केरळमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष आता राज्य आपत्ती (दै. लोकमत)

आपल्याकडे जसा बिबट्यांचा प्रादुर्भाव आहे तशाच पद्धतीने केरळमध्ये हत्ती आणि मानव यांच्यात जोरदार संघर्ष होत आहे. गेल्या काही दिवसात या संघर्षाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळेच केरळ सरकारने या संघर्षाला राज्य आपत्तीचा दर्जा बहाल केला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारे हे देशातील पहिलेच राज्य आहे. यामुळे हा प्रश्न सुटेल का ? यातून नक्की काय साध्य होणार ? या निर्णयाचे काय परिणाम होतील ? भावेश ब्राह्मणकर पश्चिम घाटातील सर्वात शेवटचे राज्य असलेल्या केरळमध्ये हत्ती आणि माणूस यांच्यातील संघर्षात दिवसागणिक वाढ होत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये तर या संघर्षामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. कारण, तब्बल ५ जणांचा जीव हत्तींनी घेतला आहे. त्यात वयस्कर आणि तरुणांचा समावेश आहे. हिंसक झालेल्या हत्तींनी थेट माणसावर असा थेट हल्ला करणे आणि माणसाचा जीव घेणे ही बाब खुपच चिंतेची बनली आहे. त्यामुळे केरळ सरकारने आता मानव-वन्यजीव संघर्षाला राज्य आपत्तीचा दर्जा जाहीर केला आहे. अशा प्रकारच्या आपत्तीला आणि समस्येला असा दर्जा देणारे केरळ हे भारतातील पहिलेच राज्य ठरले आहे. परिणामी देशभरातच त्याची चर...