विकासाचा रोग गिळतोय गावेच्या गावे (दै. नवशक्ति)
विकासाचा रोग गिळतोय गावेच्या गावे
केरळच्या वायनाडमध्ये अख्खा डोंगरच कोसळून तब्बल ४ गावे त्याखाली गाडली गेली आहेत. भूस्खलन, दरडी कोसळण्याच्या घटना तशा नवीन नाहीत. वारंवार त्या होत असल्या तरी त्यातून ना आपण धडा घेतला आहे, ना काही संदेश. म्हणूनच निष्पाप जीवांचा बळी जातोच आहे आणि सरकार व प्रशासन ढिम्मपणे पहातच आहे.
भावेश ब्राह्मणकर
नैसर्गिक आपत्ती ही किती महाकाय असते याचा प्रत्यय
विविध माध्यमातून येत असतो. कधी त्सुनामी, कधी भूकंप, भूस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी तर कधी दुष्काळ.
केरळच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वायनाडमध्ये निसर्गाच्या कुशीतील
चार गावे अचानक गडप झाली आहेत. आतापर्यंत १२३ हून अधिक जणांचा बळी गेल्याचे समोर
येत आहे. शोधकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत. भूस्खलन किंवा
दरड कोसळण्याच्या आपत्तीला तोंड देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. १९६८ मध्ये
दार्जिलिंग (१ हजार मृत्यू), १९९८ मध्ये उत्तराखंड (३००
मृत्यू), २०१३ मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ (५७०० मृत्यू),
२०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीण (१५१ मृत्यू), २०२० मध्ये केरळचे पेट्टीमुडी (६५ मृत्यू), २०२३
मध्ये रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी (२६ मृत्यू) या घटनांचा समावेश आहे. १६ जुलै
रोजी कर्नाटकच्या शिरुरमध्येही दरड कोसळली. या दुर्घटनेत ८ जणांचा बळी गेला आहे.
मात्र, नदीच्या वेगवेगळ्या किनाऱ्यावर असलेली गावे दरड
कोसळून चक्क एकत्र आली आहेत. कल्पनातीत असावे असेच हे आहे. पण, निसर्गाच्या रौद्ररुपापुढे मानव अत्यंत थिटा पडतो, हेच
शाश्वत सत्य आहे.
निसर्ग खुपच लहरी बनला आहे का? जागतिक तपमान वाढीमुळे होते आहे का? हवामान बदलाचा
हा परिणाम आहे का? की कसला तरी कोप झाला आहे? अशा प्रकारच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आला आहे. ‘मन
मोकळं’ करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ‘सोशल’ जमान्यात त्याला भरते आले नाही तर नवलच! असो, तर
मुद्दा हा आहे की, अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्या
तरी आपण त्यातून काहीच धडा घेत नाहीत. केवळ आपत्ती घडल्यानंतर तेथे शोध व
बचावकार्य राबविले जाते, निवासी शिबीरे तयार होतात, लाखोंची आर्थिक मदत जाहीर होते,
बेघर झालेल्यांना शासकीय योजना किंवा निधीतून घर निर्माण करुन दिले जाते. बस्स.
एवढच! त्यापुढे काहीही नाही. यापलिकडे फार फार तर सरकारकडून
तज्ज्ञांची समिती नेमली जाते. त्याचा अहवाल येतो. तो पूर्ण, अपूर्ण किंवा काही
अंशी स्वीकारला जातो किंवा बासनातही टाकला जातो. त्यावर ना चर्चा झडतात, ना त्याचे
गांभीर्य ओळखले जाते. औपचारिकता म्हणून हा सारा मामला असतो. पुन्हा पहिले पाढे
पंचावन्न! उदाहरणच द्यायचे तर केंद्र सरकारने ज्येष्ठ
पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाटासाठी समिती
नेमली. शास्त्रोक्त अभ्यास करुन अहवाल सादर झाला. आज त्याचे काय? सरकारने तो लाथाडल्याने पश्चिम घाट अक्षरशः संकटात सापडला आहे.
गुजरातच्या डांग जिल्ह्यापासून सुरू होणारा पश्चिम
घाट महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकपासून थेट खाली केरळपर्यंत आहे. जगातील सर्वात
महत्वाचा जैविक हॉटस्पॉट म्हणून तो ओळखला जातो. अत्यंत वैविध्यपूर्ण आणि मौल्यवान
अशी नैसर्गिक संपदा या घाटात आहे. मात्र, विकासाच्या मृगजळाने झपाटल्यामुळेच या
पश्चिम घाटाला ओरबाडण्याचे आणि निसर्गात अनन्यसाधारण हस्तक्षेप करण्याचे प्रकार
सातत्याने वाढत आहेत. रस्ते, पूल, बोगदा, धरण, उद्योग, खाणकाम, उत्खनन, घरे व
हॉटेल्सची निर्मिती अशा बहुविध कारणांसाठी निसर्गावर जणू अत्याचार सुरू आहेत. भूसुरुंग
लावून डोंगर पोखरणे, खोदणे हे तर नित्याचेच झाले आहे. डोंगर आणि पर्वतांवर आघात
घालून विकसित केलेल्या रस्त्यांवर मानवनिर्मित वाहने वावरणे आणि डोंगराच्या
माथ्यावर थेट वाहनातून जाणे शक्य झाले आहे. यात समाधान शोधले जात असले तरी प्रत्यक्षात
आपत्तीलाच आमंत्रण दिले जात आहे.
बेसुमार उत्खनन आणि खाणकामामुळे डोंगर ओसाड झाले
आहेत. खनिजांचा उपसा दिवसागणिक वाढतोच आहे. तसेच, या भागातील वृक्षराजीही गायब
करण्यात आली आहे. म्हणूनच डोंगररांगेतील जमिनीची प्रचंड धूप होते आहे. यात पावसाचे
पाणी पडले की ही जमीन आणखीनच भूसभूशीत होते. यातूनच डोंगराचा एखादा भाग किंवा कठडा
कोसळतो. विशेष म्हणजे, हे सारे आपल्याला ठाऊक आहे. आपण एवढे निगरगट्ट झालो आहोत की
परिणाम माहित असूनही आपले धाडस दिवसेंदिवस वाढतच आहे. पिकांवर भरमसाठ औषध फवारले
जाते नंतर तेच उत्पादन मानवी आहारात येते. यातूनच कॅन्सरसारखे जीवघेणे आजार बळावतात.
अशाच प्रकारे डोंगर फोडणे, भूसुरुंग लावणे, अमर्याद उत्खनन करणे, वृक्षतोड करुन
डोंगर बोडका करणे या साऱ्या अवैध उद्योगांमुळेच भूस्खलनाच्या घटनांना चालना मिळत
आहे.
पावसाचा लहरीपणाही कमालीचा वाढला आहे. पाऊस
पहिल्यासारखा राहिला नाही, असे स्पष्ट मत जुनेजाणते व्यक्त करतात. पण त्याची
कुठलीही दखल आपण घेत नाही. पाऊस कधी येतो तर कधी प्रतिक्षा करायला लावतो. महिन्याभराचा
किंवा संपूर्ण मौसमाचा पाऊस केवळ एकाच दिवशी किंवा काही तासातच कोसळण्याचेही
पराक्रम नोंदले जात आहेत. दोन पावसांमधील असंख्य दिवसांचे अंतर (ड्राय स्पेल)
चिंताजनकच आहे. कमी अधिक प्रमाणात बरसणाऱ्या पावसाचा लहरीपणा काळजी करायला लावतो. त्यातच
ढगफुटी किंवा अतिवृष्टी झाल्यानेही डोंगराचा मोठा भाग कोसळतो. पावसाच्या लहरीपणाचा
भूस्खलनाशी संबंध आहे.
पोकलेन, जेसीबी, डम्पर, ट्रक यासारख्या वाहनांचा कोकण
किंवा पश्चिम घाटातील सुळसुळाट निसर्गावर घाव घालणाराच आहे. मात्र, यालाच आपण ‘विकास’ म्हणतो आहोत. यातूनच अतिवृष्टी किंवा पुरामुळे
नद्यांचे प्रवाह सुद्धा बदलत आहेत. याचा प्रत्यय देशाच्या विविध भागात आणि वेळोवेळी
आपण घेत आहोत. आपल्या डोळ्यादेखत निष्पाप बळी जाताना आपण पाहत आहोत. त्याचे
कुठलेही सोयरसूतक आपल्याला वाटत नाही किंवा ते उरलेले नाही. ही शुष्कताच आपल्याला
विनाशाकडे घेऊन जात आहे. केदारनाथचेच उदाहरण घ्या. पत्त्याच्या बंगल्यांसारखी घरे,
हॉटेल्स आणि इमारती कोसळल्या. ५७०० बळी गेले. शेकडो व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले.
