अॅग्री बायोटेक क्षेत्रात करिअरच्या खुप संधी
ऑफ बीट करिअर - अॅग्री बायोटेक
जगाची लोकसंख्या आता सात अब्ज इतकी आहे. आगामी २० वर्षात ही संख्या दहा अब्ज असणार आहे. या लोकसंख्येला आवश्यक ते अन्नधान्य पुरविण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठीच कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संधीचा आपण गांभिर्याने विचार करायला हवा. अॅग्री बायोटेक हे सुद्धा त्यातीलच एक करिअर आहे.
भावेश ब्राह्मणकर
कमी पाण्यात वाढणारे पीक, हवामानातील बदलांचा परिणाम होणारी कृषी वाणे, कमी खर्च आणि जास्त उत्पादन या आणि अशा विविध प्रकारच्या संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी जगभरातच विलक्षण प्रयत्न सुरु आहेत. परिणामी, येत्या काळात कमी जागेत सर्वाधिक उत्पादन घेण्याचा आणि वाढत्या मागणीत योग्य तो अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे कसब साध्य होऊ शकणार आहे. हे सारे ज्या शास्त्रावर आधारीत आहे ते म्हणजे अॅग्री बायोटेक अर्थात कृषी जैवतंत्रज्ञान. खासकरुन कृषी विद्यापीठांमध्ये या क्षेत्रात मोठे काम सुरु आहे. नव्या पिढीने या क्षेत्राचा करिअरसाठी गांभिर्याने विचर करण्याची गरज आहे कारण या क्षेत्रातल्या संधी आगामी काळातील केवळ भारताच्याच नाही तर विश्वातीलच अन्नधान्याचा प्रश्न सोडविणार आहेत.
भारताती निम्मी लोकसंख्या ही उदरनिर्वाहासाठी शेतीवरच अवलंबून आहे. देशाच्या जीडीपीमध्ये (एकूण सकल उत्पादन) कृषी क्षेत्राचा वाटा १५ टक्के इतका आहे. पण, रोजगारातील हा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे शेतीच्या क्षेत्राकडे दुर्लक्षूनच काय पण येत्या काळाचा विचार करता या क्षेत्राकडे जाणिवपूर्वक लक्ष देणे आणि त्यात परिणामकारक बदल करमे अपरिहार्य आहे. शेती ही अधिक गुंतागुंतीची असून ती सामाजिक, आर्थिक व तंत्रज्ञान या घटकांनी जोडलेली आहे. हवामानबदल, जागतिक व्यापार धोरणे, बाजारपेठांचे स्रोत, घटत चाललेले नैसर्गिक स्रोत आदि कारणांमुळे शेती दिवसेंदिवस अधिक अडचणीची व क्लिष्ट होत आहे. शेतीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आहे. अॅग्री बायोटेक या शाखेद्वारे या विद्यापीठांनी अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले आहेत.
जैवतंत्रज्ञान आणि कृषी या दोन शाखांची मिळून तयार झालेली अॅग्री बायोटेक ही शाखा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. विज्ञान आणि कृषी क्षेत्रात आवड असणाऱ्यांना सृजनात्मक काम करण्याची मोठी संधी यात आहे. बटाटे, वांगी, टोमॅटो, कांदा, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळी या कृषी वाणांच्या आधुनिक जाती शोधणे, त्याच्या चाचण्या घेणे, त्याची परिणामकारकता तपासणे ही या शाखेची मोठी बाब आहे. संशोधनाशी संबंधित असलेल्या या क्षेत्रात आजघडीला नानाविध प्रयोग सुरु आहेत. जेनेटीकली मॉडिफाईड (जनुकीय सुधारीत) कृषी वाणे हे या क्षेत्रातील एका संशोधनाचे नाव आहे. पाऊस, पाणी, हवामान यावर आधारलेल्या शेतीला अत्याधुनिकतेची जोड देण्याचे आणि आवश्यक ते अन्नधान्याचे उत्पादन करण्याचे कौशल्य साधण्यासाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते आहे. कुपोषण, अन्नधान्य नासाडी, रोगांचा प्रादुर्भाव, पाण्याची अनुपलब्धता, अल्प मोबदला आदि समस्यांचा फेरा चुकविण्याची क्षमता या शाखेत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करुन आपण देशाच्या विकासात मोलाचा हातभार लावतानाच मानवाची मूलभूत गरज भागविण्यातही भूमिका बजावू शकतो.
कौशल्य
जैव तंत्रज्ञानातील मूलभूत वा लेखी (थेअरी) ज्ञान अवगत असावे. त्याला जोड म्हणून त्यातील तांत्रिक कुशलता, प्रात्यक्षिके आणि संवाद साधण्याची क्षमता असावी.
शिक्षण संस्था
अॅग्री बायोटेक या शाखेचे शिक्षण घेण्यासाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था, इज्जतनगर येथील आयव्हीआरआय, सीआयएफई - मुंबई, एएयू - जोऱ्हाट (आसाम), आचार्य एन. जी. रंगा विद्यापीठ - हैदराबाद, आणंद कृषी विद्यापीठ - गुजरात, बिरसा कृषी विद्यापीठ - झारखंड, सीसीएस हरियाना कृषी विद्यापीठ - हिस्सार, सीएसके हिमाचल प्रदेश कृषी विद्यापीठ, जी. बी. पंत विद्यापीठ - उत्तरांचल, आयजीकेव्ही - छत्तीसगड, केरळ कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ - राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापीठ - परभणी, तमिळनाडू कृषी विद्यापीठ, प्राणिविज्ञान विद्यापीठ - तमिळनाडू, धारवाड कृषी विद्यापीठ, तसेच बंगळूर व पंजाब कृषी विद्यापीठे येथे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
संधी
अॅग्री बायोटेक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कृषी उत्पादने बनविणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये मोठी संधी आहे. विविध कंपन्यांमधून वापरण्यात येणारे रिअल टाइम पीसीआर, उतिसंवर्धन, जनुक प्रत्यारोपण, जनुक शोध, अलीली मायनिंग या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही संधी मिळू शकते. राज्य व सरकारी कृषी विभागात अधिकारी व कर्मचारी या पदासाठी संधी आहे. तसेच, कृषी विद्यापीठांमध्ये अनेक पदांवर कार्य करण्यास वाव मिळेल.
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
Education Career Agriculture Biotechnology
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा