भारतीय हिरे उद्योग आणि चीनचे कनेक्शन
भारतीय हिरे उद्योग आणि चीनचे कनेक्शन
सूरतमधील हिरे उद्योग १८ ऑगस्टपासून तब्बल १० दिवस बंद ठेवण्याची नामुष्की आली आहे. याचा तब्बल ८० हजाराहून अधिक कामगारांना थेट फटका बसला आहे. या उद्योगाचे आणि चीनचे मोठे कनेक्शन आहे.
भावेश ब्राह्मणकर
भारतातील हिरे उद्योग किती मोठा आहे, असा प्रश्न
तुम्हाला पडला असेल तर त्याचे उतर सोपे आहे. भारतातून परदेशात जी काही निर्यात
होते त्यात हिऱ्यांचा वाटा तब्बल १० टक्के आहे. तसेच, या उद्योगावर भारतातील तब्बल
४३ लाखांहून अधिक रोजगार अवलंबून आहे. तर, भारत हे हिरे कापणे आणि पॉलिश
करण्यासाठी जगातील सर्वात मोठे केंद्र आहे. जागतिक स्तरावर पॉलिश केलेल्या १० पैकी
तब्बल ९ हिरे भारतातील असतात. या आकड्यांवरुनच आपल्याला कळून चुकले असेल की महागडा
असलेला हा व्यवसाय भारतासाठीही किती मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. या व्यवसायातून कररुपाने
देशाला मोठी गंगाजळी प्राप्त होते. तसेच, परकीय मूल्यही पदरात पडते. रोजगारामुळे आर्थिक
चलनवलन मोठ्या प्रमाणात घडून येते. त्यामुळे सरकारला विविध माध्यमातून पैसा मिळतो.
अशा प्रकारच्या या महत्वपूर्ण उद्योगावर सध्या संकटाची काळी छाया दाटून आली आहे. आणि
त्याचा थेट संबंध चीनशी आहे.
विविध उत्पादनांची राक्षसी निर्मिती करणारा चीन आणि
भारताचे हिरे यांचा काय संबंध आहे, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण, हा संबंध
आहे. त्यामुळेच तर सूरतमधील हिरे उद्योग सध्या चिंतेत आला आहे. हा उद्योग १८
ऑगस्टपासून थेट १० दिवसांसाठी बंद राहणार आहे. यामुळे या उद्योगात काम करणाऱ्या ८०
हजाराहून अधिक कामगारांना थेट फटका बसणार आहे. कारण, रोजंदारीवर हे कामगार काम
करतात. दहा दिवस काम नसल्याने त्यांना पैसे मिळणार नाहीत.
चीन आणि अमेरिका हे दोन्ही देश भारतात तयार झालेल्या
हिऱ्यांची खरेदी प्रामुख्याने करतात. नैसर्गिकरित्या मिळालेल्या हिऱ्यांवर पैलू
पाडणे, त्यांना चकाकी आणणे ही कामे सूरतच्या हिरे उद्योगात चालते. भारतात
कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या निर्यातीपैकी एक तृतीयांश हिस्सा चीनचा
आहे आणि प्रामुख्याने हाँगकाँगमधून ते खरेदी केली जातात. मात्र, चीनकडून सध्या
मागणीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे मागणी नसेल तर पुरवठा करुन काय फायदा आणि
केला तरी त्याच्या भावावर मोठा परिणाम होतो. हा बाजारपेठेचा अलिखित नियम आणि गणित
आहे. मौल्यवान हिरे किती दिवस आणि किती संख्येने स्वतःजवळ सांभाळणार असा
यक्षप्रश्न हिरे व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. कोरोनाच्या संकट काळानंतर
प्रथमच हिरे उद्योग सलग इतक्या जास्त दिवसांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे त्याची
जगभर चर्चा होत आहे.
हिरे उद्योग हा अतिशय जोखमीचा आहे. त्यात विविध
प्रकारची यंत्रे, कुशल कारागीर, विश्वासू व्यक्ती आणि जाणकारांचा समावेश होतो.
