ऑफ बीट करिअर - विनयार्ड टुरिझम

ऑफ बीट करिअर - विनयार्ड टुरिझम

आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये पर्यटन उद्योगाचा वाटा तब्बल ६.२ टक्के तर रोजगार निर्मितीमध्ये ८.९ टक्के इतका आहे. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनाला प्रचंड वाव असल्याचे स्पष्ट होते. या क्षेत्रातील क्षमता ओळखूनच नाविन्यपूर्ण अशा विविध प्रकारच्या पर्यटनाला चालना दिली जात आहे. पर्यटन उद्योगातील नव्यानेच उदयास आलेल्या विनयार्ड अर्थात वाइन टुरिझमसारख्या क्षेत्राचे महत्त्वही अनन्यासाधारण असेच आहे. या क्षेत्रात करिअर करुन आपण आपली चुणूक दाखवू शकतो. 

भावेश ब्राह्मणकर

वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये २००९ ते २०१८ या काळात भारत हा पर्यटनासाठी हॉट स्पॉट ठरणार आहे. या दहा वर्षात पर्यटनाद्वारे भारत लक्षणीय विकास साधू शकेल. हे पाहूनच भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी बुद्धीस्ट टुरिझम, इको टुरिझम, वाइल्ड लाइफ टुरिझम, लेक टुरिझम, बॉलिवूड टुरिझम, वाइन टुरिझम, अडव्हेंचरस टुरिझम यासारख्या विविध क्षेत्रांचा विचार केला जात आहे. वाइन टुरिझम या क्षेत्रही भारतात आता रुजू लागलं आहे. भारताची वाइन कॅपिटल असलेल्या नाशिकमध्ये त्याचा विशेषत्वाने प्रत्यय येतो. पण, या क्षेत्राच्या विकासाला अजूनही प्रचंड वाव आहे. 



देशातील वाइन उद्योग सुरु होऊन साधारण दशकभराचा कालावधी लोटला आहे. आजघडीला भारतात जवळपास १०० वायनरी आहेत. यातील ७२ वायनरी महाराष्ट्रात तर ३५ वायनरी एकट्या नाशिक जिल्ह्यात आहेत. तर, भारतात सध्या पाच हजार एकर जमीन ही द्राक्षांच्या लागवडीखाली आहे. त्यात वाइन आणि खाण्यासाठीचे द्राक्ष (टेबल ग्रेप्स) यांचा समावेश आहे. पुणे, नाशिक, बंगळुरु, बेळगाव, बिजापूर, नंदी या भागात द्राक्षांची लागवड आहे. केवळ द्राक्षबागेला भेट देण्याऐवजी एखाद्या वायनरली भेट देवून द्राक्षाच्या बागांबरोबरच वाइन टुरिझम करण्याचा ट्रेण्ड आता रुढ होत आहे. वाइन टुरिझमला वीकेण्ड टुरिझम, न्यू इअर सेलिब्रेशन, इव्हेंट टुरिझम यासारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची जोड लाभत आहे.

फ्रान्स, इटली, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या वाइन उत्पादक देशात वाइन टुरिझम अत्यंत लोकप्रिय आहे. भारतात हे क्षेत्र विकासाच्या वाटेवर आहे. आपल्या शेतात पाचशे ते सहाशे सहाशे पर्यटकांची सोय करणाऱ्या या वाइन टुरिझम केंद्रामध्ये वाइन कशी करतात, वाइनची चव कशी घ्यायची अशा प्राथमिक गोष्टी शिकवल्या जातात. वाइनच्या द्राक्षांच्या बागा, या बागांमध्येच विसावलेला वाइन निर्मितीचा कारखाना, तिथल्याच एका भागात असलेले हॉटेल, त्यात मिळणारे नानाविध पदार्थ, वाइन कॉर्नर, तेथे होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असा सारा लवाजमा वाइन टुरिझममध्ये असतो. वाइन टुरिझमद्वारे वीकेण्ड घालविण्याची तसेच साजरा करण्याची अनोखी पद्धत आता भारतात दिसून येत आहे. आता तर लग्न ठरलेली मंडळी आपल्या लग्न समारंभासाठी खास प्रकारची वाइन अगोदरच बुक करतात. नाशिकमधील वातावरण, हवामान, पाण्याची उपलब्धता, निसर्गमय वातावरण हे सारे पाहता वाइन टुरिझमसाठी नाशकात मोठी क्षमता आहे. 

