लाखो भारतीय कावळ्यांवर संक्रांत! हा देश करणार विषप्रयोग! (अक्षरनामा)
हेडिंग वाचून दचकलात ना! पण हे खरे आहे. लाखो भारतीय कावळ्यांचा जीव घेण्यासाठी विषप्रयोगाची
परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याची जगभर चर्चा होत आहे. कोणता आहे हा देश? एवढ्या मोठ्या संख्येने कावळ्यांना का मारले जाणार आहे? जाणून घेऊ याविषयी सविस्तर....
भावेश ब्राह्मणकर
आपल्याकडे चिमण्या दिसेनाशा झाल्या म्हणून आपण कासावीस झालोय. म्हणूनच आपण चिमणी दिवसही साजरा करायला लागलोय. चिमणी, तिचे आपल्या भोवतीचे अस्तित्व, परिसंस्थेतील तिची जागा या आणि अशा कितीतरी बाबींची जनजागृती केली जात आहे. हे सारे सुरू असतानाच मात्र, भारतीय कावळ्यांवर संक्रांत आल्याची बाब उघड झाली आहे. तुम्हाला असे वाटेल की, कावळ्यांवर का आणि कशी संक्रांत येईल? पण हे खरे आहे. आणि हे भारतात नाही तर केनियात घडते आहे.
केनियामधील हॉटेल व्यावसायिक, शेतकरी यांना चक्क
कावळा मारण्याचा परवाना देण्यात आला आहे. कावळ्यांवर विषप्रयोग केला जाणार आहे.
त्याद्वारे भारतीय कावळ्यांची संख्या लक्षणीयरित्या घटविण्याचे उद्दीष्ट आहे. केनियातील
प्रसारमाध्यमांनुसार, या वर्षभरात तब्बल १० लाख कावळ्यांचे प्राण घेतले जाणार
आहेत. एवढ्या अजस्त्र प्रमाणात कावळ्यांचा जीव घेण्याचे कारण काय, या कावळ्यांनी
असे काय घोडे मारले आहे, असा प्रश्न आपल्या मनात सहाजिकच निर्माण होईल. आता
त्याविषयीच समजून घेऊया.
भारतीय कावळे हे केनियात पाहुणे म्हणून आले ते १९व्या
शतकाच्या प्रारंभी. भारतीय कावळ्यांना चक्क बोटीतून येथे आणल्याच्या नोंदी
सापडतात. त्यावेळचे मुख्य कारण होते ते केनियामध्ये असलेली अस्वच्छता. कचरा, घाण
ही कावळ्यांद्वारे नष्ट व्हावी म्हणून हा अभिनव प्रयोग करण्यात आला. विशेष म्हणजे
तो यशस्वीही ठरला. कावळ्यांमुळे केनियामध्ये स्वच्छता दिसू लागली. त्यामुळे
समाधानाचे वातावरण होते. मात्र, गेल्या १२५ ते १५० वर्षात ही परिस्थिती बदलली आहे.
आता या कावळ्यांचा तेथे उपद्रव प्रचंड वाढला आहे. कारण त्यांची वाढलेली जबरदस्त
संख्या. नागरिक, व्यावसायिक, शेतकरी, पर्यटक, पशुपालक अशा सर्वच स्तरातून
कावळ्यांच्या तक्रारी होत आहेत. अखेर त्याची दखल केनियन सरकारने घेतली आहे.
भारतीय कावळे नक्की का उपद्रवी ठरतात याचे कारण
शोधताना अनेक बाबी सापडतात. खासकरुन शेतकरी खुपच वैतागले आहेत. ते सांगतात की, हे
कावळे आमची पिके नष्ट करतात. शेकडोच्या संख्येने कावळे येतात आणि पिकांवर आक्रमण
करतात. फुले, फळे खाऊन उडून जातात. त्यामुळे आम्ही खुपच संकटात सापडलो आहोत. या
कावळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सरकारला साकडे घातले आहे.
लहान विक्रेते आणि पोल्ट्री व्यावसायिक सांगतात की,
हे कावळे कोंबडीच्या पिलांना, त्यांच्या अंड्यांना घेऊन जातात किंवा नुकसान
पोहोचवतात. त्यामुळे आमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. आमच्या कोंबड्या
आणि अंडी यांचे संरक्षण कसे करायचे असा प्रश्न आमच्यासमोर आहे. किंवा हा व्यवसाय
सोडून देण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. तर, पशुपालकही त्रस्त आहेत. बकऱ्यांसह
अन्य पाळीव प्राण्यांवर हे कावळे हल्ला करतात. त्यांना जखमी करतात. त्यांची पिले
किंवा अंड्यांना इजा पोहचवतात.
हॉटेल व्यावसायिक तर फारच चिंताक्रांत आहेत. ते
सांगतात की, आमच्याकडे असलेल्या खाद्यपदार्थांसह विविध पदार्थांवर हे कावळे झडप
घालतात. उघड्यावर आम्ही काहीही ठेऊ शकत नाही. रस्त्याने किंवा हॉटेलच्या आवारात
उघड्यावर आम्ही एखादा पदार्थ घेऊन जात असलो तर कावळे येतात आणि आक्रमण करुन तो
घेऊन जातात.
पर्यटकांना तर कावळ्यांचा वैतागच आला आहे. कारण,
पर्यटकांच्या मागे हे कावळे हात धुऊन लागतात. त्यांच्या हातातील पिशव्या, खाद्य
पदार्थ या साऱ्यांवर ते तुटून पडतात. पर्यटकांना उघड्यावर जेवण करणेही मुश्कील
बनते. तसेच, कावळ्यांच्या थव्यामुळे पर्यटक मनसोक्त हिंडू सुद्धा शकत नाहीत.
या सर्व परिस्थितीची दखल घेत केनिया सरकारने या
कावळ्यांना मारण्यासाठी विष खरेदीला परवानगी दिली आहे. हॉटेल व्यावसायिक, शेतकरी,
पोल्ट्री व्यावसायिक आता विविध खाद्य पदार्थांमध्ये हे विष मिसळतील आणि ते
कावळ्यांना खायला देतील.
केनियाच्या वन्यजीव प्राधिकरणाने सांगितले आहे की, हे
कावळे मूळचे पूर्व आफ्रिकेतील नाहीत. ते भारतीय आहेत. केनियातील मोंबासा, मालिंदी, किलिफी आणि वाटमू या समुद्र किनारी
शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत या कावळ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
त्यांच्या मोठ्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन सरकारने १० लाख
कावळे नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हॉटेल उद्योगाचे प्रतिनिधी आणि कावळे
नियंत्रणात तज्ञ असलेल्या व्यावसायिकांचा समावेश असलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला आहे.
केवळ नागरिकांनाच या कावळ्यांचा त्रास नाही तर अन्य
पक्ष्यांनाही त्याचा फटका बसतो आहे. हे कावळे अन्य पक्ष्यांवर आक्रमण करतात.
त्यांना नुकसान किंवा इजा पोहचवतात. त्यांची अंडी किंवा घरटी यांचीही मोडतोड
करतात. त्यामुळे केनियाच्या परिसंस्थेवरही याचा परिणाम होऊ लागला आहे. केनियातील
पर्यावरण आणि पक्षीप्रेमींच्या म्हणण्यानुसार, कावळ्यांमुळे अन्य पक्ष्यांची
संख्या झपाट्याने घटते आहे. याचा परिणाम जैवविविधतेवर होत आहे. जैविक साखळी नष्ट
होत आहे. ही बाब पर्यावरणासाठीही घातक आहे.
गेल्या काही वर्षात हे कावळे अतिशय आक्रमक झाल्याचा
नागरिकांचा, व्यावसायिकांचा अनुभव आहे. त्यामुळे सर्वांनाच त्याचा त्रास होत आहे. या
कावळ्यांचा नायनाट करण्यासाठी थेट न्यूझीलंडमधून स्टारलिसाइड नावाचे विष आयात केले
जाणार आहे. त्यासाठीच्या योजनेला केनिया सरकारने मान्यता दिली आहे.
पक्षीशास्त्रज्ञांच्या मते १० लाख कावळे मारण्यासाठी ५ ते १० किलोग्रॅम विषाची गरज
आहे. या विषासाठी एका किलोला ६ हजार अमेरिकन डॉलर एवढा खर्च येणार आहे. विविध
प्रकारच्या मांसाच्या तुकड्यांमध्ये हे विष मिसळले जाणार आहे. याद्वारे १० ते १२
तासांत कावळे गतप्राण होतील. हे विष सर्वसाधारण नाही. कारण, या विषामुळे मृत
झालेल्या कावळ्यांना खाणाऱ्या इतर प्रजातींसाठी ते धोकादायक ठरणार नाही.
केनियातील पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, कावळ्यांना विष देऊन मारणे हा काही ठोस उपाय नाही. त्यापेक्षा सरकारने स्वच्छता मोहिमेवर भर द्यायला हवा. जशी स्वच्छता होईल आणि कावळ्यांना अन्न मिळणार नाही तसा कावळ्यांचा उपद्रव कमी होईल. कारण, अस्वच्छतेवरच कावळे जगतात. त्यांना खाद्य मिळते. नागरिक, सरकार आणि प्रशासन या तिघांनी स्वच्छतेचा वसा घेतला तर कावळेच काय अन्य प्रश्नही निकाली निघतील, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. तूर्तास, जगभरात या कावळ्यांच्या संहार आणि शिरकाणाचे वृत्त सर्वच माध्यमांमध्ये चर्चिले जात आहे.
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा