेवले की बिबट्याचे गावात येण्याचे प्रमाण कमी होईल, असे बिबट्यांचा अभ्यास करणाऱ्या विद्या अत्रेय सांगतात. वनविभागाच्या आर्थिक मदतीने शेतकऱ्यांनी प्राण्यांसाठीचे निवारा शेड उभारले पाहिजे. बिबट्याविषयी भीती असण्याचे काहीच कारण नाही. तो आपल्यातीलच एक आहे. बिबट्या मानवी वस्तीत किंवा शहरात येतो. तेव्हा आपत्ती सदृश परिस्थिती निर्माण होते. बिबट्या आल्याचे कळाले तरी त्याला प्रत्यक्ष पकडण्यात आणि सर्व कारवाई होण्यात चार ते पाच तासांचा वेळ जातो. वनविभाग, अग्निशमन विभाग, पोलिस कर्मचारी असे तीन विभागांचे कर्मचारी घटनास्थळी असले तरी कुणी पुढाकार घ्यायचा आणि परिस्थिती हाताळायची याबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रम राहतो. त्यामुळे बिबट्याला पकडण्यात विलंब होतो. मात्र, याचवेळी काही दुर्घटना घडण्याचीही मोठी शक्यता असते. त्यामुळे या तिन्ही विभागातील अधिकाऱ्यांमधील विसंवाद दूर होणे गरजेचे असल्याचे अत्रेय सांगतात. या साऱ्याच सूचनांचा वनविभागाने गांभिर्याने विचार करायला हवा.

बिबट्यांविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी वनविभागाने मोहिम हाती घेतली होती. बिबट्यांच्या अभ्यासक विद्या अत्रेय यांनी तयार केलेली फिल्म शाळांमध्ये तसेच ग्रामसभेत दाखविण्यात येत होती. ही फिल्म पुढील काळात शाळा तसेच विविध गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये, ग्रामसभांमध्ये, चावडीवर तसेच अनेक शेतकऱ्यांच्या गटांना दाखविण्याचे नियोजन होते. टीव्ही, एलसीडी प्रोजेक्टर, लॅपटॉप याद्वारे ही फिल्म दाखविण्याला प्रारंभही झाला. त्याला चांगला प्रतिसादही लाभला. मात्र, ही मोहिम आता बंद पडली आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या आणि बिबट्या-मानव संघर्ष निर्माण होणाऱ्या भागात जनजागृतीची ही मोहिम पुन्हा राबविणे आवश्यक आहे.

तसे पाहता बिबट्या हा अत्यंत लाजाळू आणि घाबरट प्राणी आहे, हे कुणाला खरे वाटणार नाही. दाट वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच प्रत्येक बिबट्याला त्याचा स्वतंत्र अधिवास आवश्यक असतो. हा अधिवास मिळत नसल्यानेच बिबट्या मानवी वस्तीकडे येतो. त्यातच गावा परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते. या अस्वच्छतेवरच कुत्रे, मांजरी, डुकरे हे प्राणी आपली गुजराण करीत असतात. त्यामुळे गावाकडे आलेल्या बिबट्याला कुत्रे आणि डुकरांसारखे प्राणी भक्ष्य म्हणून मिळतात. त्यामुळे बिबट्यांचे गावाकडे येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून गावाचा परिसरही स्वच्छ ठेवणे अत्यावश्यक बनले आहे. यातूनच बिबट्यांचा त्रास हळूहळू कमी होऊ शकेल. यासाठी ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा.

बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने रेस्क्यू टीम तयार केल्या आहेत. प्रत्येक रेस्क्यू टीमला आधुनिक असे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यात अत्याधुनिक पिंजरा, टॉर्च, मेगाफोन, फ्लुरोसेण्ट जॅकेट, हेल्मेट, सर्च लाईट, दोर, जाळी, स्ट्रेचर, बॅफल बोर्ड, फायबर स्टीक, ट्रँक्विलायझर गन यांचा समावेश आहे. या टीमच्या सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. बिबट्याच्या सवयी, त्याचा संचार, बिबट्याला कसे पकडावे, गर्दीवर नियंत्रण कसे मिळवावे याचा प्रशिक्षणात समावेश असतो. एक टीम लीडर आणि चार सदस्य अशा या टीममुळे त्या-त्या विभागातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पाचारण करण्यात येते. मात्र, रेस्क्यू टीम सोडून अन्य इतर वन कर्मचाऱ्यांकडे अगदी साध्या स्वरुपाचीही माहिती नसते. बिबट्यांविषयीचे त्यांचे ज्ञान अद्ययावत केले जात नाही.

रेस्क्यू टीमसाठी अत्यंत सुसज्ज अशी एक रेस्क्यू व्हॅन उपलब्ध असते. सर्च लाईट, पिंजरा ठेवण्यासाठी प्रशस्त जागा, आवश्यक औषधे, अनाउन्सिंगसाठीची यंत्रणा अशी सुसज्ज 'अॅनिमल रेस्क्यू व्हॅन' आहे. या व्हॅनमुळे एखादा कॉल आल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने पोहचता येते. या रेस्क्यू व्हॅनमध्ये एखाद्या घटनेप्रसंगी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात संपुर्ण पिंजरा सामावू शकेल एवढी जागा आहे. तसेच वन विभागाच्या रेस्क्यू टीमला बसण्यासाठीही व्यवस्था आहे. रात्रीच्या वेळी शोध मोहीम सुकर होण्याच्या दृष्टीने गाडीच्या बॅटरीवरच चालू शकेल असा सर्चलाइट देण्यात आला आहे. या व्हॅनमुळे रेस्क्यू टीमची कार्यक्षमता अधिक वाढणार असून वन्य प्राण्यांच्या दृष्टीने ही व्हॅन उपयुक्त आहे. मात्र, या व्हॅनमधील काही साहित्य गेल्या काही वर्षात नादुरुस्त झाले आहे. ते दुरुस्त करुन मिळणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी निधी नसल्याचे वनकर्मचारी सांगतात.

बिबट्यांसाठीचे पुर्वीचे पिंजरे हे लोखंडी गजांचे होते. जेरबंद झाल्यामुळे संतप्त झालेला बिबट्या या गजांना धडक द्यायचा. त्यामुळे तो जखमी व्हायचा. बहुतांशवेळा रक्तही यायचे. त्यामुळे आधुनिक पिंजरा बनविण्यात आला आहे. त्यात बिबट्या जखमी होऊ नये याची विशेष काळजी घेतली गेली आहे. ट्रँक्विलायझर गनमुळे बिबट्याला त्वरीत पकडणे शक्य होते. कारण, या गनमुळे साधारण एक किलोमीटर अंतरावरुन बिबट्याला बेशुद्ध करता येणे शक्य आहे. प्रत्येक टीमला एक गन देण्यात आली आहे. यामुळे बिबट्याला पकडणे आणि त्याला पिंजऱ्यात सुखरुप ठेवणे शक्य झाले आहे.

बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात. आपल्या घराजवळ राहून बिबटे आपल्या पिलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांच्या पिलांना काही इजा होत असेल किंवा त्यांच्या अधिवासात हस्तक्षेप होत असेल तर बिबट्या स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो. त्यामुळे बिबट्या अत्यंत क्रूर असून तो मानवावर सतत हल्ला करतो असे म्हणणे चुकीचे आहे. बिबट्याला पकडून दूर कुठेतरी सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्याला कितीही दूरवर सोडले तरी तो पुन्हा आपल्या घराकडे, अधिवासाकडे येतो हे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे बिबट्याला शक्यतो त्यांच्या अधिवासात सोडायला हवे.