वाइन कशी तयार होते इथपासून तर वाइन कशी प्यायची, त्यासोबत काय खायचं हे सगळं जाणून घेण्यासाठीही वाइन टुरिझम केलं जातं. वाइन ही द्राक्षापासून बनवली जाते. पण, खाण्याचे आणि वाइनचे द्राक्ष वेगवेगळे असतात. म्हणजेच, जी द्राक्ष आपण खातो त्यापासून वाइन बनवली जात नाही. वाइनसाठी ठराविक जातीचीच द्राक्षं लागतात. त्याद्वारे विविध प्रकारची वाइन तयार केली जाते. वाइन विषयी अनेक समज-गैरसमज आहेत. ते दूर होऊन हे क्षेत्र आता विस्तारु पहात आहे. वायनरीमध्ये वाइन टुरिझम कसे करावे, त्यासाठी बसण्याची व्यवस्था कशी करावी, लँडस्केपिंग कसे असावे, इव्हेंट मॅनेजमेंट कसे करावे, वायनरींमध्ये कुठल्या प्रकारचे इव्हेंट घ्यावेत, वायनरींमध्ये कुठल्या प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशा अनेक बाबींवर आता लक्ष केंद्रित केले जात आहे. परदेशातील वायनरींमध्ये केले जाणारे वाइन टुरिझम आणि आपल्याकडील टुरिझम याची सांगडही घातली जात आहे. त्यात आणखी वेगळे काही करुन हे क्षेत्र अधिक नावारुपाला येणार आहे. 

गुणवत्ता आणि तंत्रज्ञानासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ व्हाईन अँड वाईन (ओआयव्ही) या संस्थेचे सदस्यत्व भारताने स्विकारले आहे. या संस्थेच्या महासंचालकांनी भारताला आणि नाशिकला नुकतीच भेट दिली आहे. या संस्थेचा फायदा वाइन उद्योगाच्या विकासाला होणार आहे. परिणामी, वाइन टुरिझमही भरारी घेणार आहे. हे सर्व लक्षात घेता, वाइनचे द्राक्ष उत्पादक, वायनरी मालक, त्यांची संस्था, वाइन क्लब यांच्याबरोबरच केंद्रीय पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांनी एकत्रितरित्या प्रयत्न केल्यास हा उद्योग अधिक विकसीत होणार आहे. परिणामी विनयार्डमधील टुरिझम लक्षणीयरित्या वाढेल. स्वतः वायनरी आणि विनयार्डची माहिती घेऊन पर्यटकांना ती दिल्यास हे वेगळे पर्यटन नक्कीच लाभदायी ठरणार आहे. आगामी काळाची गरज, बदलते ट्रेण्ड लक्षात घेता एखादी एजन्सी स्थापून किंवा गाईड बनूनही आपण विनयार्ड पर्यटनाची सेवा देवू शकतो. त्यामुळे करिअरचे हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे.  

कौशल्य
- पर्यटनाची आवड
- वाइन, विनयार्डची इत्थंभूत माहिती
- अनेक कल्पक योजनांना आकार देण्याची क्षमता
- स्वत:ची आणि इतरांची फिरण्याची हौस भागवण्याची इच्छा

पात्रता
- पदवी मिळवण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे
- पदविका तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे

शिक्षण
- पदवी, पदविका, पदव्युत्तर शिक्षण तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा स्वरूपात शिक्षण घेता येते
- देशातील अनेक विद्यापीठांमध्ये पर्यटनाशी निगडित बहुविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातील काही अभ्यासक्रम असे - पर्यटन व्यवस्थापन पदविका, पर्यटन प्रशासन, पर्यटन पदवी, पर्यटन पदविका, प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन, कार्गो ऑपरेशन ऍण्ड मॅनेजमेंट, हवाई वाहतूक पदविका.
- विविध प्रकारच्या खासगी व सरकारी शिक्षण संस्थांमध्ये पर्यटन विषयाचे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 

bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार

Education Career Wine Tourism Vineyard

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)