जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) क्षेत्रात करिअरच्या आहेत एवढ्या साऱ्या संधी
रंगबिरंगी फुलपाखरं, उडणारा सरडा, रानमांजर, वैशिष्ट्यपूर्ण कीटक, पक्षी आणि दुर्मिळ वनस्पती हे सर्व जैविक विविधतेचे अंग आहेत. निसर्गाचा ठेवा असलेली ही विविधता (बायोडायव्हर्सिटी) भारतात आणि खासकरुन पश्चिम घाटात आपले अस्तित्व जपून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही बहुविविधता संकटात सापडली आहे. ही जैवविविधता वाचविण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी याच क्षेत्रात करिअर करुन आपण परिणामकारक भूमिका बजावू शकतो.
भावेश ब्राह्मणकर
bhavbrahma@gmail.com
भौगोलिकदृष्ट्या अनोख्या असलेल्या भारताला लाभलेलं एक वेगळी देण म्हणजे पश्चिम घाट. अॅमेझॉनच जंगल जसं जागाला खुणावतं अगदी तसाच पश्चिम घाट संपुर्ण आशिया खंडाला. डोंगर, दऱ्या, समुद्र किनारा, झरे, तळी, धरणं, नद्या, धबधबे, वनसंपदा, प्राणी, वनस्पती असं सारं लोभस वातावरण या घाटाच्या परिसरात आहे. प्राण्यांच्या काही वैशिष्ट्यपूर्ण जाती जगात केवळ या घाटाच्या परिसरातच आढळतात. त्यामुळं जगभरातील असंख्य वन्यजीव आणि निसर्गप्रेमी घाटात भ्रमंती करुन त्यांचं अनोखपण हुडकून काढतात. आणि हीच बाब जेव्हा डिस्कव्हरी, नॅशनल जॉग्राफिक आणि तत्सम टीव्ही चॅनल्सवर पाहतो. तेव्हा आपल्याला त्याचं फारच अप्रुप वाटतं. आपल्याकडच्या निसर्गसंपदेची परकीयांनी घेतलेली दखल कौतकास्पद आहेच. मात्र, आपण याच संपदेसाठी काय करतो आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे.
गुजरातच्या डांग जिल्ह्यातील तापी नदीकाठ आणि सातपुडा पर्वतरांगांचा परिसरातून पश्चिम घाटाला सुरुवात होते. डांग आणि महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्याचा परिसर घाटात मोडतो. पुढे पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण या ठिकाणी पश्चिम घाटाचा विस्तार मोठा आहे. गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये घाटाचा विस्तार पहायला मिळतो. एकूण सहा राज्यांच्या भूभागात समाविष्ट झालेल्या या घाटात पाच हजाराहून अधिक फुलांच्या वनस्पती, १३९ सस्तनप्राणी, ५०८ पक्ष्यांच्या प्रजाती, १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात. खासकरुन, सिंधुदुर्ग, कोकण आणि गोवा या पट्ट्यात फुलपाखरांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा २००हून अधिक प्रजाती आढळतात. यातील काही प्रजाती अत्यंत दुर्मिळ स्वरुपाच्या आहे. फुलपाखरांच्या स्वच्छंद विहरण्याचा आणि त्यांचे जीवनचक्र समजून घेणार्यांना पश्चिम घाटात आणि खासकरुन महाराष्ट्र आणि गोवा या परिसरात येण्यावाचून पर्याय राहत नाही. म्हणजेच, जैवविविधतेनं नटलेला हा घाट म्हणजे एकप्रकारची खाणच आहे.
युनेस्कोने पश्चिम घाटाला जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. माळढोकपासून वाघापर्यंत आणि साध्या वनस्पतींपासून दुर्मिळ अशा औषधी वनसस्पतींपर्यंत घाटात संपन्नतेची रेलचेल आहे. हे सारं एकून पश्टिम घाटाविषयी आपली छाती अभिमानानं फुलते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या घाटात मानवी हस्तक्षेप लक्षणीयरित्या वाढला आहे. यात खासकरुन खाणकाम, वीज प्रकल्प, वृक्षतोड, आणि विकासाच्या नावाखाली येणारे विविध प्रकारचे ‘उद्योग’ या साऱ्यांचा परिपाक पश्चिम घाटातील मानवी हस्तक्षेपाला कारणीभूत ठरला आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यात तर खाणींचा सुळसुळाटच आहे. खाणींच्या माध्यमातून जंगल परिसरात होणारा वावर, चालणारे खणीकर्म, वाहनांची वर्दळ, वायू प्रदूषण, यंत्रांचा वापर आणि त्याचा आवाज, तोडली जाणारी झाडे आणि इतर अनेक बाबी परिसरातील पर्यावरणावर अत्यंत हानिकारक ठरत आहेत. हीच बाब इतर उद्योग आणि प्रकल्पांच्या बाबतीत लागू आहे. याचा परिपाकच म्हणूनच घाटातील जैविक वैविध्य संकटात सापडले आहे. घाटातील ३२५ प्रजाती शेवटच्या घटका मोजत आहेत. म्हणूनच या जैविक विविधतेचे संरक्षण तसेच संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर येवून ठेपली आहे. ही जबाबदारी आणि आपल्याला असलेली आवड लक्षात घेऊन हे क्षेत्र आपल्याला करिअर करण्यासाठी खुले आहे.
हे हवे कौशल्य
- पर्यावरण, जैवविविधतेविषयी प्रेम
- चिकाटी
- फिरण्याची आवड
- जिज्ञासा
- निरीक्षण क्षमता
पात्रता ही हवी
- जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण असणाऱ्या कुणालाही पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल.
- पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
- बारावी किंवा पदवीनंतरचे पदविका अभ्यासक्रमही विविध विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत.
- अनेक विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी शाखेचेही अनेक अभ्यासक्रम आहेत. त्यासाठी बारावीत गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
येथे मिळेल शिक्षण
- पुणे विद्यापीठात एमएस्सी बायोडायव्हर्सिटी हा कोर्स उपलब्ध आहे.
- एन्व्हायर्नमेंट हा कोर्स बंगळुरूच्या नॅशनल स्कूल ऑफ लॉ येथे उपलब्ध आहे.
- बी.एस्सी. एन्व्हायर्नमेंट सायन्स हा कोर्स दक्षिण गुजरात विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, ओरिसातील बेऱ्हामपूर विद्यापीठ, कोईमतूरच्या भारथीयार विद्यापीठ, म्हैसूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ येथे उपलब्ध आहे.
- डिप्लोमा आणि एम.एस्सी. एन्व्हायर्नमेंट सायन्स हे कोर्स पुण्याचे भारती विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठ, नवी मुंबईतील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट येथे उपलब्ध आहेत.
- बी. ई. एन्व्हायर्नमेंट सायन्स हा कोर्स कोल्हापूर इंजिनिअरिंग कॉलेज, मंडया येथील पीईएस कॉलेज, दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेज, अहमदाबाद येथील एल. डी. कॉलेज, चिकमंगळूर येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ
- एम.ई. आणि एम.टेक. हे कोर्स दिल्ली, कानपूर, खरगपूर आणि मद्रास येथील आयआयटी, नवी दिल्लीतील जामिया मिलीया इस्लामिया, इंदोरच्या राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय, लखनऊमधील उत्तर प्रदेश तांत्रिक विद्यापीठ, पटियालातील थापर अभियांत्रिकी संस्था
- पर्यावरण व्यवस्थापन हा कोर्स नवी दिल्लीच्या बीएसआय इंडिया, कोलकात्याच्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सोशल वेलफेअर ऍण्ड बिझनेस मॅनेजमेंट, नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पर्यावरण अभ्यास केंद्र येथे करता येईल.
- पुण्यातील इकॉलॉजीकल सोसायटी व मुंबईतील पलाश या संस्थेच्या वतीने पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. PG Diploma in Sustainable Natural Resource Management & Conservation असे त्याचे नाव असून, तो अर्धवेळ स्वरूपाचा आहे. रविवारी त्याचे वर्ग होतात. कुठल्याही शाखेचा पदवीधर त्यास प्रवेश घेऊ शकतो. मुंबई आणि पुणे या ठिकाणी हा अभ्यासक्रम घेतला जातो.
- परदेशात शिक्षणासाठी कॅनडा सरकारतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी जीआरई, टोफेल या परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते.
नोकरी/व्यवसाय/उद्योग संधी
- सरकारी पर्यावरण खात्यामध्ये संधी मिळू शकते. त्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात.
- विविध प्रकारच्या बिगर सरकारी संस्था संघटनांमध्ये (एनजीओ) संधी.
- पर्यावरणाशी संलग्न सराकारी विभाग तसेच संस्थांमध्ये कार्य करता येईल.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या डब्ल्यूडब्ल्यूएफ, नवी दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एन्व्हायर्नमेंट, अहमदाबादच्या सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन यांसारख्या संघटनांमध्ये कार्य करता येईल.
- संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण विषयक कार्यक्रम (युनेप)मध्ये किंवा त्याच्याशी संबंधित प्रकल्प, संस्था यांच्यातही काम करण्याची संधी मिळू शकते.
Environment Education Biodiversity Career Animal Ecosystem tree forest Green
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा