जल व्यवस्थापन (वॉटर मॅनेजमेंट) मध्ये करिअर करायचंय?

पाऊस समाधानकारक झाला नाही तर धरणांमध्ये पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तिसरे महायुद्ध पाण्यावरुनच होईल असे म्हटले जाते.  सुकाळ असो की दुष्काळ पाण्याचे मोल अनन्यसाधारणच आहे. वाढते शहरीकरण आणि सर्वच क्षेत्रांमध्ये वाढणारी पाण्याची मागणी लक्षात घेता पाणी व्यवस्थापनालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात करिअर करुन आपण अनेकांची तहान भागवू शकतो. 

भावेश ब्राह्मणकर
bhavbrahma@gmail.com

पाणी अर्थातच जीवन. पाण्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून आहे. मानवाने आजवर अनेक शोध लावले असले तरी कृत्रिमरित्या पाणी निर्माण करण्यात अपयशच आले आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या उपलब्ध पाण्यावरच या जगाचा गाडा चालू आहे. पृथ्वीवर असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेत गोडया पाण्याचे प्रमाण नगण्य (२.५ टक्के) आहे. यापैकी दोनतृतीयांश साठा हिमनगांमध्ये आहे. उर्वरित एकतृतीयांश साठयापैकी २० टक्के पाणी मनुष्याच्या पोहचण्यापलीकडे, तर ८० टक्के पाण्याचा तीन चतुर्थांश भाग पावसाच्या पाण्याच्या रूपात वाहून जातो. म्हणजे जेमतेम एक टक्काच पाणी आपल्याला वापरायला मिळते. त्यामुळेच पाणी वापर, पुरवठा, नियोजन, साठवणूक, संवर्धन आदि बाबींचा विचार करणे भाग पडते.

 लहरी पावसाळा आणि घटत्या भूजल पातळीमुळे पाण्याचे 'मोल' अधिकच जाणवू लागले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे होणारी वणवण, मुंबईत होणारी पाण्याची मोठी गळती, देशाची राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीसारख्या शहराला स्वतःचे नसलेले पाणी (म्हणजे शहराची तहान बाहेरच्या पाण्यावरच भागवली जाते), वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याच्या मागणीत होणारी वाढ, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन तसेच नव्या स्रोतांचा शोध अपरिहार्य बनला आहे. म्हणूनच राज्य सरकारने समुद्राचे पाणी गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. 


पाण्याच्या मुद्दयावरून होणारे तंटे, वादविवाद गांभीर्य निर्माण करणारे आहेत. जगाच्या पाठीवर तिसऱ्या महायुध्दाचा भडका पाण्यामुळेच उडेल असे भाकीतही वर्तविले जात आहे. त्यातील तथ्य शोधण्याची फारशी गरज नाही. कारण आजच आपण दिवसाआड किंवा ठरावीक काळापुरताच होणाऱ्या पाणीपुरवठयाचा अनुभव घेत आहोत. त्यामुळे पाण्याचे जलस्रोत टिकविणे, त्यांचे संवर्धन, जुन्या स्रोतांचे संवर्धन, सुरळीत पाणीपुरवठा, नव्या स्रोतांची निर्मिती, पाण्याची योग्य साठवणूक, वाटपाचे नियोजन आदि बाबींना प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच 'पाण्यासारखे' करिअर आपल्यासह इतरांचीही तहान भागवण्यासाठी परिणामकारक ठरणार आहे. 

पाणी व्यवस्थापनात करिअर करण्यासाठी काही बाबी जाणून घेणे महत्त्वाचे आहे, ते म्हणजे- पावसासह शेती, औद्योगिक व पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि पुरवठा, पाण्याच्या स्रोत तसेच भूजलाचे संवर्धन, शहरी पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, नैसर्गिक स्रोतांचा संतुलित वापर, पाणी शुध्दिकरण, व्यवस्थापन तंत्रज्ञान, जलसाक्षरता, जागृती, पुनर्वापर . याशिवाय सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आता विस्तारू लागले आहेत. त्यासाठी मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र (एसटीपी) निर्मिती त्याद्वारे अंतर्गत रस्ते, बागबगीचे, झाडे, पार्किंग, बेसमेंट, गच्ची आदि धुण्यासाठी, साफसफाईसाठी, शेतीसाठी प्रक्रियायुक्त सांडपाणी वापरणे शक्य होते. तसेच पाण्याचे प्रदूषण रोखणे हेही मोठे आव्हान सध्या उभे ठाकले आहे. म्हणूनच पाण्याकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. त्यात करिअर करून खऱ्या अर्थाने पाण्याचे संवर्धन करणे शक्य होणार आहे.

कौशल्य
- अभ्यासाची तयारी.
- सखोल अभ्यास, विश्लेषण.
- प्रत्यक्ष लोकांमधे जाऊन काम करण्याची तयारी.
- चिकाटी आणि अखंड मेहनतीची तयारी.

पात्रता
- पदवी मिळवण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,
- पदविका तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
- अभियांत्रिकी शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अभियांत्रिकी शाखेची सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स विषय घेऊन पदवी असणे आवश्यक आहे.
- बारावी विज्ञान शाखेच्या उत्तीर्णांना अभियांत्रिकीसह विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. 

शिक्षण
- आयआयटी किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पाणी व्यवस्थापन किंवा एन्व्हायर्नमेंट सायन्स विषय घेऊन एम.टेक. करता येईल.
- सिव्हिल इंजिनिअरिंग हा विषय घेऊन बी. ई. करणाऱ्यांना पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन हा विषय शिकविला जातो.
- सांडपाणी व्यवस्थापन हा विषय घेऊन अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेता येईल.
- पाणी व्यवस्थापन विषय घेऊन एमएस्सी पदवी घेता येईल. सदरचा अभ्यासक्रम कोईमतूरच्या तामिळनाडू कृषी विद्यापीठात उपलब्ध आहे.
- पाण्यासंबंधीचे प्रमाणपत्र किंवा पदविका अभ्यासक्रमही काही शैक्षणिक संस्थांनी सुरू केले आहेत.
- पाण्याबाबतच्या अभ्यासक्रमांसाठी काही वेबसाईट्स अशा : www.nptel.iitm.ac.in, www.iitr.ac.in, www.naikenviro.com, www.ionindia.com 

संधी
- सरकारी खात्यामध्ये पाणी व्यवस्थापन किंवा पाणीपुरवठा विभागात संधी मिळेल.
- पाण्याचे शुध्दीकरण करणाऱ्या खासगी प्रकल्पांमध्ये नोकरी करता येईल.
- पाणी शुध्दीकरणाचा स्वतःचा प्रकल्प उभारता येईल किंवा त्याचे कंत्राट घेता येईल.
- जल शुध्दीकरणासाठी लागणारे यंत्र, साहित्य पुरवता येईल किंवा त्याचा व्यवसाय करता येईल.
- पाणी शुध्दीकरण प्रकल्पांची उभारणी तसेच त्याची देखभाल याचे कंत्राट घेत येईल, तेथे सेवा देता येईल.
- पाणी बचतीसाठीची उपकरणे विक्री करता येतील किंवा त्यांची निर्मिती करणाऱ्या संस्थांमध्ये नोकरी करता येईल.
- भूजल खात्यामध्ये नोकरी
- धरणांबाबत काम करणाऱ्या संस्थेमध्ये संधी मिळू शकेल.
- पाण्याच्या स्रोतांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या संशोधन संस्थांमध्ये कार्य करता येईल.
- जलसाक्षरतेबाबत कार्य करणाऱ्या संस्था, संघटनांमध्ये सक्रिय होता येईल.

Environment Water Management Career Green Education 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)