राजनाथ सिंहांचा अमेरिका दौरा
राजनाथ सिंहांचा अमेरिका दौरा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे चार
दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या पोलंड आणि युक्रेन भेटीपाठोपाठ
हा दौराही अतिशय महत्त्वाचा आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक महत्वपूर्ण चर्चा
आणि करार होणार आहेत.
- भावेश ब्राह्मणकर
२२ ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन येथे चार
दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर पोहोचल्यानंतर तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधताना
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की, भारत आणि
अमेरिका एकत्रितपणे भक्कम शक्ती आहे
जी जगात शांतता, समृद्धी आणि स्थैर्य सुनिश्चित करू शकते. भारत आणि अमेरिका हे एकमेकांचे
नैसर्गिक सहयोगी आहेत त्यामुळे ते मजबूत भागीदार होणे साहजिक असून हे सहकार्य सतत वृद्धिंगत होत आहे, असे त्यांनी सांगितले. यातूनच या दौऱ्याचे महत्व अधोरेखित होते.
भारताला एक मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध राष्ट्र म्हणून विकसित करायचे आहे. त्यानुषंगाने सिंह
यांचा अमेरिका दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात भारत आणि अमेरिकेच्या वरिष्ठ
संरक्षण अधिकाऱ्यांनी दोन प्रमुख करारांवर स्वाक्षरी केली. पुरवठा व्यवस्थेची
सुरक्षा (SOSA) आणि संपर्क अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसंबंधी
कराराचा मसुदा याचा त्यात समावेश आहे. या कराराद्वारे संरक्षण उत्पादनांची
उपलब्धता विहित वेळेत होऊ शकणार आहे. खासकरुन भारतात निर्मिती होणाऱ्या संरक्षण
उत्पादनांसाठी आवश्यक विविध सुटे भाग आता मिळू शकतील. यामुळे देशांतर्गत
उत्पादनाला चालना मिळेल.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन
यांच्यासोबत होणारी द्विपक्षीय बैठक, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे राष्ट्रीय
सुरक्षाविषयक सहाय्यक जेक सुलिव्हन यांचीही भेट या दौऱ्यातील महत्त्वाच्या बाबी आहेत.
सध्या सुरू असलेल्या आणि भविष्यातील संरक्षण सहकार्यांबाबत अमेरिकेच्या संरक्षण
उद्योगासोबत उच्च-स्तरीय गोलमेज बैठकीचे अध्यक्षस्थान राजनाथ सिंह भूषविले. या
भेटीमुळे भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ आणि व्यापक
होईल अशी अपेक्षा आहे.
राजनाथ सिंह यांनी दौऱ्याच्या
पहिल्याच दिवशी वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय
सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांची भेट घेतली. सध्याची जागतिक भू-राजकीय
परिस्थिती आणि काही प्रादेशिक सुरक्षा विषयक मुद्द्यांवर त्यांनी यावेळी चर्चा
केली. भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहयोग
प्रकल्पांवर तसेच दोन्ही देशांचे उद्योग एकत्र काम करू शकतील अशा संभाव्य
क्षेत्रांवरही त्यांनी चर्चा केली. रशिया-युक्रेन युद्धा, इस्राइल-गाझा युद्ध यावर
प्रामुख्याने चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन दौरा का केला,
त्यातून काय साध्य होणार आहे, भारताची नक्की भूमिका काय आहे, याविषयी राजनाथ यांनी
सुलिव्हन यांना अवगत केले. भारत हा शांतताप्रिय देश आहे. त्यामुळेच रशिया आणि
युक्रेन या दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चा करायला हवी, गैरसमज दूर करायला हवे,
असा आग्रह भारताचा आहे. रशिया दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन तर युक्रेन
दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याकडे
मोदींनी याच भावना व्यक्त केल्या आहेत. रक्तपात, हिंसाचार आणि युद्धाने शांतता
प्रस्थापित होत नाही, आजवरचा इतिहास हेच सांगतो, हे सुद्धा राजनाथ यांनी स्पष्ट
केले. भारताने रशियाच्या विरोधी भूमिका घ्यावी यासाठी अमेरिका आग्रही आहे. मात्र,
संरक्षण, तेल आणि अन्य उत्पादने रशियाकडून भारताला मिळतात. रशियाशी असलेली मैत्री
घट्ट ठेवून सामंजस्याच्या पर्यायावर भारताने भर दिला आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी
वॉशिंग्टन डीसी येथे यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम, अर्थात भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी मंचाने आयोजित केलेल्या राउंड
टेबल (गोलमेज) बैठकीत अमेरिकेच्या संरक्षण उद्योगातील वरिष्ठ नेत्यांशी संवाद
साधला. या राउंड-टेबल बैठकीत अमेरिकेच्या संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील
कंपन्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. आत्मनिर्भरतेच्या वाटेवर असलेल्या भारताला
संरक्षण क्षेत्रात अनेकानेक शस्त्रास्त्रे आणि सुटे भाग हवे आहेत. अनेकदा सुटे भाग
मिळत नसल्याने ही उत्पादने तयार होत नाहीत. किंवा विहित मुदतीत ती ऑर्डर पूर्ण होत
नाही. त्यामुळे या बैठकीत खासकरुन अशा उत्पादनांवर चर्चा झाली. अमेरिकन कंपन्यांनी
भारतात उत्पादन निर्मिती करावी, त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असा
विश्वास राजनाथ यांनी या कंपन्यांना दिला आहे. तर, काही कंपन्यांनी त्यांचे
तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिल्यास या कंपन्यांबरोबर दीर्घ काळासाठी करार केला जाईल,
हे सुद्धा स्पष्ट केले.
भारत अमेरिकेच्या गुंतवणूक आणि
तंत्रज्ञान सहकार्याचे स्वागत करत असून, कुशल मनुष्यबळ, गतिशील एफडीआय (थेट परदेशी गुंतवणूक),
व्यापार स्नेही परिसंस्था आणि देशांतर्गत विशाल बाजारपेठेसह यामध्ये
सहभागी होण्यासाठी सज्ज असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नमूद केले. क्षमता
विकास, तसेच चिरस्थायी तंत्रज्ञान आणि औद्योगिक भागीदारीसाठी,
अमेरिकेच्या सहयोगाने संरक्षण क्षेत्राशी संबंधित विविध
क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी भारत उत्सुक आहे, जेणेकरून
भविष्यातील आव्हानांचा प्रभावीपणे सामना करता येईल असे ते म्हणाले. बैठकीनंतर,
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-अमेरिका व्यापार परिषदेच्या
शिष्टमंडळाची भेट घेतली.
५ हजाराहून अधिक वस्तूंचा समावेश
असलेल्या सकारात्मक स्वदेशीकरण सूची तसेच संरक्षणामध्ये ‘आत्मनिर्भरता’ साध्य
करण्यासाठी भारत सरकार ठोस पावले उचलत आहे. काही वर्षांपूर्वी असलेली ६०० कोटी
रुपयांची संरक्षण निर्यात आता थेट २१ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही निर्यात
यापुढील काळात वाढावी, यासाठी भारत आग्रही आहे. अमेरिकन कंपन्यांनी सहकार्य
केल्यास भारतीय संरक्षण उत्पादनांसाठी ते महत्वपूर्ण असणार आहे. खासकरुन अमेरिकन
तंत्रज्ञान भारतीय कंपन्यांना मिळावे किंवा अमेरिकन कंपन्यांनी भारतात उत्पादन
सुरू करावे, यासाठी भारत आग्रही आहे. यासंदर्भात राजनाथ यांचा हा दौरा मोलाचा
ठरणार आहे.
अमेरिकेत सध्या सार्वत्रिक निवडणूक
सुरू आहे. पुढील दोन महिन्यात तेथे नवे सरकार स्थापन होईल. सध्या सत्तेत असलेला डेमोक्रेटिक
पक्ष पुन्हा विराजमान होईल की सत्तांतर होऊन रिपब्लिकन पक्ष येईल, याचीही चाचपणी
राजनाथ या दौऱ्यात करीत आहेत. सत्तांतर झाल्यास डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष होतील.
त्याचा भारतीय संबंधांवर काय आणि किती परिणाम होईल, याचा अंदाजही भारताकडून घेतला
जात आहे. तर, डेमोक्रेटिक पक्षच कार्यरत राहिला तर व्यापार आणि संरक्षणासह कुठल्या
करारांना चालना द्यायची हे सुद्धा भारत निश्चित करीत आहे.
भू-राजकीयदृष्ट्या चीनची आक्रमकता
वाढत आहे. खासकरुन दक्षिण चीन, हिंद महासागर या परिसरात चीनच्या कुटील कारवाया
सुरू आहेत. त्यास लगाम घालण्यासाठी व्यूहात्मकदृष्ट्या काय कार्यवाही करता येईल.
शिवाय भारत, अमेरिकेसह अन्य देश एकजुटीने चीनच्या कुरघोड्यांना कसे निष्फळ ठरवतील,
याबाबतही राजनाथ चाचपणी करणार आहेत. महासत्ता असलेल्या अमेरिकेचा भारताला विविध
क्षेत्रात भक्कम पाठिंबा आवश्यक आहे. भारतीय नौदलासाठी
आवश्यक लढाऊ विमानांची खरेदी अमेरिकेकडून केली जाणार आहे. त्याची बोलणी अंतिम
टप्प्यात आहे. यासंदर्भातही राजनाथ यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यानंतर हा
करार लवकरच होईल, अशी खात्री आहे. भारताने रशियाऐवजी अमेरिकन संरक्षण उत्पादनांना
प्राधान्य द्यावे आणि ते खरेदी करावे, यासाठी अमेरिका आग्रही आहे. मात्र, सुरक्षेचा
विचार करता केवळ एकाच देशांची उत्पादने आणि शस्त्रास्त्रे घेण्याचे भारताने जाणिवपूर्वक
टाळले आहे. रशियाकडून पाणबुडी, फ्रान्सकडून राफेल ही लढाऊ विमाने, अमेरिकेकडून
रायफल्स घेणे हा त्याचाच एक भाग आहे. तसेच, भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानकडे अमेरिकन
बनावटीचीच शस्त्रास्त्रे आहेत. त्यामुळे तीच भारताकडे असतील तर त्याचा प्रभाव
पडणार नाही. ही बाब लक्षात घेऊन भारत विविध देशांकडून संरक्षण सामग्री घेण्यावर भर
देत आहे. तसेच, स्वदेशी बनावटीच्या संरक्षणसामग्रीला चालना दिली जात आहे. मात्र, अद्यापही
भारत या क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ शकत नाही. कारण, काही देशांकडे अतिशय प्रगत असे
तंत्रज्ञान आहे. ते अवगत करणे हाच आजच्या घडीचा पर्याय आहे. राजनाथ यांचा दौरा हा
केवळ संरक्षणच नाही तर भूराजकीय, व्यूहात्मक, शिष्टाई, परराष्ट्र संबंध, व्यापार
अशा विविध क्षेत्रांसाठी मोलाचा ठरणार आहे. अमेरिकन निवडणुका आटोपल्यानंतर नवीन सरकारसोबत
वेगाने संबंध वाढविण्याच्या दृष्टीनेही हा दौरा महत्त्वाचा आहे.
India, USA, International, America, Defence, Minister, Rajnath Singh, Tour, Visit, Cooperation, Agreements, Meet
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा