ऑफबीट करिअर - ग्रीन आर्किटेक्चर - बना ग्रीन विश्वकर्मा
ऑफबीट करिअर - ग्रीन आर्किटेक्चर - बना ग्रीन विश्वकर्मा
निवारा ही मानवी जीवनाची एक मुलभूत गरज आहे. या गरजेला गेल्या काही वर्षात अनन्यसाधारण महत्त्वही प्राप्त झालं आहे. त्यामुळेच ‘निवारा’ ही संकल्पना जाऊन त्या जागी ‘बंगला’ हा शब्द रुढ झाला आहे. म्हणजेच, जसा काळ बदलतोय तसा निवारा आणि बंगला या संकल्पनेतही लक्षणीय बदल झाले आहेत. ही संकल्पना अधिकाधिक विकसीत करण्यात केवळ बांधकामच नाही तर आर्किटेक्चर, इंटेरिअर या क्षेत्रांचाही मोलाचा वाटा आहे. या तिन्ही क्षेत्रांमधून सध्या ग्रीन बिल्डींग या संकल्पनेला विशेष प्राधान्य दिले जात आहे. वाढती महागाई आणि पायाभूत सुविधांचा होणारा विकास पाहता पर्यावरण स्नेही आणि ऊर्जेची बचत करणाऱ्या ग्रीन बिल्डींगला आगामी काळात प्रचंड महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळेच बहुविध पर्यावरणस्नेही उपाययोजना करणाऱ्या ग्रीन बिल्डींग उभारुन आपण आजच्या युगातले ग्रीन विश्वकर्मा बनू शकतो.
भावेश ब्राह्मणकर
विश्वकर्मा घडविणारा अभ्यासक्रम म्हणून आर्किटेक्चर प्रसिद्ध आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल यांच्याइतकाच लोकप्रिय अभ्यासक्रम म्हणून आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाकडे पाहिले जाते. टेक्नॉलॉजी आणि आर्टस अर्थात तंत्रज्ञान आणि कला यांचा संगम म्हणून या अभ्यासक्रमाची ओळख आहे. विज्ञानाला कलात्मक दृष्टिकोनाची जोड लाभल्यास काय आविष्कार होऊ शकतो, हे या अभ्यासक्रमातून सिद्ध होते. ताजमहल, लेण्या, चारमिनार, स्तूप यांच्याकडे पाहिल्यानंतर या क्षेत्राची शक्ती आपल्याला दिसून येते.
आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावी सायन्स उत्तीर्ण होणे आवश्यक असते. अमेरिकेतील आर्किटेक्चर अभ्यासक्रमांसाठी बारावीचे गुण तसेच विद्यार्थ्याचा पोर्टफोलिओ देखील पाहिला जातो. या पोर्टफोलिओमध्ये विद्यार्थ्याने आपापली अत्युत्तम डिझाइन्स पाहिली जातात. त्यामुळे परीक्षेमध्ये गुण थोडे कमी असले तरी पोर्टफोलिओ उत्तम असतील तर अशा विद्यार्थ्यांना या प्राधान्य दिले जाते. स्कॉलरशिपसाठीही या पोर्टफोलिओचा विशेष विचार केला जातो.
परदेशात आर्किटेक्चर कोर्समध्ये स्पेशलायझेशनसाठी अनेक विषय आहेत. खासकरुन लॅण्डस्केप आर्किटेक्चर, ग्रीन आर्किटेक्चर, इकॉलॉजिकल डिझाइन्स, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डिझाइन्स, एन्व्हायर्नमेंटल डिझाइन आदि. आर्किटेक्चरला प्रवेश घेताना खासकरुन आपल्यातील सृजनशक्तीला जोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या शक्तीला तंत्रज्ञानाची जोड लाभल्यास वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती साकार होऊ शकते. आर्किटेक्चरमधील विषयांची व्याप्ती फारच विस्तृत आहे. त्यामुळे या शाखेत प्रवेश घेतल्यानंतर घाबरुन जाण्याचे कारण नाही. उंच इमारती, टाऊन प्लॅनिंग, एअरपोर्ट, स्टेडियम आदिंची बांधणी, त्यात वापरायचे आधुनिक मटेरिअल याला मोठे महत्त्व आहे. पर्यावरणाचा समतोल साधत नैसर्गिक स्रोतांचा कुशल पद्धतीने वापर करून बांधण्यात आलेल्या बिल्डींगलाच ग्रीन बिल्डिंग असे म्हटले जाते. भारतात नऊ वर्षापासून ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’ आणि ‘ग्रिहा’ या दोन संस्था ग्रीन बिल्डिंगची चळवळ राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
ग्रीन आर्किटेक्चर तसेच ग्रीन बिल्डींग या संकल्पनेत अनेक पर्यावरण हिताच्या बाबी पाळण्यात येतात. बांधकामाच्या ठिकाणी मूळ माती बरोबरच वृक्षांचं संवर्धन करण्यात येतं. बांधकाम सुरू असताना पाण्याचा पुनर्वापर केला जातो. इमारत वापरात आल्यानंतर १०० टक्के सांडपण्याचा पुनर्वापर करणं बंधनकारक असतं. रेन वॉटर हार्वेस्टिंग, कमीत कमी हिरवळ, त्याऐवजी स्थानिक जातींच्या वृक्षांची लागवड, सौरऊर्जेवर आधारित गरम पाणी व्यवस्था, न्हाणीघर आणि स्वच्छतागृहातील सर्व साधनं पाण्याचा कमीत-कमी वापर व्हावा, अशा पद्धतीची असणं आवश्यक आहे.
सौरऊर्जेचा वापराला अधिक प्राधान्य दिले जाते. शक्य असल्यास पवनचक्कीचाही वापर केला जातो. इमारतीचं आरेखन करताना सूर्याचा आकाशातील भासमान मार्ग (सनपाथ), वार्षिक वायू दिशादर्शन तक्ता (विंडोज डायग्रॅम) यांचा अधिक विचार केला जातो. त्यामुळे घरात येणारा नैसर्गिक प्रकाश (उष्णता वगळून) आणि वारा खेळता राहू शकतो. इमारतीचा बाह्य भाग, उद्यानं, तरणतलाव आदी ठिकाणच्या लाइट्ससाठी सौरऊर्जेचा वापर केला जातो. लॉबी तसेच जिने याठिकाणी सेन्सर नियंत्रित ऊर्जा वापर केला जातो. सौरऊर्जेवर आधारित दिवे, कमीत कमी लॉन (हिरवळ), स्थानिक झाडांचं रोपण आणि पाण्यासाठी स्प्रिंकलर यासारखी व्यवस्था यामुळे ग्रीन बिल्डींगची संकल्पना अधिक समृद्ध समजली जाते.
प्रामुख्याने स्थानिक पाचशे किलोमीटर त्रिज्येतील बांधकाम साहित्यांचा वापर केला जातो. साहित्यांचा पुनर्वापर, तसंच कमीत कमी ऊर्जेचा उत्पादनासाठी वापर केला जातो. उष्णता अणि ध्वनिविरोध विटांचा वापर तसेच फ्लाय अॅश समाविष्ट साहित्याला प्राधान्य या बाबी विशेष परिणामकारक ठरतात. बांधकाम सुरू असताना तसंच बिल्डींग वापरात आल्यानंतर कचरा व्यवस्थापनाचं आरेखन आणि उपाययोजना आवश्यक असते. त्यामुळे कचराही निकाली निघतो. ग्लोबल वॉर्मिंगसारखी वैश्विक समस्या रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेकडे पाहिलं जातं. म्हणूनच पर्यावरणस्नेही बिल्डींग तसेच आर्किटेक्चरच्या उभारणीत आपलं योगदान मोलाचं ठरु शकतो. देशातील अनेक विद्यापीठांमध्ये आर्किटेक्चरचे डिप्लोमा आणि डिग्री असे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
Education Career Green Architecture Environment
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा