पाकिस्तानी पंतप्रधानांच्या चीन दौऱ्याने काय साधले? (दै. लोकसत्ता)
पाकिस्तानी पंतप्रधानांच्या चीन दौऱ्याने काय साधले?
सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ
यांनी पाच दिवसांचा चीन दौरा केला आहे. या दौऱ्याने काय साधले? पाकच्या पदरात काही पडले का? आगामी काळात काय काय
घडू शकेल? भारतावर काय परिणाम होतील?
भावेश ब्राह्मणकर
महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, आर्थिक हलाखी, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था अशा कितीतरी संकटांनी पाकिस्तान पिचला आहे. गेल्या मार्च महिन्यात पाकमध्ये नवे सरकार स्थापन झाले. पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी सर्वप्रथम चीनचा पाच दिवसीय दौरा केला आहे. हा दौरा पाक आणि शरीफ यांच्यासाठी किती महत्त्वाचा होता? याचे उत्तर म्हणजे शरीफ सरकारने या दौऱ्यासाठी चक्क अर्थसंकल्पच संसदेत जाहीर करण्याचे लांबणीवर टाकले. यातच सर्व सार आले.
शरीफ यांनी त्यांच्या काही मंत्र्यांसह १०० उद्योजक आणि व्यावसायिकांसोबत चीन दौरा केला. चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांच्याशी झालेली भेट, त्यांच्यासोबत चर्चा हा त्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. हा दौरा आटोपून शरीफ पाकमध्ये परतले. त्यामुळे या दौऱ्याचे आणि त्याच्या फलिताबाबत कवित्व सुरू आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की, या दौऱ्यातून पाकच्या काय अपेक्षा होत्या?
पाकिस्तानची अवस्था सध्या नेमकी कशी आहे हे लेखाच्या
सुरुवातीलाच नमूद केले आहे. त्यामुळे देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढणे हा एकमेव
मुख्य उद्देश शरीफ यांचा होता. त्यासाठीच त्यांनी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर
(सीपीईसी)ला चालना देण्याची विनंती चीनच्या अध्यक्षांकडे केली. हा कॉरिडॉर म्हणजे
चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अर्थात बीआरआयचा एक भाग आहे.
प्राचीन रेशीम मार्गावर आधारलेला हा प्रकल्प आहे. आखाती देशांसह थेट युरोपातील
व्यापार सुकर व्हावा या उद्देशाने या मार्गात रेल्वे, रस्ते, बंदरे, ऊर्जा प्रकल्प
उभारण्याचे निश्चित आहे. तब्बल ६२ अब्ज डॉलर एवढ्या क्षमतेचा हा कॉरिडॉर २०१५
मध्ये घोषित करण्यात आला. त्यात एकूण २१ ऊर्जा प्रकल्प, दळणवळणाशी संबंधित २४
प्रकल्प, विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) ९ निर्माण केले जाणार आहेत. यातील १४
ऊर्जा प्रकल्प पूर्ण झालेत, २ प्रकल्पांचे काम सुरू आहे, दळणवळणाचे ६ प्रकल्प
पूर्ण झालेत तर केवळ ४ एसईझेड बाबत हालचाली सुरू आहेत. या कॉरिडॉरअंतर्गत चीनने
२०२२ पर्यंत २५.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. या कॉरिडॉरमुळे पायाभूत
सोयी-सुविधांचे घट्ट जाळे विणले जाईल, त्यासाठी पाकला एक दमडीही खर्च करावी लागणार
नाही, लाखो जणांच्या हाताला काम मिळेल, प्रकल्प पूर्ण झाल्यावर तेथे तरुणांना रोजगार
मिळेल, आर्थिक चलनवलन सुधारुन देशाला फायदा होईल, अशी अपेक्षा पाकिस्तान बाळगून
आहे. त्यामुळे या कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याला चीनने गती द्यावी, अशी कळकळीची
विनंती शरीफ यांनी जिनपिंग यांच्याकडे केली. अर्थात अशा प्रकारे लोटांगण घालणारे
नेते आणि देश चीनला हवेच आहेत. ‘आम्ही तुमच्यावर उपकार करु’ अशा आविर्भावात जिनपिंग यांनी शरीफ यांना प्रतिसाद दिला आहे. कारण, चीनचे
आडाखे वेगळे आहेत.
पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. स्टेट बँक
ऑफ पाकिस्तानच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानने बाह्य देशांकडून
घेतलेल्या कर्जाचा २०२३ मधील आकडा सुमारे १३० अब्ज डॉलर एवढा झाला आहे. २०१५ च्या
तुलनेत (अवघ्या ८ वर्षातच) हे कर्ज दुप्पट झाले आहे. विशेष म्हणजे, या कर्जामध्ये
चिनी कर्जाचा वाटा १३ टक्के एवढा आहे. म्हणजेच, पाकिस्तान दिवसागणिक कर्जाच्या
ओझ्याखाली दबत आहे. जागतिक बँक, आशियाई बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
यांच्यापाठोपाठ चीन हाच पाकसाठी कर्ताधर्ता आहे. त्यामुळे त्याचे पाय धरण्याशिवाय
पाककडे कुठलाही पर्याय नाही. दहशतवादाच्या समस्येमुळे अन्य देशांनी पाककडे पाठ
फिरवली आहे. चीनच एकमेव, मोठी आणि सक्षम आशा पाकला आहे. म्हणूनच शरीफ यांनी चीनचे
गुणगान गातानाच कॉरिडॉरमध्ये गुंतवणूक करावी आणि त्यास चालना देण्याची आग्रही
विनंती केली. चीनला ते हवे आहे कारण, पाकच्या ग्वादार बंदरातून थेट व्यापार आणि
मालवाहतूक करण्याचा डाव आहे. समुद्रमार्गे होणारी मालवाहतूक थेट रस्ते आणि रेल्वे
मार्गे कमी वेळेत करण्याची योजना आहे. खासकरुन चीनमध्ये आयात होणारे तेल. शिवाय
भारताला शह देण्यासाठी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) कॉरिडॉरच्या
प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी चीनसोबत करारही केला आहे. विशेष म्हणजे पीओके
ही परकीय भूमी असल्याची स्पष्टोक्ती पाकिस्तानने इस्लामाबाद उच्च न्यायालयात
नुकतीच केली आहे. पीओकेमधील कॉरिडॉरच्या कामांना भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. याकडे
दुर्लक्ष करीत चीनने दळणवळणासह लष्करी कामे सुरू ठेवली आहेत. भारताला शह
देण्यासाठी आगामी काळात ही कामे महत्त्वाची ठरतील, असा चीनचा कावा आहे.
काश्मीरच्या शक्सागाम खोऱ्यातील विकास कामे हे त्याचेच द्योतक आहे. तसेच, युद्ध
झाले तर याच पायाभूत सोयी-सुविधांचा वापर पाकला भारताविरुद्ध करता येणार आहे. परिणामी,
पाक आणि चीन दोन्हीही आपापले इप्सित साध्य करण्यासाठी आग्रही आहेत.
कॉरिडॉरवरुन पाकिस्तानी जनतेत प्रचंड रोष आहे. कारण,
पाकमध्ये स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होताना दिसत नाही. चीनने उलट चीनमधूनच
कामगार आणि इंजिनिअर आणून या प्रकल्पांवर नियुक्त केले आहेत. तसेच, या प्रकल्पांची
गती धीमी असल्याने पाकला आर्थिकदृष्ट्या हे प्रकल्प पांढरा हत्ती ठरण्याची टीका
पाक माध्यमे आणि अभ्यासक करीत आहेत. या असंतोषामुळेच अधूनमधून या प्रकल्पांना
लक्ष्य केले जात आहे. २०१८ पासून विविध हिंसक घटना घडल्या आहेत. काही
महिन्यांपूर्वीच एका दहशतवादी हल्ल्यात चिनी इंजिनिअर आणि मजूर ठार झालेत. आणि हाच
मुद्दा जिनपिंग यांनी शरीफ यांच्याकडे काढला. त्यामुळे शरीफ हे अत्यंत खजिल झाले.
केवळ प्रकल्पच नाही तर चीनी इंजिनीअर आणि मजुरांच्या सुरक्षेकडे पाकने लक्ष
द्यावे, तशी हमी द्यावी, असे जणू आदेशच शरीफ यांना चीन दौऱ्यात मिळाले आहेत. त्यामुळे
शरीफ यांच्यासाठी ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी स्थिती झाली आहे. चीनचे हित पहायचे तर आपल्याच नागरिकांवर कारवाई
करावी लागणार आहे. त्यामुळे शरीफांसाठी हे धर्मसंकटच आहे. बेरोजगारी आणि आर्थिक
संकट दूर करण्यासाठी हा कॉरिडॉर किती महत्त्वाचा आहे, चीन दौऱ्यातून मी किती मोठी
मजल मारुन आलो आहे, अशी फुशारकी शरीफ मिरवत असले तरी यापुढे चीनी प्रकल्पांवर
हल्ले होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच, यापूर्वी झालेल्या
हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाईचा बडगाही शरीफ यांना अनिच्छेने उगारावा लागणार
आहे.
पाकिस्तानी १०० व्यावसायिक आणि उद्योजकांनी चीन
दौऱ्यात शेनझेन आणि झिआन या दोन शहरांना भेटी देऊन तेथील उद्योग-व्यावसायाची
माहिती तसेच प्रगती जाणून घेतली. याद्वारे ही सर्व मंडळी चीनचे गोडवे पाकमध्ये
गाऊन तशा प्रगतीचे ध्येय ठेवणार आहे. अर्थात त्यासाठी पाक सरकार या
उद्योजक-व्यावसायिकांना कितपत सहकार्य करु शकेल? की पाकमध्ये
उद्योग-व्यावसाय वाढीसाठी चीनलाच पुन्हा आवतण दिले जाईल? हे
प्रश्न अनुत्तरीतच आहेत. पाकच्या १ हजार विद्यार्थ्यांना चीनच्या कृषी
विद्यापीठांमध्ये पाठविले जाईल आणि त्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल, असेही
शरीफ यांनी दौऱ्यापश्चात जाहीर केले आहे. याद्वारे कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल
घडविण्याचा, कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याचा आणि देशाला आवश्यक असलेले
अन्नधान्य मुबलक प्रमाणात पिकविण्याचा मनोदय शरीफ यांनी बोलून दाखविला आहे. तो
खरोखरच पूर्ण होईल का? याबाबतही शंकाच आहे. कारण हे सारे
करण्यासाठी पाककडे पुरेसा आर्थिक स्त्रोत नाही.
शरीफ किंवा त्यांच्या सरकारला चीनचे उंबरे
झिजविण्याशिवाय पर्याय नाही. कारण, पाकची आंतरराष्ट्रीय बाजारातील पत प्रचंड
खालावली आहे. चीन ज्या काही अटी-शर्ती ठेवेल त्या मूग गिळून मान्य करण्याशिवाय पाक
काहीही करु शकत नाही. तरुणांच्या हाताला काम मिळावा म्हणून पाक चीनकडे कॉरिडॉरच्या
प्रकल्पांसाठी आर्जव करीत असला तरी चीन प्रत्यक्षात आपलेच कुशल मनुष्यबळ पाकमध्ये
नेत आहे. यातूनच स्थानिक विरुद्ध चीनी असा संघर्ष उभा ठाकला आहे. आणि आता जिनपींग
यांच्या आदेशानुसार शरीफ यांना पाक नागरिकांवरच कारवाई करण्याची वेळ आली आहे. यातून
जनक्षोभ उसळण्याची भीती आहे. मुळातच बहुमतात नसलेल्या शरीफ यांना आता या काटेरी
आव्हानावर स्वार व्हायचे आहे. त्यातच पाक माध्यमांकडून चिनी कॉरिडॉर आणि पाक सरकार
यांच्यावर जोरदार आसूड ओढले जात आहे. म्हणजे माध्यमांचाही रोष त्यांना पत्करावा
लागत आहे.
शरीफांच्या चीन भेटीची दखल भारतानेही घेणे अगत्याचे
आहे. भारतात नवे सरकार आरुढ झाले आहे. त्यामुळे पाक आणि चीन यांच्याबाबत सर्वंकष
असे धोरण आखणे गरजेचे आहे. चीन वेगवेगळ्या आघाड्यांवर भारताला खिंडीत गाठण्याचे
डावपेच खेळतो आहे. आताचेच उदाहरण घ्या ना. मोदी सरकारच्या शपथविधीला मालवदीवचे
अध्यक्ष मोहम्मद मोईझ्झू हे नवी दिल्लीत आले. त्यामुळे पुन्हा मालदीवशी भारताचे
संबंध दृढ होतील, अशी आशा पल्लवित झाली. मोईझ्झू यांनीही पंतप्रधान मोदी,
राष्ट्रपती मूर्मू आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या भेटीत अतिशय सकारात्मकता
दर्शवली. मात्र, मालदीव आणि भारत यांच्यात यापूर्वीच्या सरकारने केलेल्या करारांची
चौकशी करण्याचा निर्णय मोईझ्झू सरकारने घेतला आहे. मोईझ्झूंच्या भारत भेटीनंतर
अवघ्या काही तासातच ही घडामोड घडली आहे. चीनने मालदीववर आपले फासे टाकले आहेत. त्यात
मोईझ्झू आणि मालदीव चीनच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे पाक असो की मालदीव बेफिकीर
राहणे भारताला परवडणारे नाही. कारण, चीन दिवसेंदिवस भारताच्या अडचणी वाढवतो आहे.
त्यासाठी तो पाक, मालदीव, श्रीलंका, नेपाळ यासारख्या देशांच्या डोक्यावर बंदूक
ठेवून भारतावर निशाणा साधतो आहे. भारतातील एनडीए सरकार यासंदर्भात काय पावले उचलतो
यावरच चीनच्या चालींना शह बसू शकेल.
--
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार
Article online link
Pakistan China Foreign Relations Defence India Visit Affairs South Asia CPEC BRI POK Infrastructure Shehbaz Sharif Politics International
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा