वन्यजीव अर्थात वाईल्ड लाईफ क्षेत्रात करिअर करायचं आहे?

वाघ, सिंह, हत्ती, गेंडे, पाणघोडा, चितळ, सांभर या आणि अशा असंख्य वन्यजीवांना पिक्चर्स आणि टीव्हीच्या माध्यमातून पाहण्याची संधी मिळत असली तरी त्यांना न्याहाळण्यासाठी प्रत्यक्ष जंगलातच जावे लागते. जैविक विविधतेतील अमूल्य असा घटक असलेल्या या वन्यजीवांविषयी असलेल्या आकर्षण आणि प्रेमातूनच त्यांच्यासाठी काम करतानाच स्वतःचे करिअर घडविण्याचीही मोठी संधी आहे.

भावेश ब्राह्मणकर
bhavbrahma@gmail.com

वनसंपत्ती आणि वन्यजीव ही निसर्गाने दिलेली अनोखी देणगीच आहे. भारतासारख्या देशात तर निसर्गाने वैविध्यपूर्ण अशा वन्यजीवांची उपलब्धी दिली आहे. पश्चिम घाटासारख्या जागतिक वारसा असलेल्या भागात तर विपुल प्रमाणात वृक्ष आणि वन्यजीव आहेत. देशभरात असलेल्या जंगल आणि अभयारण्यांद्वारे ही संपदा तसेच बहुविधता टिकून आहे. जंगलांमधून रबर, लाकूड, औषधी वनस्पती, फळे, फुले आदिंचा लाभ होतो. त्यामुळेच देशाच्या विकासात वनांचा वाटाही अत्यंत मोलाचा ठरतो. अभयारण्ये आणि आरक्षित वनक्षेत्रांच्या माध्यमातून ही नैसर्गिक संपदा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न वनविभागाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार करीत आहे. 



प्रत्यक्षात ३३ टक्के वनांची आवश्यकता असताना देशात केवळ वीस टक्क्यांच्या आसपास वनक्षेत्र आहे. त्यातही वाढत्या शहरीकरण आणि गरजांपोटी बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळेच अनेक घनदाट जंगले आता विरळ झाल्याचे दिसू लागले आहे. पर्यायाने अभयारण्य आणि जंगलांमधील जैवविविधता आणि वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाघांच्या सद्यस्थितीबाबत व्यक्त होणारी काळजी आणि त्यातून निर्माण झालेले व्याघ्र प्रकल्प आपण पाहतच आहोत. वाघांबरोबरच केंद्र सरकारने हत्तींसाठी प्रकल्प घोषित केला आहे. अद्याप तो कागदावरच असला तरी येत्या काळात तो प्रत्यक्षात अवतरणार आहे. 

वन्यजीवांच्यारुपाने असलेला निसर्गाचा अनमोल ठेवा हळूहळू नष्ट होऊ पाहत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे आणि निसर्गाचे चक्र असंतुलित बनले आहे. ते सावरण्यासाठी आणि अबाधित ठेवण्यासाठी तसेच वाढत्या समस्यांचा सामना करण्यासाठी कुशल आणि पर्यावरणप्रेमी मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. वन्यजीवांसाठी काम करण्याची, त्यांचा जीवनक्रम समजून घेण्यासाठी आणि पृथ्वीवरील एक मौलिक संपदेचे रक्षण करण्याची संधी वन्यजीव संरक्षणाद्वारे आपल्याला मिळू शकते. भारतासह जगभरातीलच वन्यजीवांची सद्यस्थिती पाहता या क्षेत्रात करीअर करणाऱ्यांची नितांत गरज आहे. 

कौशल्य
वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी करीअर करायचे असेल तर त्यासाठी काही बाबींची आवश्यकता आहे. त्यात खासकरुन वन्यजीवांचे आकर्षण, भरपूर फिरण्याची आवड, प्राणी आणि वनस्पतींच्या विविध प्रकारच्या जाती जाणून घेण्यासाठीची जिज्ञासा गरजेची आहे. 

पात्रता
वन्यजीव रक्षणात करीअर करण्यासाठी पदवी मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डाचे बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तर, पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

कोर्सेस
देशातील अनेक कॉलेज, संस्था तसेच विद्यापीठांमध्ये वन्यजीव संरक्षणाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यात
- वाईल्डलाईफ इन्स्टिटयूट ऑफ इंडिया, चांदरबनी, डेहराडून
- वाईल्ड लाईफ इन्स्टिटयूट ऑफ इंडिया, डेहराडून
- फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूट, डेहराडून
- इंडियन इन्स्टिटयूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळ
- बिर्सा कृषी विद्यापीठ, केन्के, रांची
- बीएस्सी आणि एमएस्सी फॉरेस्ट्री तसेच बीएस्सी आणि एमएस्सी वाईल्डलाईफ हा कोर्स करता येतो. तसेच एमएस्सी वूड सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी, एमएस्सी वाईल्डलाईफ बायोलॉजी हा कोर्सही उपलब्ध आहे. त्यासाठी-
 - ओरिसा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, भुवनेश्वर
- त्याचबरोबर बारावी किंवा पदवीनंतरचे पदविका अभ्यासक्रमही देशातील विविध विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत.

संधी

- सरकारी वन विभाग. त्यासाठी इंडियन फॉरेस्ट इन्स्टिट्यूटद्वारे (आयएफएस) परीक्षा घेतल्या जातात.
- अभयारण्ये, विशिष्ट प्रकल्प, प्राणिसंग्रहालय, स्वयंसेवी संघटनांमध्ये
- डिस्कव्हरी, नॅशनल जॉग्रॅफिकसारख्या दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये
- देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या ठिकाणी
- वन्यजीवांसंबंधी काम करणाऱ्या संघटनांमध्ये
- वन्यजिवांची गणना करण्यासाठी
- पर्यावरणाशी संबंधित साप्ताहिके, मासिके यांच्यामध्ये तसेच
- वन आणि वन्यजिवांशी संबंधित संशोधन तसेच अभ्यास करणाऱ्या संघटनांमध्ये संधी मिळू शकते.

Environment Education  Career Wildlife Management  Forest Animals Care Sanctuary Research Study Syllabus Course

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)