ऑफबीट करिअर – वन व्यवस्थापन

ऑफबीट करिअर – वन व्यवस्थापन

जंगल हे पृथ्वीचे फुफ्फुस मानले जाते. हे फुफ्फुस सुरक्षित राहिले तर आपण सर्वच जण कुशल राहू शकतो. जंगलांच्या क्षेत्रात मौल्यवान अशी संपत्ती नांदते आणि हीच संपत्ती आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी सहाय्यभूत ठरते. म्हणूनच जंगलांमधील वनसंपदा टिकविणे महत्त्वाचे आहे. केवळ झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश देवून फायदा नाही. आपल्यात खरंच वृक्ष प्रेम असेल तर याच वृक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आपण करिअर करु शकतो. 

भावेश ब्राह्मणकर

पृथ्वीचा ३१ टक्के भूभाग वनांनी व्यापलेला आहे. त्यातील ३८ टक्के वाटा हा प्राथमिक वनांचा आहे. विशेष म्हणजे, विश्वातील ३० कोटी लोकांचे आश्रयस्थान वनेच आहेत आणि १६० कोटी लोकांचे जीवन वनसंपदेवरच अवलंबून आहे. वनसंपदा आणि त्याचा व्यापार गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढला आहे. एकट्या २००४मध्ये जंगलातून मिळणाऱ्या उत्पादनातून ३२ हजार ७०० कोटी अमेरिकन डॉसलर्सचा व्यापार झाला. लाकूड आणि इतर वस्तूंच्या निर्मितीसाठी ३० टक्के वने कापण्यात आली. त्यामुळेच २०११ हे वनवर्ष साजरं करण्याचा मनोदय होता. भारतातही हिमालयाच्या पायथ्यापासून खाली पश्चिम घाटापर्यंत मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. 



सरकारी भाषेत सागायचे तर २००५ आणि २००९ या दोन्ही सर्वेक्षणांची तुलना करता देशात ७२८ चौरस किलोमीटर जंगल वाढले असल्याचे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात येते. २००९च्या सर्वेक्षणानुसार देशात ६ लाख ९० हजार ८९९ चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल आहे. आपण सर्वच जण विकासाच्या वाटेवर असल्याने अनेक ठिकाणी वनाच्छादित भागात विविध प्रकल्पांना मान्यता देण्यात येते. परिणामी जंगलतोड अपरिहार्य ठरते. त्यामुळे सहाजिकच पर्यावरण आणि विकास असे द्वंद्व निर्माण होते. पण, पर्यावरणस्नेही विकास करण्यासाठी वने अबाधित ठेवणे आवश्यक ठरते. देशाची वाढती लोकसंख्या, गरजा, रोजगार आदि पाहता विविध विकास कामे होणे आत्यंतिक गरजेचे आहे. 

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ती बाब मोलाचीही आहे. पण, त्यासाठी वनसंपदा अत्यावश्यक आहे. २००९च्या सर्वेक्षणानुसार ३२ लाख ८७ हजार २६३ चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रापैकी देशात ६ लाख ९० हजार ८९९ चौरस किलोमीटर क्षेत्रावर वन आहे. त्यात ८३ हजार ५१० चौरस किलोमीटर क्षेत्रावर घनदाट, ३ लाख १९ हजार १२ चौरस  किलोमीटर क्षेत्रावर मध्यम स्वरुपाचे घनदाट तर २ लाख ८८ हजार ३७७ चौरस किलोमीटर क्षेत्रावर खुल्या जंगलाचा समावेश आहे. हे जंगल टिकविण्याची आणि किंबहुना त्यात वाढ करण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. म्हणूनच वनांचे क्षेत्र करिअरसाठी आपल्याला खुणावते आहे.

कौशल्य

- झाडांविषयी प्रेम 

- भरपूर फिरण्याची आवड

- वनस्पतींचे विविध प्रकार जाणून घेण्यासाठीची जिज्ञासा

पात्रता

- पदवी मिळवण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डाचे बारावी उत्तीर्ण असणे.

- पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

शिक्षण

- बीएस्सी आणि एमएस्सी फॉरेस्ट्री हा कोर्स करता येतो. तसेच एमएस्सी वूड सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी हा कोर्सही उपलब्ध आहे. त्यासाठी

- फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूट, डेहराडून

- इंडियन इन्स्टिटयूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळ

- बिर्सा कृषी विद्यापीठ, केन्के, रांची

- ओरिसा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, भुवनेश्वर

- वाईल्डलाईफ इन्स्टिटयूट ऑफ इंडिया, चांदरबनी, डेहराडून

- वाईल्ड लाईफ इन्स्टिटयूट ऑफ इंडिया, डेहराडून 

- त्याचबरोबर बारावी किंवा पदवीनंतरचे पदविका अभ्यासक्रमही देशातील विविध विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत.

संधी 

- सरकारी वन खात्यामध्ये संधी मिळू शकते. त्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात.

- वनांसंबंधी काम करणाऱ्या संघटनांमध्ये

- अभयारण्ये, विशिष्ट प्रकल्प, प्राणिसंग्रहालय, स्वयंसेवी संघटनांमध्ये

- डिस्कव्हरी, नॅशनल जॉग्रॅफिकसारख्या दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये

- पर्यावरणाशी संबंधित साप्ताहिके, मासिके यांच्यामध्ये तसेच

- वनांशी संबंधित संशोधन तसेच अभ्यास करणाऱ्या संघटनांमध्ये

bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार

Education Career Forest Management


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)