बांगलादेशच्या अस्थैर्याला कोण जबाबदार? पाक, चीन की भारत? (नवशक्ति)

बांगलादेशच्या अस्थैर्याला कोण जबाबदार? पाक, चीन की भारत?

हेडिंग वाचून कदाचित दचकला असाल ना! बांगलादेशमध्ये झालेले हिंसक आंदोलन, परागंदा झालेल्या पंतप्रधान, अस्थिर सरकार, लष्करी राजवट हे सारेच अनपेक्षित नक्कीच नाही. गेल्या काही महिने आणि दिवसातील घडामोडींमुळे ते अधिकच ठळक झाले होते. पाकिस्तान व चीनच्या साथीने हे घड(व)त गेले. तर, बांगलादेश व भारताने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.

भावेश ब्राह्मणकर

शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशमध्ये दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व अशा घडामोडी घडल्या. तरुण आणि नागरिकांच्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर थेट मायदेशातून पलायन करण्याची नामुष्की ओढावली. लष्कराकडे सर्व सूत्रे आली आहेत. आता हंगामी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तेथील परिस्थिती चिघळेल की शमेल हे यथावकाश स्पष्ट होईलच. मात्र, तेथील ही सद्यस्थिती का आणि कशी निर्माण झाली? तसेच त्यास कोण कारभीणूत आहे? याचा वेध घेणे अगत्याचे आहे.



दक्षिण आशियातील भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये अस्थिर सरकार, असंतोष, हिंसक आंदोलने, हुकुमशाही आणि लष्करी वरचष्मा दिसून येतो. पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, मालदीव, चीन या राष्ट्रांचे भारताशी सख्य नाही. केवळ भुतान हाच आपला शेजारी आणि दोस्त राष्ट्र आहे. अन्य शेजाऱ्यांमधील अस्थिरता ही चिंताजनक अशीच आहे. केवळ भारतात लोकशाही दृढ होताना दिसत आहे. बांगलादेशात गेल्या दोन दशकात लोकशाही बळकटीसाठी ठोस प्रयत्न झाले. यापुढेही तिथे लोकशाही नांदेल, असेच चित्र होते. मात्र, परवाच्या हिंसाचाराने त्यास तडा गेला आहे. आता तिथे हंगामी सरकार स्थापन होणार असले तरी नजिकच्या काळात लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन नवे सरकार सत्तेत येईल की लष्करी राजवट असेल हे महत्वाचे आहे.

बांगलादेशची निर्मिती होण्यास भारत कारणीभूत ठरला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुढाकारामुळे बांगलादेश नावाचे राष्ट्र जगाच्या पटलावर प्रकट झाले. १९७१च्या या घटनेने जगभरात नानाविध संदेश दिले गेले किंवा मिळाले. नवनिर्मित हा देश गुण्यागोविंदाने नांदेल, अशी आशा निर्माण झाली. मात्र, बांगलादेशचे राष्ट्रपिता समजले जाणारे शेख मुजीबूर रहेमान यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची लष्कराने निघृण हत्या केली. पुन्हा बांगलादेश संकटाच्या खाईत गेला. त्यानंतर रहेमान यांची कन्या शेख हसीना यांनी अवामी लीग या राजकीय पक्षाच्या माध्यमातून लोकशाही स्थापन होण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले. त्यात त्यांना हळूहळू यश आले. अखेर त्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्यांच्या विरोधक असलेल्या बांगलादेश राष्ट्रवादी पक्षाच्या खालिदा झिया यांनाही सत्तेत येण्याची संधी मिळाली. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून सलग हसीना या पंतप्रधान म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळात लोकशाही बळकट झाल्याचे सांगितले गेले. तसेच, तेथील बेरोजगारी कमी करुन कापड व्यवसायाला सुगीचे दिवस आले. पण, ही बाब फारशी प्रभावी ठरली नाही. तसेच, या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हसीना यांनी विरोधकांची मुस्कटदाबी केली आणि पारदर्शकपणे सर्व प्रक्रिया पार पाडली नाही, असे गंभीर आरोप झाले. खरे तर तेव्हापासून म्हणजे जानेवारी महिन्यापासूनच हसीना यांच्याविषयी असंतोषाचे वातावरण तापत होते. त्याची परिणीती आठव्या महिन्यात दिसली एवढेच.

बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील कुटुंबियांना नोकरीत आरक्षण देण्याचा मुद्दा अतिशय कळीचा ठरला. खरे तर ते फक्त निमित्त होते असे म्हणावे लागेल. बेरोजगारी, उपासमार, शैक्षणिक प्रश्न, अन्नधान्याची उपलब्धता, महागाई, नोकरी आदींमुळेही युवकांसह जनतेत असंतोष घुमसत होताच. जमाते ए इस्लामी या तेथील संघटनेने हसीना यांना जेरीस आणण्यासाठी विविध माध्यमातून वातावरण पेटविण्यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, या संघटनेचे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयशी साटेलोटे आहे. म्हणूनच हसीना यांनी या संघटनेवर बंदी घातली. त्यामुळे या संघटनेचे पदाधिकारी आणखीनच चेकाळले. त्यांनी आक्रमक होण्याचा पवित्रा घेतला. या साऱ्याला चीनची मदत लाभली. चीनने पाकिस्तानी आयएसआयच्या माध्यमातून बांगलादेशवर नेम धरला. पैसा, शस्त्र, प्रशिक्षण आणि अन्य बाबी चीनने चपखलपणे बांगलादेशात पुरवल्या. अर्थात हे सारेच छुपे असल्याने त्याचे पुरावे किंवा उघडपणे त्यावर भाष्य केले जात नाही.

पंतप्रधान हसीना यांनी गेल्या महिन्यात भारताचा दौरा केला. बांगलादेशची निर्मिती ही भारतामुळे झाली शिवाय भारतासारखे लोकशाही राष्ट्र हे विश्वासू आहे. म्हणून हसीना यांनी भारतासोबतचे व्यापार, संबंध सारे वाढविण्यावर भर दिला. तिस्ता नदीचे पाणी आणि त्यावरील धरण या प्रमुख उद्देशासह अन्य कारणांसाठी त्यांनी भारत दौऱ्यात गाठीभेटी आणि वाटाघाटीही केल्या. त्यानंतर त्या चीन दौऱ्यावर गेल्या. तिस्ताच्या प्रकल्पासाठी चीननेही बांगलादेशला निधीचे आमीष देऊ केले होते. मात्र, हसीना यांनी त्यास फारसा प्रतिसाद दिला नाही. चीननेही हसीना यांची जिरवण्यासाठी चाल खेळली. चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनी हसीनांना चीनमध्ये भेट दिली नाही. ही बाब हसीना यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे चीन दौरा अर्धवट सोडून त्या मायदेशी परतल्या. ही बाब चीनला चांगलीच खटकली. इवलासा देश आपल्याला वाकुल्या दाखवतो, या विचाराने ड्रॅगन आक्रमक झाला. गेल्या महिन्याभरात जो काही गोंधळ बांगलादेशात माजला किंवा झाला, त्या आगीत चीन आणि पाकिस्तानने सोयीसोयीने तेल टाकले. ही आग कशी भडकेल याची पुरेपूर व्यवस्था केली. यासाठी तेथील विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष बांगलादेश राष्ट्रवादी पक्ष, जमाते ए इस्लामी ही संघटना आदींचा अतिशय प्रभावीपणे वापर करुन घेतला. अखेर सत्ता उध्वस्त करण्याचा पाक-चीनचा डाव यशस्वी झाला. कारण, पाकिस्तानला १९७१चा हिशोबही चुकता करायचाच आहे. तर, भारताशी संख्य ठेवणाऱ्या बांगलादेशला आपल्या कुटील जाळ्यात ओढायचेच आहे.

आता आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल तो बांगलादेशच्या या स्थितीला भारत कसा आणि किती जबाबदार आहे? असा. शेजारी राष्ट्र आणि जवळपास ४ हजार किलोमीटरची भूसीमा लागून असल्याने भारताचा बांगलादेशशी घनिष्ट संबंध येतोच आणि आहे. जानेवारीपासून बांगलादेशात कुरबुरी, धुसफूस सुरू होत्या. मात्र, त्या एवढ्या मोठ्या होतील, याचा अंदाज भारताला आला नाही का? मार्चपासून जूनपर्यंत भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती हे लक्षात घेतले तरी जूनमध्ये नवे आणि तेच मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरही बांगलादेशातील वातावरणाची फारशी दखल घेतली गेली नाही का? भलेही हसीना यांचे सरकार आणि तेथील गुप्तहेर खाते त्यांना सद्यस्थिती अवगत करण्यात कमी पडले असेल, पण भारतीय गुप्तहेर काय करत होते? त्यांनी कुठल्याही बाबी भारत सरकारला कळविल्या नाही का? सीमा रेषेवरील सुरक्षा दलांना काहीच चाहूल लागली नाही का? भारत आणि बांगलादेशातील व्यापाराचे आकडे सांगतात की २०२०-२१ मध्ये १०.७८ अब्ज अमेरिकन डॉलर, २०२१-२२मध्ये १८.१४ तर २०२२-२३ मध्ये १५.९३ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी उलाढाल झाली. म्हणजेच, व्यापारी, आयात-निर्यातदार, ग्राहक, नोकरदार, अधिकारी हे सारेच कुठे ना कुठे गुंतलेले आहेत. त्यांच्याकडून कुणाला काहीच माहिती मिळाली नाही का? शिवाय भारत-बांगलादेशात यांच्यामध्ये थेट रेल्वे सेवाही आहे. असे असतानाही बांगलादेशच्या या स्थितीचा भारताचा अंदाज आला नाही की आपण त्याकडे डोळेझाक केली? बांगलादेशातील भारतीय दूतावास आणि त्यातील अधिकारी काय करत होते? त्यांनी काहीच पत्रव्यवहार, संभाषण भारत सरकारशी केले नाही का? जर भारत सरकारला हे सर्व कळाले होते तर त्यांनी तातडीने हसीना यांच्याशी त्यावर चर्चा का नाही केली? हे सारे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. शेजारी राष्ट्रांमध्ये भूतान नंतर केवळ बांगलादेश सोबतच भारताचे घनिष्ट संबंध आहेत. व्यापाराची उलाढाल दरवर्षी वाढतच आहे. चीनसारखा कुटील देश भारतविरोधी कारवाया करण्यासाठी भारताच्या शेजारी राष्ट्रांनाच गळाला लावतो आहे. हे माहित असूनही भारताचे हाताची घडी तोंडावर बोट नक्की काय सांगून जाते? हुकुमशाही आणि लष्करशाहीमध्ये जनतेची ससेहोलपट होते. त्यामुळे लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेला भारत हा बांगलादेशच्या असंतोषाला त्या देशाची अंतर्गत बाब आहे असे म्हणून गप्प बसू शकतो का? हे सारेच शंकास्पद आहे. जर बांगलादेशात स्थैर्य निर्माण झाले नाही तर त्याचे परिणाम भारतावर होणारच आहेत. रोजगार आणि अन्नाच्या शोधात अनेक लोंढे भारतात दाखल होण्याची भीती आहे. आणि हे लोंढे आपण कसे आणि किती रोखणार? त्यामुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर परिणाम होणार नाही का? शिवाय भारताच्या ईशान्येकडील राज्यात असलेल्या फुटीर गटांना आगामी काळात पाक-चीन हे बांगलादेशातून हवा देणार नाहीत का? जागतिकीकरण आणि उदारीकरणामुळे राष्ट्रा-राष्ट्रांचे अनेक पदर एकमेकाशी जोडले गेलेले असतात. पाक आणि चीनने जाणिवपूर्वक बांगलादेशची वाताहत घडवून आणली. पण, भारताने जाणते-अजाणतेपणी नक्की काय साध्य केले आहे?

bhavbrahma@gmail.com
संरक्षण
, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो. 9423479348

International India Bangladesh Crisis Pakistan China Relations 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)