तरीही त्या परिसरामध्ये ना विकासकामे घटली, ना खबरदारीच्या उपायांमध्ये वाढ झाली. इर्शाळवाडीतील
आपदग्रस्त अद्यापही निवाऱ्यापासून वंचित आहेत. पूर्वीसारखे त्यांचे जनजीवन
राहिलेले नाही. काहींनी पालकच गमावले तर काहींनी संपूर्ण कुटुंब. घटनेतून बोध
घेण्याचा मानवी स्वभाव आता दुरापास्त होत आहे. तेच खरे दुर्दैव आहे.
परवा एक धक्कादायक बातमी वाचनात आली. उत्तराखंडच्या
उत्तरकाशी जिल्ह्यात चारधाम बाह्यवळण प्रकल्प प्रस्तावित आहे. यास मोठा विरोध
झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्चाधिकार समिती नेमण्यात आली. तेथे
कुठलेही विकास कार्य करु नये, असे समितीने स्पष्टपणे सांगितले. दरड कोसळणारे ठिकाण
असे सरकारनेच जाहीर केले. आता चार वर्षांनंतर याच प्रकल्पाला मंजुरी मिळावी म्हणून
पर्यावरण मंत्रालयाकडे अर्ज करण्यात आला आहे. याचा अर्थ नक्की काय? संबंधित प्रकल्प बासनात टाकणे हा एकमेव पर्याय असताना तो धुडकावून लावत
बिनदिक्कतपणे रस्ते, डांबर आणि डोंगर फोडण्याचे उद्योग केले जातील. तेथून मानवी
हालचाली, वाहनांची वर्दळ वाढेल. आणि अचानक एके दिवशी महाकाय आपत्ती कोसळेल. मग,
पुन्हा सर्वोच्च न्यायालात हे प्रकरण जाईल. चौकशी होईल. समिती नेमली जाईल. प्रकल्प
अवैध असल्याचे पुन्हा अधोरेखित होईल. पण, झालेल्या नुकसान आणि जिवीतहानीचे काय? त्याची जबाबदारी कुणाची? हे सारे असेच आणि सतत घडते
आहे.
संवेदनाहिन आणि अविवेकी बनल्यानेच विकासाचा रोग आपल्याला लागला आहे. हा दुर्धर आणि बरा न होणारा असल्याची जाणिव आपल्याला आहे. मात्र, केवळ त्यासाठी थातूरमातूर औषधे घेऊन उपचाराचा सोपस्कार पार पाडला जात आहे. वेळप्रसंगी विविध चाचण्या करायच्या, निदान काढायचे, थोडी फार औषधे बदलायची, डोसचे प्रमाण वाढवायचे. यातून रुग्ण बरा तर होत नाहीच. त्याच्या वेदनाही कमी होत नाहीत. उलट शरीराच्या आतल्या भागात विविध प्रकारच्या वाईट किंवा अनाकलनीय प्रक्रिया घडतात. परिणामी, हा रुग्ण लवकर मरत तर नाहीच, पण त्याची तगमग, तडफड वाढते. त्याला जीव नकोसा होऊन जातो. कधी एकदाचे मरण येते, याचा तो सतत धावा करतो. हा रुग्ण दुसरा तिसरा कुणी नसून विकासाचा बुरखा पांघरलेला मानव आहे. नैसर्गिक आणि मानवी आपत्ती घडल्यानंतरचे सोपस्कार किंवा उपचार हे आजचे मरण उद्यावर ढकलणारे आहेत. एवढेच!
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व
पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
मो. 9423479348
India Kerala Landslide Natural Disaster Calamity Western Ghat Nature Rehabilitation Mitigation Waynad
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा