भारत-बांगलादेश यांच्यात कोणते करार झाले? मोदी-हसीना यांच्यात काय चर्चा झाली?
भारत-बांगलादेश यांच्यात कोणते करार झाले? मोदी-हसीना यांच्यात काय चर्चा झाली?
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दोन दिवसीय भारत
दौऱ्यावर आल्या. भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशसोबत भारताचे संबंध
अधिक दृढ होण्याच्यादृष्टीने अनेक करार झाले आहेत. आगामी काळासाठी हा दौरा आणि हे
करार अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
भावेश ब्राह्मणकर
गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख
हसीना यांची तब्बल १० वेळा भेट दिली आहे. बांगलादेश हा ‘शेजारी राष्ट्र प्रथम’
धोरण,
ॲक्ट ईस्ट धोरण दृष्टिकोन सागर आणि हिंद - प्रशांत दृष्टिकोनाच्या
संगमावर आहे. गेल्या एकाच वर्षाच्या कालावधीत आम्ही एकमेकांच्या सोबतीने, लोक कल्याणाचे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम पूर्ण केल्याचे मोदींनी म्हटले
आहे. अखौडा - अगरतळा दरम्यान भारत बांगलादेशाची सहावी सीमापार रेल्वे लिंक सुरू
झाली आहे. खुलना - मोंगला बंदराद्वारे भारताच्या ईशान्येकडील राज्यांसाठी कार्गो
सुविधा सुरू करण्यात आली आहे. मोंगला बंदर प्रथमच रेल्वेने जोडले गेले आहे.
१३२० मेगा वॅट मैत्री थर्मल पावर प्लांट च्या दोन
युनिटनी वीज निर्मिती सुरू केली आहे. दोन्ही देशांदरम्यान भारतीय चलन रुपयांमध्ये
व्यापाराची सुरुवात झाली आहे. भारत-बांगलादेश दरम्यान गंगा नदीवर जगातील सर्वात
लांब नदी क्रूज सेवा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. भारत-बांगलादेश दरम्यान
पहिली सीमापार मैत्री पाईपलाईन पूर्ण करण्यात आली आहे. भारतीय ग्रीडच्या
माध्यमातून, नेपाळमधून
बांगलादेशापर्यंत वीज निर्यात, हे ऊर्जा क्षेत्रात उप
प्रादेशिक सहयोगाचे पहिले उदाहरण बनले आहे. केवळ एका वर्षाच्या कालावधीत, इतक्या विविध क्षेत्रांमध्ये, इतके मोठे उपक्रम
प्रत्यक्षात साकार करणे, आपल्या संबंधांची गती आणि प्रमाण
दर्शवतात, असे मोदींनी म्हटले आहे.
भारत आणि बांगलादेशने नव्या क्षेत्रात सहयोग
करण्यासाठी भविष्याचा दृष्टिकोन तयार केला आहे. हरित भागीदारी, डिजिटल भागीदारी, नील अर्थव्यवस्था, अंतराळ अशा अनेक क्षेत्रांमध्ये सहयोगाबाबत झालेल्या सहमतीचा लाभ दोन्ही
देशांच्या युवकांना मिळेल. भारत-बांगलादेश “मैत्री
उपग्रह” दोन्ही देशांच्या संबंधांना नवी उंची
देईल. त्याचबरोबर दोन्ही देशांनी पुढील बाबींवर लक्ष्य केंद्रित केले आहे. संपर्क सुविधा, वाणिज्य आणि सहयोग. गेल्या दहा वर्षात आम्ही १९६५ च्या पूर्वीची
कनेक्टीव्हिटी पुनर्संचयित केली आहे. आता आम्ही आणखी अधिक डिजिटल आणि ऊर्जा संपर्क
सुविधेवर भर देऊ. यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आपल्या
आर्थिक संबंधांना नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी दोन्ही पक्ष सीपा बाबत चर्चा
करण्यासाठी सहमत झाल्याचे मोदींनी सांगितले आहे. बांगलादेशातील सिराजगंजमध्ये एका
अंतर्देशीय कंटेनर डेपोच्या निर्मितीसाठी भारत मदत करणार आहे.
