इको टुरिझम क्षेत्रात करिअर करायचंय?

ताडोबातील वाघ, काझिरंगातील गेंडा, गीरमधील सिंह, भरतपूरमधील पक्षी, कोकणातल्या समुद्र किनाऱ्या लगत असलेली प्रेक्षणीय स्थळे, कास पठाराच्या ठिकाणची फुले पाहण्याची ओढ निसर्गप्रेमींसह सर्वांनाच असते. जंगल परिसरासह वन्यजीवांना न्याहाळण्यासाठी केले जाणारे पर्यटन गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढले आहे. मात्र, आजही या क्षेत्रात अधिकृत आणि शास्त्रीय माहिती देणाऱ्यांची प्रचंड वानवा आहे. म्हणूनच इको टुरिझमसारखे वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्र अनेकांना खुणावते आहे. 

भावेश ब्राह्मणकर
bhavbrahma@gmail.com

निर्सगाच्या सान्निध्यात जावून आनंदानुभुती मिळवणाऱ्यांची जगभरात कमी नाही. विविध व्याधी, व्याप आणि ताणतणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी निसर्गात जाण्याचा ट्रेण्ड गेल्या काही वर्षापासून रुढ झाला आहे. पक्षी, प्राणी, वन्यजीव, वृक्षसंपदा पाहण्यासाठी आणि नैसर्गिक बाबींनी नटलेल्या ठिकाणांना भेट देण्यासाठीची मोठी आतूरता दिसून येते. पण, आपल्याला योग्य माहिती मिळेल की नाही याबाबत अनेकांना साशंकता असते. त्यामुळेच इको टुरिझमसारखे क्षेत्र करिअरसाठी उपलब्ध झाले आहे. 



देशात आजघडीला सव्वाशेहून अधिक आरक्षित वनक्षेत्रे, शंभराहून अधिक राष्ट्रीय उद्याने, ३५५ हून अधिक वन्यजीव अभयारण्ये, ३९ व्याघ्र प्रकल्प, चार प्रवाळ बेटे, ३४ खारफुटीची जंगले, १५ प्राणिसंग्रहालये आहेत. या ठिकाणचे पर्यावरण, तेथील प्राणी, पक्षी, वनस्पती तसेच निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक जण इच्छूक असतात. पण योग्य ती माहिती तसेच मार्गदर्शन नसल्यामुळे अनेकांना त्याचा आनंद लुटता येत नाही. उदाहरणार्थ, ताडोबातील वाघ, काझीरंगातील गेंडा, गीरमधील सिंह पाहण्याची अनेकांची इच्छा असते. पण, योग्य माहिती मिळाली नाही किंवा या वन्यप्राण्यांचे दर्शन झाले नाही तर निराशा करुन घेण्यापेक्षा अधिकृत गाईडला सोबत घेऊन जाण्याचे प्रमाण वाढत आहे.  

विविध ठिकाणच्या प्राणिसंग्रहालय, अभयारण्य तसेच आरक्षित क्षेत्रात बहुविध प्रकारची जैवविविधता आजही आपले वैशिष्ट्य बाळगून आहे. निरनिराळया वनस्पती, फुले, फळे, पाणथळ जागा यांचे आकर्षण सर्वांनाच राहिले आहे. केरळसारख्या राज्यात पर्यटकांची होणारी तोबा गर्दी ही तेथील निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधता पाहण्यासाठीच होते. म्हणूनच केरळला ‘गॉड्स ओन कण्ट्री’ अर्थात ‘देवभूमी’ असे म्हटले जाते. गोवा, कोकण येथे असणारा पर्यटकांचा ओढा पर्यटनाला वाव देणाराच आहे. पर्यावरणाशी निगडित घटक तसेच ठिकाणची सफर घडवून पर्यटकांना पर्यावरणाप्रती जागरूक करण्याची नामी संधी इको-टुरिझम या संकल्पनेने करिअर करू इच्छिणाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली आहे. त्याकडे आपण कसे पाहतो यावरच सारे काही अवलंबून आहे. पर्यावरण आणि पर्यटनाच्या आवडीमुळेच या क्षेत्रात करिअर करुन अनेकांना आनंद देण्याचे पुण्यही आपल्या पदरात पाडण्याचे कर्म करता येते. 

पर्यावरण रक्षणाचीही संधी
निसर्ग आणि पर्यावरणात जाण्याची इच्छा तसेच आवड असली तरी त्या ठिकाणी जावून अनेक अपर्यावरणीय बाबी करण्याचे पातक असंख्य पर्यटकांकडून केले जाते. यामुळे पर्यावरणाची हानी होण्याबरोबरच ते ठिकाणी प्रदुषितही होण्याचे प्रमाण वाढले आहे. खासकरुन वन्यजीवांच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करणे, वाटेतच कचरा टाकणे, वैशिष्ट्यपूर्ण फळ, वनस्पती, फुले आढळली तर त्याला हात लावणे, ती तोडणे, पक्ष्यांच्या मागे लागणे, प्लास्टिकच्या पिशव्या फेकणे, संरक्षित क्षेत्रात पार्टी करणे, ‘बॉन फायर’ सारखा कार्यक्रम घेण्याचा अट्टहास करणे यासारखे अनेक प्रकार केले जातात. यामुळे आपले वेगळेपण जपून असलेली ठिकाणी प्रदुषित आहेत. यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी इको टुरिझम अगदी परिणामकारक ठरु शकते. म्हणजेच, पर्यावरण रक्षणाचे कामही इको टुरिझमद्वारे करता येऊ शकते.

कौशल्य
- पर्यटनाची आवड
- विविध स्थळांची माहिती
- अनेक कल्पक योजनांना आकार देऊन
- स्वत:ची आणि इतरांची फिरण्याची हौस भागवण्याची इच्छा.

पात्रता
- पदवी मिळवण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे.
- पदविका तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

शिक्षण
- पदवी, पदविका, पदव्युत्तर शिक्षण तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा स्वरूपात शिक्षण घेता येते
- देशातील अनेक विद्यापीठांमध्ये पर्यटनाशी निगडित बहुविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातील काही अभ्यासक्रम असे - पर्यटन व्यवस्थापन पदविका, पर्यटन प्रशासन, पर्यटन पदवी, पर्यटन पदविका, प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन, कार्गो ऑपरेशन ऍण्ड मॅनेजमेंट, हवाई वाहतूक पदविका.
- विविध प्रकारच्या खासगी व सरकारी शिक्षण संस्थांमध्ये पर्यटन विषयाचे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 

संधी
- सरकारी पर्यटन खात्यामध्ये संधी मिळू शकते. त्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात.
- खासगी पर्यटन कंपन्यांमध्ये मार्गदर्शक अर्थात गाईड म्हणून संधी.
- विशिष्ट प्रकल्पांच्या ठिकाणी (उदा. व्याघ्र प्रकल्प, गज कॉरिडोर) असलेल्या संलग्न संस्थांमध्ये काम करता येईल.
- स्वतःची पर्यटन कंपनी स्थापन करता येईल.
- स्वतःचा पर्यटन व्यवसायही करता येईल.
- पर्यटन कंपन्यांना विविध प्रकारच्या सेवा पुरविणे, त्यांच्या सहाय्याने विविध दौरे आयोजित करणे, पर्यटकांना विविध सेवा पुरविणे आदि कंत्राटे मिळू शकतात.

Environment Education Career Eco Tourism Nature Forest Wildlife Animals Course Syllabus Opportunity 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)