बिबटे राज्यात किती आहेत, याबाबत अनभिज्ञता आहे.  राज्यात बिबट्यांची गणना होणे आवश्यक आहे. १०० चौरसकिलोमीटर मध्ये पाच बिबट्या आणि पाच तरस राहत असल्याचे एका संशोधनातून सांगितले जाते. १८८३ चे नाशिकचे गॅझेटिअर पाहिले की लक्षात येते की, त्यावेळीही बिबट्यांची संख्या नाशिकमध्ये मोठी होती. तसेच, गावापरिसरात ये-जा करणाऱ्या बिबट्यांची संख्या पुर्वीपासूनच आहे. गणना करुन काही उपयोग होणार नाही. संख्या कळाली तरी त्यावर फार काही होऊ शकत नाही. पण, कुठल्या परिसरात बिबटे आहेत, याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी ही गणना महत्त्वाची आहे. ठराविक परिसरात असलेल्या प्राण्यांची गणना शक्य असते. जसे की व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्य. मात्र, बिबट्यांचा मुक्त संचार सुद्धा ही गणना करण्यात अडचणीचा ठरतो.

वनविभागाने हॅलो फॉरेस्ट ही हेल्पलाईन सुरू केली आहे. १९२६ हा वन हेल्पलाईनचा 'टोल फ्री' क्रमांक आहे. २४ तास सेवा असलेल्या या हेल्पलाईनचा मुंबईत नियंत्रण कक्ष आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आलेली माहिती ही उपवनसंरक्षक, मुख्यवनसंरक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनसचिव ते वनमंत्री अशा सर्वांपर्यंत पोहोचते. ज्या वनपरिसरातून ही माहिती मिळाली त्या भागातील उपवनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षकांच्या मोबाईलवर 'मॅसेज'द्वारे ती पोहोचावी, या पद्धतीने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या हेल्पलाईनला फोन केल्यानंतर शून्य क्रमांक दाबल्यास आपत्कालीन व्यवस्था, शिकार, वृक्षतोड, अतिक्रमण याविषयी, एक क्रमांक दाबल्यास ग्रीन महाराष्ट्र, ग्रीन आर्मी याविषयी, दोन क्रमांक वनविभागातील इको टुरिझम, जंगल सफारी आदीविषयी, तीन क्रमांक दाबल्यास वनविभागात व्यापार, गौण वनउपज, तेंदूपत्ता, सागवान याविषयी, चार क्रमांक दाबल्यास जंगल,  शेती नुकसान, वन्यप्राण्यांवर हल्ला आदीबाबत तर पाच क्रमांक दाबल्यास वने, वन्यजीवांबाबत तक्रारी देण्याची सुविधा आहे. मात्र, ही हेल्पलाईनच सर्वसामान्यांना माहित नाही. वनविभाग किंवा सरकार यांनी त्याचा प्रचार, प्रसार करायला हवा.

‘जगा आणि जगू द्या’ या नैसर्गिक सूत्राचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. पावसाचे प्रमाण कमी-अधिक झाल्याने त्याचा परिणाम बिबट्यांवर होतो. पाऊस कमी झाला तर शेतात पिके नसतात. त्यामुळे पाणी टंचाईचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पाणी किंवा भक्ष्याच्या शोधार्थ बिबटे मानवी वस्तीकडे येतात. वनविभाग आणि सरकारने या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहणे आणि ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. ते जोवर होत नाही तोवर हा प्रश्न कायम राहणार आहे. किंबहुना त्यात वाढच होणार आहे.

bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो. 9423479348

Leopard, Human Animal Conflict, Forest, Rescue, Wild, Environment, Issue, 


टिप्पण्या

  1. सुंदर लेख लिहिला होता भावेशजी

    उत्तर द्याहटवा
  2. Dear ....u r partly true....we can discuss issues raised by u....

    उत्तर द्याहटवा
  3. गावांमधील भटक्या कुत्र्यांनी चावलामुळे रॅबिट च्या आजाराने दरवर्षी वीस ते तीस हजार माणसे मरण पावतात. या भटक्या कुत्र्यांना पकडून जंगलामध्ये सोडून दिले तर बिबट्यांना भरपूर खाद्य मिळेल आणि ते मानवी वस्तीत येणे खूपच कमी होईल ,आणि कुत्री कमी झाल्यामुळे रेबीज आजारही कमी होईल. हजारो माणसांना हालहाल होऊन येणारा मृत्यू टळेल.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)