जगभरातून विविध प्रकारचे नैसर्गिक हिरे हे सूरत मध्ये येतात. निसर्गतः मिळणारे
हिरे हे ओबडधोबड असतात. या हिऱ्यांवर पैलू पाडणे, घासणे, त्यांना चकाकी आणणे, बहुविध
आभूषणांसाठी ते विविध आकार आणि प्रकारात
तयार करण्याचे काम सूरतच्या हिरे उद्योगात चालते. त्याचे अप्रुप साऱ्यांनाच आहे.
अतिशय जोखमीचे हे काम अतिशय चोखपणे पार पाडले जाते. त्यामुळे येथील हिऱ्यांना जगभर
मागणी असते. खासकरुन चीन आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य आणि धनवान देशांकडून. मात्र,
गेल्या तीन महिन्यांपासून या उद्योगावर जणू मंदीची छाया आहे. त्यामुळे या व्यवसायाला
चिंतेची काजळी चढली आहे. आकड्यांचा विचार करता या वर्षी जून तिमाहीत, भारताच्या कट आणि पॉलिश्ड हिऱ्यांची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेतं
जवळपास १५ टक्के कमी झाली. २०२३-२४ या आर्थिक वर्षातील ही घसरण २७.५ टक्के होती. टायटन
कंपनी ही भारतातील सर्वात मोठी हिरे व्यवसाय करणारी आहे. तनिष्क, कॅरेटलेन आणि झोया या ज्वेलरी ब्रँडला सध्या आर्थिक झळ पोहचत आहे. आगामी
संकट टाळण्यासाठी अखेर हिरे उद्योग-व्यवसाय संघटनेने थेट बंदचे अस्त्र उगारले आहे.
उद्योजक आणि व्यावसायिक हे त्यांचे नुकसान भरुन काढणे किंवा कमी करण्याची धडपड करीत
आहेत. मात्र, हातावर पोट भागवणाऱ्यांचे काय?
जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC)च्या अहवालानुसार, या वर्षी पहिल्या पाच महिन्यांत नैसर्गिक आणि कच्च्या
हिऱ्यांची आयात ५ टक्के वाढून ५७.७ दशलक्ष कॅरेट झाली. मूल्यानुसार ही घसरण वर्षभरात
एकूण ३ टक्के म्हणजे ६.५४ अब्ज डॉलर एवढी आहे. भारताची पॉलिश्ड-हिऱ्याची निर्यात
त्याच कालावधीत यंदाही २१ टक्के घसरुन ६.६६ अब्ज डॉलर एवढी झाली. भारत आणि चीन या
देशांमधील संबंध सध्या तणावाचे आहेत. चीनने कुरापती केल्या की भारतीय जनमानस लगेच
चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या वल्गना करते. प्रत्यक्षात तशी कृती होत नाही. दिवाळी,
दसरा असो की कुठलाही सण चिनी उत्पादनांनीच बाजारपेठ सजलेली असते. विविध आकार,
प्रकार यामध्येच ही उत्पादने मिळतात असे नाही तर त्यांची किंमत, वापरण्यासाठीची
सहजता, नाविन्यता हे सारेच ग्राहकांना भुरळ घालते. त्या तुलनेत देशी उत्पादने
फारशी प्रभावी ठरत नाहीत. हे केवळ भारतीय बाजारपेठेतच घडते असे नाही तर देशोदेशी
हीच स्थिती आहे. त्यासाठी चिनी व्यावसायिक आणि उद्योजकांचे अपार कष्ट आहेत.
नुकत्याच झालेल्या पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान
चिनी व्यावसायिकांनी आयफेल टॉवरच्या विविध आकार प्रकारातील प्रतिकृती तेथील बाजारात
उपलब्ध करुन दिल्या. या स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातून आलेल्या व्यक्ती,
स्पर्धक, प्रशिक्षक, प्रेक्षक आदींनी पॅरिसची आठवण म्हणून या प्रतिकृती खरेदी
केल्या. अब्जावधी रुपयांची उलाढाल यात झाली. तसेच, जगातील अनेक देश आणि घरांमध्ये ही
चिनी उत्पादने पोहचली आहेत. हे सारे घडून आले कारण चिनी उद्योजक आणि
व्यावसायिकांनी या स्पर्धेकडे संधी म्हणून पाहिले. नाविन्यपूर्ण असे उत्पादन तेथील
बाजारात उपलब्ध करुन दिले आणि या संधीचे सोने केले. असो. मुद्दा हा आहे की आपण
चीनला धडा शिकविण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची भाषा करुन
उपयोग नाही. त्यासाठी सर्वंकष अशी रणनीती आखून त्याची कठोर अंमलबजवाणीही करावी
लागेल. तेव्हा त्यात यश येईल. सध्याच्या हिरे उद्योगातील संकटाचा विचार करता चिनी
ग्राहकांनी भारतीय हिऱ्यांवर बहिष्कार टाकण्याची कुठली योजना आखलेली नाही किंवा
भारताला धडा शिकविण्याचा त्यांचा विचार नाही.
बेरोजगारी, आर्थिक मंदी, उत्पन्नातील घट, ग्राहकांची
पसंती बदलणे, विवाह सोहळ्यांमधील घसरण, सोन्यासह अन्य
आभूषणांकडे असलेला कल आदी कारणांमुळे चीनमध्ये हिऱ्याला मागणी घटली आहे. चीनमधील
व्यापक आर्थिक अनिश्चितता देखील एक घटक आहे. अलीकडे सोन्याचे मूल्य अधिक स्थिर
असल्याने ग्राहक गुंतवणूक म्हणून हिऱ्यांपेक्षा सोने निवडत आहेत. चिनी लक्झरी
मार्केट पुनर्प्राप्त करण्यासाठी संघर्ष करत आहे. कोरोना साथीच्या आजारादरम्यान
दिसलेल्या शिखर पातळीपेक्षा हिऱ्याची मागणी सध्या खूपच कमी आहे. कोरोनाच्या काळात काही
लोकांनी त्यांचे पैसे हिऱ्यांसारख्या चैनीच्या वस्तूंवर खर्च केले, कारण त्या काळात पर्यटन आणि सुट्ट्यांमधील खरेदी झाली नाही. चीनमध्ये
विवाह समारंभातही लक्षणीय घट झाली आहे. २०२२ मध्ये विक्रमी नीचांकी पातळीची नोंद
झाली. विवाह समारंभांचे मार्केट पुन्हा तेजीत येण्यासाठी आणखी काळ जावा लागण्याची
शक्यता आहे.
चीनची लोकसंख्या आणि त्या तुलनेत त्यांच्याकडून येणारी हिऱ्यांची मागणी ही महत्वाची आहे. हाँगकाँगच्या बाजारपेठेतून चीन हिरे उचलतो. आणि भारत हा हाँगकाँगमध्येच हिरे विकतो. ही साखळी सध्या विस्कळीत झालेली आहे. काहींचे म्हणणे आहे की, भारतात हिरे उद्योगाला त्याची स्पर्धात्मक धार परत मिळवून देण्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची गरज आहे कर माफी आणि ऑपरेशनल सुधारणांचे प्रस्ताव त्यात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. हिरे उद्योजकांच्या मते अशा प्रकारच्या संकटांना तोंड देण्यासाठी भारत सरकारने त्यांना मदत करायला हवी. करातून सवलत आणि अन्य मागण्यांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. जीजेईपीसीने केंद्र सरकारकडे हिरे व्यावसायिकांकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. हिऱ्यांसाठी स्पेशल नोटिफाइड झोन (SNZs) विकसित करण्यात आले आहे. मात्र, भारतीय बोलीदार कर माफीच्या अभावामुळे बेल्जियम आणि दुबई पाठोपाठ या झोनमध्ये हिरे खरेदी करू शकत नाहीत. तूर्त चीनचे हे कनेक्शन भारतीय हिरे उद्योगावर मोठा परिणाम करणारे ठरते आहे.
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो. 9423479348
India, China, Diamond, Trade, Industry, Business, Export, Surat
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा