पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार? (नवशक्ती)

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार?

तब्बल अडीच वर्षांपासून युद्धाने होरपळणाऱ्या युक्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भेट देत आहेत. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर स्वतंत्र झालेल्या युक्रेनमध्ये भारतीय पंतप्रधान प्रथमच जात आहेत. गेल्या महिन्यात रशियाला जाऊन आलेल्या मोदींनी युक्रेनचा दौरा करण्याचा निर्णय का घेतला? यातून काय साध्य होणार आहे? जागतिक पातळीवर कुठला संदेश जाणार आहे? की रशिया-युक्रेन युद्ध मोदींकडून थांबवले जाणार आहे?

भावेश ब्राह्मणकर

तिसऱ्यांदा सत्तेत विराजमान झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम रशियाचा दौरा केला. त्यानंतर आता ते युक्रेनच्या भेटीवर आले आहेत. हा लेख आपण वाचत असताना मोदी युक्रेनमध्ये असणार आहेत. पोलंड आणि युक्रेन या देशांच्या अधिकृत भेटींसाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि पोलंड दरम्यान असलेल्या राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत असताना माझा हा पोलंड दौरा होत आहे. पोलंड हा देश मध्यवर्ती युरोपातील महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे. लोकशाही आणि बहुपक्षीयता यांच्याप्रती आपली परस्पर कटिबद्धता आपल्या नात्याला अधिक बळ देते. आपली भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मी माझे मित्र पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि राष्ट्रपती आंद्रेज डूडा यांच्या सोबतच्या बैठकींबाबत मी उत्सुक आहे. या दौऱ्यात मी पोलंडमधील उत्साही भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधणार आहे, असे मोदींनी म्हटले आहे.



युक्रेन दौऱ्याबाबत मोदींनी सांगितले की, पोलंड भेटीनंतर मी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या आमंत्रणाला मान देऊन युक्रेनला भेट देईन. भारतीय पंतप्रधानांची आतापर्यंतची ही पहिलीच युक्रेन भेट आहे. भारत आणि युक्रेन यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी आधी संवाद साधण्याच्या दृष्टीने तसेच सध्या सुरु असलेल्या युक्रेन विवादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या दृष्टीने माझे विचार सामायिक करण्याबाबत मी उत्सुक आहे. एक मित्र तसेच एक भागीदार म्हणून आम्हाला या भागात लवकरात लवकर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्याची आशा मोदींनी व्यक्त केली आहे. हा दौरा दोन्ही देशांतील व्यापक संपर्काची नैसर्गिक सातत्यता राखण्याचा मार्ग म्हणून काम करेल आणि येत्या काळात अधिक मजबूत आणि अधिक चैतन्यपूर्ण संबंधांचा पाया निर्माण करण्यात मदत करेल, असा विश्वास मोदींना वाटत आहे.

रशियन आक्रमणामुळे युक्रेनची भूमी युद्धज्वराने तप्त आहे. हे युद्ध थांबावे म्हणून प्रार्थना केल्या जात आहेत. अमेरिकेसह विविध देशांनी रशियावर निर्बंध लादले. भारत आणि रशिया यांची घट्ट मैत्री आहे. त्यामुळेच विविध क्षेत्रात व्यापार आणि आदान-प्रदान आहे. भारतानेही रशियाविरोधात भूमिका घ्यावी, असा आग्रह धरण्यात आला. मात्र, खनिज तेलासह विविध उत्पादने रशियाकडून खरेदी करणे भारताने सुरूच ठेवले आहे. अमेरिकेला खुशे करण्यासाठी रशियाला दुखावणे योग्य नसल्याचे भारताने दाखवून दिले आहे. युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा भारताने कधीही निषेध केला नाही किंवा संयुक्त राष्ट्रात रशियाविरोधात आणलेल्या ठरावांना पाठिंबाही दिला नाही. तसेच, जो वाद आहे तो सामंजस्य आणि चर्चेने सोडवावा, अशी ठाम भूमिका भारताने घेतली आणि ती वेळोवेळी मांडली आहे. गेल्या महिन्यातील मोदींच्या रशिया दौऱ्यावर काही देशांनी टीका केली. या दौऱ्याद्वारे भारताने रशियाशी आपले संबंध दृढ करतानाच व्यापार, संरक्षण आणि विविध क्षेत्रात वाढ करण्यावर भर दिला. याच भेटीत मोदींनी रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांना सांगितले की, बंदुकीच्या गोळीने सर्व काही साध्य होत नाही. बॉम्ब आणि युद्धाने शांतता प्रस्थापित होत नाही. त्यामुळे संवाद करावा, चर्चेवर भर द्यावा. या दौऱ्याचा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी तीव्र निषेध केला होता.  

गेल्या २५ वर्षांत भारत आणि युक्रेनमधील व्यापारी संबंधांमध्ये वाढ झाली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील व्यापार ३.३ अब्ज डॉलर अब्ज इतका होता. तर, रशिया आणि भारत यांच्यात सुमारे ६० अब्ज डॉलर्सचा व्यापार होता. २०३० पर्यंत भारत आणि रशियामध्ये १०० अब्ज डॉलर्सचा व्यापार होण्याची अपेक्षा आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताचा रशियासोबतचा व्यापार वाढला आहे. मात्र भारत युक्रेनला मानवतावादी मदत देत आहे. भारताने सुमारे १३५ टन माल युक्रेनला मदत म्हणून पाठवला. यामध्ये औषधे, ब्लँकेट, तंबू, वैद्यकीय उपकरणे आणि जनरेटरचा समावेश आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना भारतीय विद्यार्थीही तेथे अडकले होते. या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे चार हजार होती. या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात पोलंडने महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणूनच मोदी पोलंडला गेले. ४० वर्षात पोलंडला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. तर, गेल्या चार वर्षात मोदी आणि झेलेन्स्की यांची ही चौथी भेट आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.

रशिया दौऱ्यावर मोदी असतानाच युक्रेनमधील एका हॉस्पिटलवर भीषण हल्ला झाला. त्यात ३७ लहान मुले, माता, महिला आणि रुग्ण ठार झाले. जगभर त्याची निंदा झाली. आता मोदींच्या या दौऱ्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबेल का, या चर्चेला उधाण आले आहे. मात्र त्यात कितपत तथ्य आहे? अनेक तज्ज्ञांच्या मते यात सूतराम शक्यता नाही. कारण, सद्यपरिस्थिती आपण जाणायला हवी. अडीच वर्षांनंतरही युक्रेनने हार मानलेली नाही. उलट आता रशियाच्या विविध भूभागांवर कब्जा मिळविण्याचा पवित्रा युक्रेनने घेतला आहे. रशियाकडून ते नाकारले जात असले तरी युक्रेनकडून उपग्रह छायाचित्रांसह विविध पुरावे मांडले जात आहेत. अशा स्थितीत रशिया माघार घेण्याची शक्यता अतिशय दुर्मिळ आहे. मात्र, मोदींच्या या दौऱ्याला जगभर प्रसिद्धी मिळणार हे निश्चित.

रशिया-युक्रेन युद्धाच्या निमित्ताने जग दोन गटात विभागले आहे. अमेरिका, युरोपसह अन्य देश जे रशियाच्या मनमानीला विरोध करतात. तर, चीन, उत्तर कोरिया या देशांचा गट. जो रशियाचे समर्थन करतो आणि रशियाला शस्त्रास्त्रांसह विविध बाबी पुरवतो. भारतासारख्या देशाने या दोन्ही गटांपासून दोन हात लांब राहत शांतता आणि सामंजस्याची भूमिका मांडली आहे. सात-आठ दशकांपूर्वी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरु यांनी अलिप्ततावादी चळवळीला बळ दिले. शीत युद्धाच्या त्या कालखंडात बलाढ्य शक्तींसमोर भरडण्याऐवजी तिसरा मार्ग निवडला. आताही भारताने नेहरुंच्याच धोरणाचे बोट पकडल्याचे बोलले जात आहे.

पोलंड आणि युक्रेन दौऱ्यामागे मुख्य कारण हे व्यापार आणि संबंध वृद्धिंगत करणे हेच आहे. मध्य आणि पूर्व युरोपामध्ये भारतीय व्यापाराला चालना देण्यासाठी हे दोन्ही देश अत्यंत महत्वाचे आहेत. युद्धग्रस्त युक्रेनला विविध उत्पादनांची आवश्यकता आहे. भारतासाठी ती बाजारपेठ आहे. त्यामुळे या दौऱ्यातून दोन्ही देशांमध्ये व्यापारवाढ होणे हा उत्तम हेतू असल्याचे तज्ज्ञांना वाटते. युक्रेनचे सांत्वन करुन त्यांना धीर देण्याचा सोपस्कारही या दौऱ्याने पार पडणार आहे. भूभागाचा विचार करता युरोपात युक्रेनचे महत्व मोठे आहे. अडीच वर्षांच्या संघर्षानंतरही युक्रेन खचलेला नाही. त्यामुळे या देशाशी व्यापाराच्या माध्यमातून सख्य वाढविणे आणि भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणे हा या दौऱ्यामागचा मुख्य हेतू असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शिवाय रशियाला भेट देऊन अमेरिकेसह अन्य देशांची ओढावून घेतलेली नाराजी कमी करण्यासाठीही युक्रेन भेट मोलाची आहे. अमेरिकेत पुढील दोन महिन्यात नवे सरकार सत्तेत येईल. त्याचाही आगामी काळात रशिया-युक्रेन युद्धावर परिणाम होणार आहे.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन यांच्यासोबत ते द्विपक्षीय बैठक करतील. भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन असल्याचे भारताने म्हटले आहे. मात्र, मोदींचा युक्रेन दौरा आणि राजनाथ यांचा अमेरिका दौरा हा योगायोग नक्कीच नाही. भारतीय परराष्ट्र धोरणाचा तो एक भाग आहे. मोदी युक्रेनला का गेले यासंदर्भात भारताची भूमिका अमेरिकेला स्पष्ट करण्याचा इरादाही यामागे आहे.

--

bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो. 9423479348

India, PM, Narendra, Modi, Ukraine, Visit, Tour, War, Russia, Trade, Foreign, Relations, Affairs,  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)