ऑफबीट करिअर - हॉटेल मॅनेजमेंट - असे करा आदरातिथ्य
ऑफबीट करिअर - हॉटेल मॅनेजमेंट - असे करा आदरातिथ्य
‘अतिथी देवो भव’ ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. त्यामुळेच आदरातिथ्याला विशेष असा दर्जा आहे. आजच्या आधुनिक भाषेत सांगायचे तर हॉटेल इंडस्ट्रीच्या माध्यमातून पर्यटकांचा आदर करणे, त्यांना सेवा आणि सुविधा देण्याचे हे क्षेत्र आहे. या क्षेत्रात करिअर करुन अनेकांना समाधानी करण्याचे श्रेय आपल्याला मिळू शकते.
भावेश ब्राह्मणकर
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०११मध्ये पर्यटकांनी सर्वाधिक पसंती महाराष्ट्राला दिली आहे. २०११मध्ये १९.५ दशलक्ष परदेशी पर्यटकांनी देशातील विविध राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना भेटी दिल्या. याचाच अर्थ देशात पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे. पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय या दोन्ही एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत, असे म्हटले तर वावगे ठरत नाही. त्यामुळे पर्यटनात हॉटेल व्यवसाय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.
पर्यटन व्यवसायाची जसी वाढ होते आहे तशी देशभरातील हॉटेलची संख्याही. देशात १० लाखांहून अधिल लहान-मोठी हॉटेल्स असल्याचे सांगण्यात येते. एका संस्थेच्या अहवालानुसार, देशातील १२० कोटी लोकसंख्येपैकी १० कोटी लोक नियमीत हॉटेलमध्ये जातात. त्यामुळेच देशात हॉटेलचा किमान व्यवसाय दिवसाकाठी एक हजार कोटी रुपयांच्या आसपास होत असल्याचे सांगितले जाते. फाइव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेल्सच्या रेलचेलीत आता मॅरिएट, हयात, रामी ग्रुप, स्विस इंटरनॅशनल यासारख्या बहुराष्ट्रीय ब्रॅण्डसचची श्रृंखला रुजू होत आहे. येत्या काही वर्षातच पंचतारांकीत हॉटेलची संख्या लक्षणीयरित्या वाढणार आहे. परिणामी, या हॉटेल्ससाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता राहणार आहे.
हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात शेफ म्हणून काम करणे, खाद्यपदार्थांची सजावट, तसेच बुकिंग स्वीकारणे, ऑर्डर्स घेणे, हॉटेलची व्यवस्था पाहणे, साफसफाईचे काम पाहणे इत्यादी गोष्टींची देखरेख, खाद्यपदार्थांसाठी लागणाऱ्या सामानाचे व्यवस्थापन, खाद्यपदार्थांचा दर्जा सांभाळणे, अशा प्रकारची कामे असतात. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये खासकरुन चार विभाग असतात. फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट, किचन, बेकरी आणि हाऊस कीपिंग. स्वयंपाकघरात पदार्थ करण्याचा काही जणांना कमीपणा वाटतो. मात्र, ज्यांना विविध पदार्थ करण्यात विशेष रस आहे त्यांना हे क्षेत्र अधिक समाधान देऊ शकते. हाऊस कीपिंग विभागात हॉटेलची स्वच्छता, नीटनेटकेपणा यांचा समावेश होतो. या क्षेत्रात प्रचंड मेहनत आवश्यक असते. केवळ फाइव्ह स्टार हॉटेलात काम करता येईल म्हणून हॉटेल मॅनेजमेंटकडे येणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण, शिस्त, मेहनत, प्रचंड काम करण्याची तयारी, लोकांमध्ये मिसळण्याची तयारी, समस्यांचे निराकारण करण्याची धडाडी, तसेच लोकांचे आदरातिथ्य करण्याची आवड असेल तर हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात तुम्हाला रेड कार्पेटच अंथरलेले आहे.
शिक्षण
पदवीसाठी - हॉटेल मॅनेजमेंटचा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम बी.एस्सी. (हॉस्पिटॅलिटी व हॉटेल मॅनेजमेंट) या नावाने ओळखला जातो. हा अभ्यासक्रम नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी या पर्यटन मंत्रालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्वायत्त संस्थेची मान्यता असलेल्या संस्थांमध्ये करता येतो. या अभ्यासक्रमात पुढील विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. अन्नपदार्थ निर्मिती, शीतपेये निर्मिती, फ्रंट ऑफिस सेवा, हाऊसकीपिंग, विक्री विपणन, वित्त व्यवस्थापन, हॉटेल व कॅटरिंग कायदा, संगणकज्ञान इत्यादी.
अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी दरवर्षी संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्यात येते. बारावीला बसलेले किंवा बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. मात्र बारावीला इंग्रजी विषय असणे अनिवार्य आहे. प्रवेश परीक्षेमध्ये इंग्रजी भाषा, आकलनक्षमता, सामान्यज्ञान, सेवा व स्वायत्तशीलता कल (अॅप्टिट्यूड), अंकगणिती क्षमता आदिंवर प्रश्न विचारले जातात.
महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचलनालयामार्फत ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (AICTE) द्वारा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम राज्यातील नऊ संस्थांमध्ये शिकवला जातो. हा चार वर्षांचा अभ्यासक्रम असून त्यासाठी बारावी किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशपरीक्षेला पात्र ठरतात. मात्र, बारावीला इंग्रजी विषय असणे अनिवार्य आहे.
शिक्षण संस्था आणि कोर्स
- दादर येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - बी.एस्सी. (हॉस्पिटॅलिटी व हॉटेल मॅनेजमेंट)
- मुंबई विद्यापीठ - बी.एस्सी. (हॉस्पिटॅलिटी स्टडीज व हॉटेल मॅनेजमेंट)
- मुंबई विद्यापीठाशी संलग्न २७ कॉलेजेस - बी.एस्सी. (हॉस्पिटॅलिटी स्टडीज व हॉटेल मॅनेजमेंट)
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - बी.बी.ए. (हॉटेल अॅण्ड टूरिझम मॅनेजमेंट)
- ठाणे येथील एस.ई.एस. कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - हॉटेल मॅनेजमेंट
- महाराष्ट्र स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे
- डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे (पिंपरी)
- महात्मा गांधी विद्यामंदिराचे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, नाशिक
- ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे कॉलेज ऑफ एचएमसीटी, पुणे
- ए.जे.एम.व्ही.पी.सी. इन्स्टिटय़ूट ऑफ एचएमसीटी, अहमदनगर
- सिंहगड इन्स्टिटय़ूट ऑफ एचएमसीटी, लोणावळा.
- तुळी कॉलेज ऑफ एचएम नागपूर
- लेडी अमृताबाई डागा कॉलेज फॉर वुमेन ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अॅण्ड आर. पुरोहित कॉलेज ऑफ होम सायन्स अॅण्ड होम सायन्स टेक्नॉलॉजी, नागपूर
- युगांतर एज्युकेशन सोसायटीचे बाळासाहेब तिरपुडे कॉलेज ऑफ एचएमसीटी, नागपूर
पदविका अभ्यासक्रम - महाराष्ट्रात हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीचा पदविका अभ्यासक्रम अनेक महाविद्यालयांमध्ये शिकवला जातो. तीन वर्षांच्या या अभ्यासक्रमाला बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो.
कोर्स उपलब्ध असलेल्या शिक्षण संस्था
- कोहिनूर इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, दादर
- प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक, मुंबई
- रिझवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, बांद्रा (प.)
- डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, नेरूळ
- अंजुमन ए-इस्लाम ए. के. हफिजाक इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, मुंबई
- भारती विद्यापीठ इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, नवी मुंबई
- गव्हर्नमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, नागपूर
- महाराष्ट्र स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे
- महात्मा गांधी विद्यामंदिर इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, नाशिक
- सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लोणावळा
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
Education Career Hotel Management
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा