रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला जबर फटका (अक्षरनामा)

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला जबर फटका

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून घमासान युद्ध सुरू आहे. त्याचे विपरीत परिणाम विविध देशांवर होत आहेत. भारतही त्यातून सुटलेला नाही. अमेरिकेचा दबाव झुगारून भारताने एक मोठे डील रशियाशी केले. मात्र, भारताला मोठ्या प्रतिक्षेचा सिग्नल मिळाला आहे. ही बाब चीनने हेरली आहे.

भावेश ब्राह्मणकर

पाकिस्तान आणि चीन या दोन देशांलगतच्या भारतीय सीमा अतिशय संवेदनशील, वादग्रस्त आणि आव्हानात्मक आहेत. त्यामुळे या दोन्ही सीमा कणखर आणि सुरक्षित होण्यासाठी भारताला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांची गरज आहे. काळाबरोबर जे बदलत नाहीत ते मागे पडतात. जे देश सुरक्षा व्यवस्थेत कमजोर बनतात त्यांचे भवितव्य काळोखात जाते. भारतासारख्या देशाला अशाप्रकारची बाब परवडणारी नाही. खासकरुन चीन आणि पाकिस्तानसारख्या कुटील देश शेजारी असताना. अशातच रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका भारताला बसतो आहे.

अमेरिकेला नाराज करुन भारताने एस-४०० ही क्षेपणास्त्र प्रणाली रशियाकडून घेण्याचे डील भारताने केले. ही बाब जगभरात चर्चेची ठरली. अनेक देशांच्या भुवया उंचावल्या. तसेच, पाकिस्तान आणि रशिया या दोन्ही देशांच्या पोटात गोळाही उठला. मात्र, ही डील करुनही भारताला अद्याप ही क्षेपणास्त्र प्रणाली उपलब्ध झालेली नाही. कारण, रशिया सध्या युक्रेनच्या युद्धात पूर्णपणे गुंतला आहे. याच युद्धात मोठ्या प्रमाणामध्ये रशियाला शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा लागतो आहे. त्यामुळे भारताची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही.

भारत आणि रशिया यांच्यात घनिष्ट संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच महिन्यात रशियाचा विशेष दौरा केला. त्यातही एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीचा मुद्दा महत्त्वाचा होता. एस-४०० या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या वितरणास वेगवान आणि प्रगती करण्याचे भारताने रशियाला सांगितले आहे. रशियाच्या युक्रेनशी सुरू असलेल्या संघर्षामुळे विलंब होत असताना ही विनंती करण्यात आली आहे. सध्याच्या अंदाजानुसार, अत्यंत सक्षम प्रणालीचे चौथे आणि पाचवे स्क्वाड्रन अनुक्रमे मार्च आणि ऑक्टोबर २०२६ पर्यंत वितरित करणे अपेक्षित आहे.

भारत आणि रशियाने २०१९ मध्ये एस-४०० प्रणालीच्या पाच स्क्वॉड्रनसाठी करारावर स्वाक्षरी केली. ही प्रणाली तब्बल ४०० किलोमीटरहून अधिकचे लक्ष्य गाठू शकते. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर तीन स्क्वॉड्रन आधीच वितरित, कार्यान्वित आणि रणनीतिकदृष्ट्या तैनात केले गेले आहेत. आता चौथे आणि पाचवे स्क्वाड्रनची वाट पाहण्याची वेळ भारतावर येऊन ठेपली आहे.

एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय हवाई दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिलिव्हरी जलद करण्याची आणि डिलिव्हरी पुढे नेण्यासाठी नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान रशियन बाजूस विनंती केली आहे, रशियन बाजूने विनंतीवर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. एस-४०० प्रणालीला भारतीय हवाई दल (IAF) द्वारे गेम-चेंजर म्हणून पाहिले जाते. भारतीय हवाई दलासाठी अलीकडेच विकत घेतलेल्या स्वदेशी MR-SAM, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली तसेच पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे इस्रायली स्पायडर जलद क्रिया क्षेपणास्त्र यास एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली पूरक आहे. या संपादनांमुळे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. त्याच बरोबर, भारतीय हवाई दलाने डीआरडीओ द्वारे विकसित स्वदेशी प्रणाली 'कुशा' प्रकल्प सुरू केला आहे, ज्याचा उद्देश लांब पल्ल्यांवरील शत्रूच्या प्लॅटफॉर्मचा मुकाबला करणे असा आहे.

वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी सैन्याने भरीव हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली आहे. त्यामुळे ही बाब भारतासाठी डोकेदुखीची आहे.  संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी भारताने स्वतःच्या यंत्रणांसह प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या मॉस्को दौऱ्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंध अधिक दृढ झाले आहेत, दोन्ही देशांनी विविध शस्त्रास्त्र प्रणालींचे उत्पादन आणि देखभाल यातील लष्करी संयुक्त उपक्रम वाढविण्यास सहमती दर्शवली आहे.

येत्या १८ ते १९ महिन्यात आम्ही एस ४०० क्षेपणास्त्र भारताला सुपूर्द करु’, असे रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरीसोव यांनी सांगितल्यानंतर अनेकांच्या नजरा या क्षेपणास्त्राकडे वळल्या आहेत. अतिशय आधुनिक आणि संरक्षण क्षेत्रात मौल्यवान समजल्या जाणाऱ्या एस-४०० क्षेपणास्त्रासाठी भारताने अमेरिकेचाही प्रस्ताव धुडकावला. भारत आणि रशिया यांच्यात करार होऊ नये यासाठी अमेरिकेने बरेच प्रयत्न केले किंबहुना भारतावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. तरीही भारताने रशियाशी करार करुन हे क्षेपणास्त्र खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब केले.

जगभरात एस-४०० या क्षेपणास्त्राचा मोठा बोलबाला आहे. कारण हवाई संरक्षणातील ते अतिशय शक्तीशाली क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते. शत्रूचा कुठल्याही प्रकारचा हवाई हल्ला नेस्तनाबूत करण्याची क्षमता यात आहे. यातील ४०० हा आकडा अंतर दर्शवितो. म्हणजेच ४०० किलोमीटर क्षेत्रावरील अंतरही ते भेदू शकते. युद्धस्थितीत हे क्षेपणास्त्र म्हणजे त्या देशासाठी हवाई कवचच आहे. शत्रूकडून कुठल्याही प्रकारचा म्हणजे विमान, क्षेपणास्त्र किंवा अन्य शस्त्र वापरण्यात आले तर ते निकामी करण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे. संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या एस-४०० ही जगातील सर्वात धोकादायक आणि प्रभावी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. याच क्षेपणास्त्राच्या तोडीची प्रणाली टर्मिनल हाय अॅल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टिम ही अमेरिकेने विकसित केली आहे. मात्र, त्यापेक्षा एस-४०० ची परिणामकारकता अधिक आहे, असे तज्ज्ञांना वाटते. आणि तीच भारताने स्वीकारली आहे.

एस-४०० या क्षेपणास्त्रात अनेकविध उपकरणांचा, आयुधांचा समावेश आहे. ज्यात बहुउद्देशीय रडार, विमान विरोधी क्षेपणास्त्र, स्वयंचलित शोध यंत्रणा, लाँचर्स आणि महत्त्वाचे म्हणजे कमांड कंट्रोल सेंटरची उपलब्धता अशी सुसज्ज प्रणाली एस-४०० मध्ये आहे. युद्ध प्रसंगी अवघ्या पाच मिनिटांच्या आत ही सर्व प्रणाली तैनात करता येते आणि तिचा वापर करता येतो, हे तिचे वैशिष्ट्य आहे. एकाचवेळी तीन वेगवगळ्या प्रकारची मिसाइल डागण्याची क्षमता हे सुद्धा एस-४०० मध्ये शक्य आहे. ४०० किलोमीटरवरील लक्ष्य निश्चित केले असले तरी त्या क्षेत्रातील सर्व प्रकारचे लक्ष्य भेदण्याची क्षमता यात आहे.

 एवढेच नाही तर लढाऊ विमाने, बॅलेस्टिक क्षेपणास्त्र किंवा क्रूझ क्षेपणास्त्र सुद्धा ते निकामी करु शकते. एकाचवेळी १०० लक्ष्यांचा माग काढणे आणि अकाशातील सर्व प्रकारच्या अस्त्रांना शोधणे एस-४०० ला जमते. सर्व प्रकारच्या रडारला चुकवून आपले काम फत्ते करण्याची खासियत अमेरिकेन लढाऊ विमान एफ-३५ याची आहे. त्यामुळेच अमेरिका ज्या एफ-३५ या लढाऊ विमानाविषयी मोठा अभिमान बाळगते त्यालाही एस-४०० हे क्षेपणास्त्र शोधू शकते. रशियाने या क्षेपणास्त्राचा वापर २००७ पासूनच सुरू केला आहे. सद्यस्थितीत मॉस्को या राजधानीच्या सुरक्षेसाठीही प्रणाली कार्यन्वित आहे. २०१५ मध्ये जेव्हा तणाव निर्माण झाला होता तेव्हा रशियाने त्यांच्या नौदल आणि लढाऊ विमानांच्या सुरक्षेसाठी सिरीयामध्ये एस-४०० प्रणाली तैनात केली होती.

जमिनीवरुन हवेत मारा करणारे बलशाली क्षेपणास्त्र आणि एकाचवेळी ३६ वेळा मारा करण्याची क्षमता ही एस-४०० ची वैशिष्ट्ये आहेत. या क्षेपणास्त्रात १२ लाँचर आहेत. त्यामुळे एका लाँचरमधून एकावेळी तीन क्षेपणास्त्र डागता येतात. १९६७ मध्ये तत्कालिन सोव्हिएत रशियाने एस-२०० ही प्रणाली विकसित केली. त्यानंतर दहा वर्षांनी एस-३०० ही प्रणाली विकसित करण्यात रशियाला यश आले. संरक्षण संशोधन कार्याला विशेष महत्व दिल्यानेच २००७ मध्ये रशियाला एस-४०० ही प्रणाली विकसित करता आली आहे. आता तर एस-५०० ही प्रणाली विकसित करण्यावर रशियाने लक्ष्य केंद्रित केले आहे. एस-४०० पेक्षा भारताने पॅट्रियॉट-३ हे क्षेपणास्त्र खरेदी करावे, असे आवाहन अमेरिकेने केले. मात्र, भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक भाग म्हणून रशियाशीच करार केला. तब्बल पाच अब्ज डॉलरचा हा करार आहे. 

चीनकडे एस-४०० हे क्षेपणास्त्र असले तरी पाकिस्तानकडे ते नाही. त्यामुळे पाकिस्तान सीमेवर हे क्षेपणास्त्र प्रभावी ठरणार आहे. तसेच, भारताकडेही हे क्षेपणास्त्र असल्याने चीनवरही त्याचा दबाव राहणार आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून भारत हा सशक्तीकरणाकडे वाटचाल करीत आहे. राफेल बरोबरच एस-४०० क्षेपणास्त्र हा त्याचाच एक भाग आहे. शेजारील देशांबरोबरच अन्य देशांवरही वचक निर्माण करण्यासाठी ही बलशाली आयुधे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. येत्या दोन वर्षात एस-४०० भारतात दाखल होणार आहे. तर, राफेल विमानेही तेव्हा दिमतीला असतील. त्यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने ही बाब अतिशय प्रभावी ठरणार आहे. 

पण, रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला एस-४०० ही हवाई क्षेपणास्त्र प्रणाली मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ती मिळाल्यानंतर हवाई दलाकडून आपल्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर ती सीमेवर तैनात केली जाईल. त्यामुळे हे सारे लक्षात घेता आणखी तीन वर्षे तरी यात जाणार आहेत. तोपर्यंत या प्रणालीविनाच भारताला पाकिस्तान आणि चीन सीमेचे संरक्षण करावे लागणार आहे.

--

bhavbrahma@gmail.com
संरक्षण
, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो. 9423479348

Defence, India, Russia, S400 Missile, Ukraine, Border, Security, War

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)