“डुबई” चा धडा! (दै. सकाळ)

 चकाचक बिल्डींग आणि भौतिक साधनांचे साम्राज्य असलेली दुबई चक्क पाण्यात असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियात तुफान व्हायरल झाले आहेत. जगातील सर्वात बिझी विमानतळही ठप्प झाले आहे. हे सारे का आणि कसे घडले?

भावेश ब्राह्मणकर
पर्यावरण आणि संरक्षणशास्त्र विषयाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार

धो धो पाऊस... पाण्यात तुंबलेले रस्ते... ठप्प झालेली वाहतूक... कसला तरी आडोसा शोधणारे नागरिक... पाण्याच्या डबक्यात उभे असलेले विमान... या आणि अशा कितीतरी फोटो, व्हिडिओनी सध्या सोशल मिडिया जणू ओसांडून वाहतो आहे. चर्चा आहे ती दुबईच्या डुबई ची. ढगफुटीसदृश पावसाने दुबईची पार वाताहत झाली आहे. जुलै २००५ मध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबई सुद्धा अशीच जलमय बनली होती. त्यावेळीही त्याची जबरदस्त चर्चा झाली. वाळवंटी प्रदेश असलेल्या दुबईत अशा प्रकारे आणि एवढा पाऊस का झाला, दुबईची डोळे दिपावणारी भौतिक प्रगती एवढी कशी तकलादू ठरली, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.



आखाती प्रदेशाचा एक भाग असलेल्या दुबईमध्ये सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस अशरशः कठीण परीक्षा बघणारेच ठरले. दुबईत सोमवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने जो जोर धरला तो मंगळवारी सायंकाळपर्यंत कोसळतच होता. अवघ्या २० तासांमध्ये दुबईत तब्बल १४२ मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. ही ऐतिहासिकच आहे. कारण, दुबईत वर्ष आणि दीडवर्षाकाठी एवढा पाऊस पडतो. ढगफुटीसदृश या पावसाने दुबईची पार वाताहत करुन टाकली. कारण, रस्ते, मॉल्स, मेट्रो स्टेशन्स, शो रुम्स, विमानतळ, पार्क, शॉपिंग सेंटर्स अशी सर्वच ठिकाणे पाण्याच्या वेढ्यात सापडली. सहाजिकच दुबई कोलमडली. प्रवासी, वाहतूकदार, कर्मचारी, विद्यार्थी हे सारेच अडकले. जागेवरुन हलताही येत नसल्याने हे सारेच वैतागले. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने चकाचक रस्त्यांवरच जणू पूर आला. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ दुबई हे ठप्प झाले. या पावसाने जिवीतहानी मोठ्या प्रमाणात झाली नसली तरी भौतिक हानी अफाट झाली. शिवाय वेळ आणि पैसा यांचेही अनन्वित नुकसान झाले आहे. याची एकूण किंमत कोट्यवधीच्या घरात आहे.

डोळे दिपावणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधांनी नटलेल्या दुबईवर पावसाचा कोप का झाला, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. दुबईतील हवामान विभाग आणि हवामन केंद्रात झालेल्या नोंदींनुसार, अवघ्या काही तासांमध्ये बाष्पाचे ढग अचानक कोसळले. त्यामुळेच अवघ्या १८ ते २० तासांमध्ये  १४२ मिमी पावसाची नोंद झाली. दुबईपासून १३० किमी अंतरावर असलेल्या अल एन या शहरात तब्बल २४५ मिमी पावसाची नोंद झाली. दुबईच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या फुजिराह येथे सुद्धा १४५ मिमी पावसाची नोंद झाली. अभूतपूर्व अशा या पावसामुळे शाळा बंद कराव्या लागल्या तर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सक्तीचे करावे लागले. शिवाय टॅक्सी, मेट्रो अशा वाहतूक सुविधा बंद पडल्याने जे जिथे होते तिथेच अडकले. भर पावसात अशा प्रकारे गुजराण करावी लागेल, असे कुणालाही वाटले नव्हते.

बाष्पाचे मोठे ढग आखाती देशांमधून ओमानकडे जात होते. त्याचवेळी या बाष्पांचे रुपांतर पावसात झाले. परिणामी ढगफुटीचा अनुभव दुबईत आला.

या ढगफुटीला कृत्रिम पावसाचा प्रयोगही कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा होत आहे. कारण, भूगर्भातील जल पातळी वाढविण्यासाठी आणि जलस्त्रोत भरण्यासाठी दुबई दरवर्षी कृत्रिम पाऊस पाडते. समुद्राने वेढलेले आणि वाळवंट व इंधनाचा धनी असलेले दुबई पिण्याच्या पाण्यापासून तसे वंचित आहे. म्हणूनच तेथे कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातो. आकाशामध्ये बाष्पाचे ढग दिसून आले की विशेष विमाने त्या दिशेने झेप घेतात आणि या ढगांवर पोटॅशिअम क्लोराईड फवारतात. यामुळे बाष्पाचे रुपांतर पाण्यात होते. परिणामी, दुबईवर पावसाचा अभिषेक होतो. (महाराष्ट्रातही कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला पण तो अयशस्वी ठरला) २००० पासून दुबई कृत्रिम पावसाद्वारे न्हाऊन निघते आहे. मात्र, यंदा कृत्रिम पावसाने ढगफुटीच्या आपत्तीला तोंड द्यावे लागल्याचे संशोधक व तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण, ही ढगफुटी होण्यापूर्वी अल एन या विमानतळावरुन कृत्रिम पावसासाठीच्या विशेष विमानांना उड्डाण घेण्याचे आदेश तेथील हवामान संघटनेने दिले होते. त्यामुळे या चर्चेला बळकटी मिळत आहे.

अर्थात हा पाऊस कृत्रिम आहे की नैसर्गिक? खरा आहे की खोटा? यात पडण्यापेक्षा दुबईने नेमके काय अनुभवले हे महत्त्वाचे आहे, असे हवामान तज्ज्ञांना वाटते. गेल्या वर्षाच्या अखेरीस जागतिक हवामान परिषद (कॉप २८) ही दुबईतच झाली. देशोदेशीचे प्रतिनिधी, मंत्री, अधिकारी आणि धोरणकर्ते हे दुबईत जमले. हवामान बदल आणि जागतिक तपमान वाढीच्या वैश्विक समस्येवर तेथे मोठा खल झाला. विशेष म्हणजे, या परिषदेचे यजमानपद दुबईकडेच होते. जिवाश्म इंधनांच्या ज्वलनातून हरित गृह वायूंचे पृथ्वी भोवतालच्या वातावरणातील प्रमाण वाढते आहे. आणि हेच या वैश्विक समस्येचे मुख्य कारण आहे. आणि खास बाब म्हणजे, जगभरात जिवाश्म इंधनांचा (पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑईल) जो पुरवठा होतो त्यात मोठा वाटा दुबईचा आहे. म्हणजेच, हवामान बदलाचा लढा जिंकायचा असेल तर जिवाश्म इंधनाला दूर सारावे लागेल. दुबईची अर्थव्यवस्थाच त्यावर अवलंबून असल्याने या परिषदेत काय निर्णय होणार, अशी टीका प्रारंभीच झाली. चर्चेचे गुऱ्हाळ रंगविल्यानंतर आणि ही परिषद लांबल्यानंतरही जागतिक समुहाने ठोस निर्णय घेण्याचे जाणिवपूर्वक टाळले. हवामान बदलामुळे मानवी अस्तित्वच धोक्यात आले असले तरी हवामान परिषदांमध्ये नरो वा कुंज रोवा अशी भूमिका घेतली जात आहे. परिणामी, दुबईतील ढगफुटीसारख्या महाकाय घटनांची मालिका यापुढील काळात देशोदेशी पहायला मिळणार असल्याचा इशारा हवामान तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

१३०० किमीचा समुद्र किनारा लाभलेल्या दुबईची ८५ टक्के लोकसंख्या आणि ९० टक्के पायाभूत सोयी-सुविधा या समुद्रापासून अवघ्या काही मीटरवरच आहे. हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होण्याची भीती आहे. या शतकाच्या अखेरीस ही वाढ १ मीटर एवढी असेल. अशावेळी दुबईसह अनेक देश आणि बेटांचे नक्की काय होईल, याची कल्पनाही करणे अशक्य आहे. त्यामुळे वेळीच शहाणे होण्याचा धडा दुबईतील पावसाच्या हाहाकाराने दिला आहे. दुबईतील हवामान परिषदेत लहान बेटे आणि गरिब देशांचे प्रतिनिधी टाहो फोडून हेच सांगत होते की, तुमच्या पापांची फळे आम्ही का भोगायची. आताच काय ते ठरवा. आम्हाला वाचवा. जगभरात ६ दशलक्षाहून अधिक लोकसंख्या ही समुद्राने वेढलेल्या बेटे आणि लहान देशांवर गुजराण करते आहे. तपमान वाढीचा थेट आणि मोठा फटका या सर्वांना बसणार आहे. त्यामुळे जवळपास सर्वच हवामान परिषदांमध्ये हे देश आर्जव करतात पण विकसित देश त्याला भीक घालत नाहीत. प्रदूषण आणि जिवाश्म इंधन ज्वलनाचा मनमानी कारभार सुरूच आहे. दुबईची डुबई झाल्यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे इतरांनीही खडबडून जागे व्हायचे आहे. अन्यथा मुंबई, दुबई नंतर कुठल्या देशाचा नंबर असेल नैसर्गिक संकटांची मालिका आणखी काय काय रौद्र रुप दाखवेल याची कल्पना न केलेलेच बरे!

--
(
दै. सकाळ मध्ये २० एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)


Dubai Cloud Burst Heavy Rainfall Natural Disaster UAE International Water Logging Climate Change Global Warming Environment Bhavesh Brahmankar Sakal 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)