ऑफ बिट करिअर -- कृषी अभियांत्रिकी

ऑफ बिट करिअर -- कृषी अभियांत्रिकी

‘मला इंजिनिअर व्हायचं’ असं म्हणणाऱ्यांची आज कमी नाही. सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर, आयटी यासारख्या काही शाखांकडेच विद्यार्थ्यांचा कल असतो. पण, अभियांत्रिकी क्षेत्रात आजघडीला असंख्य शाखा आहेत. त्यातील काहींची तर केवळ तोंडओळखच असल्याने त्याकडे फार कुणाचा कल नसतो. कृषी अभियांत्रिकी (अ‍ॅग्री इंजिनिअरींग) ही शाखा त्यापैकीच एकत म्हणावी लागेल. या शाखेत शिक्षणाच्या आणि त्यानंतर नोकरीच्या अमाप संधी आहेत. येत्या काळाचा विचार करुन या शाखेत प्रवेश घेणं आणि त्यात करिअर करणं हा अत्यंत सूज्ञपणाच ठरणार आहे.

भावेश ब्राह्मणकर

शहरात राहणाऱ्या मंडळींचा कृषी क्षेत्राशी फारसा परिचय राहत नाही. पण, वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणाऱ्या अन्नधान्याचा विचार करता कृषी क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या काळात कृषी क्षेत्रातही झपाट्याने बदल होत आहेत. नांगरणी, कुळवणी, तण काढणे, पाणी देणे, पीक कापणे, धान्य मळणे व साठवणी या शेतीच्या कामांसाठी कमीत कमी माणसांचा उपयोग करून यंत्रांच्या साहाय्याने शेतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत करणाऱ्या शाखेला कृषी अभियांत्रिकी असे म्हणतात. मनुष्याला लागणारे अन्नधान्य व कापसासारख्या उपयुक्त पिकांच्या उत्पादन पद्धतींमध्ये सतत सुधारणा करणे, हे कृषी अभियंत्यांचे महत्त्वाचे कार्य असते. अमेरिकेतील कृषी अभियंत्यांच्या प्रयत्नांमुळे तेथील दर हेक्टरी उत्पन्न जवळजवळ ८० टक्क्यांनी वाढले आहे. कृषीप्रधान असलेल्या भारतात तर कृषी अभियंत्यांची मोठी गरज आहे. 

कृषी व्यवसाय हा जगातील सर्वांत जुना आणि सर्वांत मोठा उद्योग आहे. कृषी अभियांत्रिकीच्या बहुतेक प्रश्नांत जैव वस्तूंचा व विक्रियांचा संबंध येतो आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी कृषी अभियंत्याला भौतिकशास्त्र व अभियांत्रिकीचा उपयोग करावा लागतो. कृषी व्यवसायात आता अनेक प्रकारची यंत्रे, रासायनिक द्रव्ये व माल वाहतुकीची साधने वापरावी लागतात व निरनिराळ्या प्रकारच्या इमारतीही बांधाव्या लागतात. अशा विविध कामांसाठी शेतकऱ्‍याला आता स्वतंत्र कृषी अभियंत्याची मदत घ्यावी लागते. कृषी अभियांत्रिकीमध्ये यांत्रिक, इमारत बांधणी, पाणी पुरवठा व निचरा, मृदा संधारण व सुधारणा, पिकांवरील रोगराईवर उपचार, जंगल सफाई व भूमि-उद्धार आणि विद्युत शक्तीचा वापर हे मुख्य विभाग आहेत.

शेताच्या जमिनीचे व वातावरणाचे तापमान व आर्द्रता यांचे उत्तम नियंत्रण करता आले, तर शेतातील पीक लवकर तयार करता येते व पिकाचे उत्पन्नही वाढते असे अनेक ठिकाणच्या प्रयोगांवरून प्रत्ययास आलेले आहे. हे काम सुरुवातीला बरेच खर्चाचे असले, तरी एकंदरीने फायद्याचेच होईल म्हणून त्याला व्यावहारिक रूप देण्याचे काम पुष्कळ ठिकाणी सुरूही करण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, सिंचन व निचरा, कृषी प्रक्रिया, हरितगृह तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान व अपारंपरिक ऊर्जानिर्मिती अशा विविध क्षेत्रांत कृषी अभियांत्रिकीचा मोठा वाटा आहे. या ज्ञानाच्या आधारे कृषी अभियंता, कृषी विकासाच्या संदर्भातील सर्व बाबींचा आराखडा, विश्लेषण व दुरुस्ती योग्य प्रकारे करू शकतो, त्यामुळे शेतीच्या उत्पादनाबरोबरच दर्जेदार मालाची निर्मिती होते.

इ. स. १९०० पासून अमेरिकेतील काही कृषी महाविद्यालयांत कृषी अभियांत्रिकीची स्वतंत्र शाखा सुरू करण्यात आली. १९६० पर्यंत अमेरिकेमध्ये ३४ कृषी महाविद्यालयांत कृषी अभियांत्रिकीच्या पदवीचे अभ्यासक्रम चालू झालेले होते. भारतामध्ये १९४२ साली अलाहाबाद अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटमध्ये कृषी अभियांत्रिकीच्या पदवी परीक्षेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आणि त्यानंतर खरगपूर, पंतनगर,लुधियाना व उदयपूर येथेही तसेच अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रातही कृषी विद्यापीठ सुरु झाले. 

शिक्षण व पात्रता
महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांमध्ये घटक व विनाअनुदानित महाविद्यालयांमधून बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी) हा पदवी अभ्यासक्रम राबविला जातो. या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी किमान १२ वी विज्ञान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रीतील चारही विद्यापीठांमध्ये एम.टेक. (कृषी अभियांत्रिकी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कृषी अभियांत्रिकीतील पदवी आवश्यक असते.  

प्रवेश प्रक्रिया
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. २००८ च्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र ज्ञान आयोग मर्यादित (एमकेसीएल) यांचे सहकार्याने प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज उपलब्ध आणि अर्ज भरून देण्याची सुविधा विद्यार्थ्यांना एमकेसीएलच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या तालुका पातळीवरील केंद्रामधून उपलब्ध होते. 

परदेशी शिक्षण
भारतात कृषी व संलग्न विषयात पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर परदेशात पदव्युत्तर शिक्षणाच्या विपुल संधी आहेत. अमेरिका, नेदरलॅँड, इस्राईल, बेल्जियम, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, इटली, आफ्रिका व ऑस्ट्रेलियासह जगातील तीसहून अधिक देशांबरोबर भारताचे आंतरराष्ट्रीय कृषी शिक्षण व संशोधन करार आहेत. त्यामुळे या देशातील विविध विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाच्या वाटा खुल्या आहेत. तेथे शिक्षण घेऊन परदेशात किंवा भारतात भरगच्च पगाराची नोकरी मिळण्याची नामी संधी मिळते. तसेच, संशोधनाचीही वाट धरता येते. 

संधी
कृषी अभियांत्रिकी केल्यानंतर खासगी तसेच सरकारी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. कृषी विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलमार्फत विद्यार्त्यांना संधी उपलब्ध होतात. शिवाय कृषी विद्यापीठे, कृषी विभाग या सरकारी क्षेत्राव्यतिरिक्त अनेक खासगी बियाणे कंपन्या, बँका, कीटकनाशक कंपन्या, ठिबक, तुषार सिंचन क्षेत्रातील कंपन्या येथे संधी मिळते. तसेच स्वतःचा कृषी पूरक उद्योग सुरु करुन त्यात नवनीवन प्रयोगही करता येतात. कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अनेक नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. 

 bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार

Education Career Agriculture Engineering



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधू करार रद्द केल्याने काय होईल? पाक काय करेल? (पहलगाम हल्ला लेख २)

ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाकाय धरणाचा भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)