भारत आणि बांगलादेशाला एकूण ५४ सामायिक नद्या एकमेकांशी
जोडतात. पूर व्यवस्थापन, याबाबत सावधानतेचा इशारा, पिण्याच्या पाण्यासंदर्भातले उपक्रम यात दोन्ही देश सहयोग करत आले आहोत. १९९६
च्या गंगानदी पाणी कराराच्या नूतनीकरणासाठी तांत्रिक स्तरावर चर्चा सुरू करण्याचा
निर्णय या भेटीत घेण्यात आला आहे. बांगलादेशात तिस्ता नदीचे संरक्षण आणि
व्यवस्थापन याबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच तंत्रज्ञांचा एक गट बांगलादेशाचा दौरा
करणार आहे.
संरक्षण सहयोग आणखीन मजबूत करण्यासाठी, संरक्षण क्षेत्रातील उत्पादनापासून ते सैन्य दलाच्या आधुनिकीकरणावर
मोदी-हसीना यांच्यात तपशीलवार चर्चा झाली आहे. दहशतवादाला आळा, कट्टरतावाद आणि सीमेचे शांततापूर्वक व्यवस्थापन याबाबत सहभाग मजबूत
करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. हिंद महासागर क्षेत्राबाबत दोन्ही देश समान
दृष्टिकोन बाळगून आहोत. हिंद प्रशांत महासागर उपक्रमात सहभागी होण्याबाबत
बांगलादेशाने घेतलेल्या निर्णयाचे मोदींनी स्वागत केले आहे. बिमस्टिक सहित अन्य
क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर देखील यापुढे आपला सहयोग अखंड ठेवण्याचा
निर्धार मोदी आणि हसीना यांनी केला आहे.
आपली सामायिक संस्कृती आणि उभय देशातल्या नागरिकांचे
परस्पर संबंध हाच आपल्या संबंधांचा पाया आहे. शिष्यवृत्ती, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धीला आणखी चालना देण्याचा निर्णय घेतला आहे.
वैद्यकीय उपचारांसाठी बांगलादेशातून भारतात येणाऱ्या लोकांसाठी भारत ई-वैद्यकीय
व्हिजा सुविधा सुरू करणार आहे. बांगलादेशाच्या वायव्य भागातील लोकांच्या
सुविधेसाठी रंगपुरमध्ये एक नवा सहाय्यक उच्च दूतावास उघडण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे.
बांगलादेश भारताचा सर्वात मोठा विकास भागीदार आहे आणि
बांगलादेशाबरोबरच्या आपल्या संबंधांना आम्ही अत्याधिक प्राधान्य देतो, असे मोदी
यांनी म्हटले आहे. वंगबंधूंच्या स्थिर, समृद्ध आणि
प्रगतिशील बांगलादेशाच्या दृष्टिकोनाला साकार करण्यात भारताच्या वचनबद्धतेचा
पुनरुच्चार करण्यात आला आहे. २०२६ मध्ये बांगलादेश विकसनशील राष्ट्र बनणार आहे. “सोनार
बांगला” ला नेतृत्व प्रदान करण्यासाठी पंतप्रधान
शेख हसीना यांचे मोदींनी अभिनंदन केले आहे. एकमेकांच्या सोबतीने ‘विकसित भारत २०४७’
आणि ‘स्मार्ट बांगलादेश २०४१’ हे संकल्प साकार
करु, असा निर्धार दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदी हे पुढील महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे
या कराराच्या पुढील टप्पा गाठला जाईल अशी अपेक्षा आहे. तर, भारतीय दौरा सफल
झाल्यामुळे पंतप्रधान हसीना यांचा आगामी चीन दौरा ही केवळ औपचारिकता राहण्ची
चिन्हे आहेत. मात्र, चीनने जर काही वेगळे डावपेच टाकले तर परिस्थिती वेगळी निर्माण
होऊ शकते, हे लक्षात घ्यायला हवे.
संरक्षण, सामरिकशास्त्र, पर्यावरणाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार
International India Bangladesh Agreements Relations Foreign Affairs Narendra Modi Shaikh Hasina South Asia
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा