ऑफ बिट करिअर - क्लिनिकल रिसर्च
ऑफ बिट करिअर - क्लिनिकल रिसर्च
एखाद्या रोगाला अटकाव करणारे औषध शोधून काढणे तसे जिकरीचेच आहे. नवे औषध शोधतानाच त्याची चाचणी आणि मानवी शरिरावरील अपायांची शहानिशा करणारी शाखा म्हणजे क्लिनिकल रिसर्च. आजच्या घडीला या शाखेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. या शाखेत नव्या संधींबरोबरच पैसाही असल्याने या क्षेत्राचा करिअरसाठी गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.
भावेश ब्राह्मणकर
मानवी जीवनशैली आणि आहार यांचा आरोग्याशी मोठा संबंध आहे. आजच्या धकाधुकीच्या काळात फास्ट फूड किंवा तत्सम पदार्थांकडे सर्वाचा कल असतो. त्यातच जेवणाच्या वेळा निश्चित नसणे, व्यायामाचा अभाव, सकस अन्नपदार्थांची कमतरता, कामाच्या ठिकाणी असलेला ताण, प्रदूषणाचा विळखा या आणि अशा विविध कारणांमुळे मानवी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्यावसायिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात विविध पातळ्यांवर लढणाऱ्या माणसांना विविध रोगांच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव डोके वर काढत असल्याने या रोगांना समूळ नष्ट करणारी औषधे अपरिहार्य बनली आहेत. फार्मसी अर्थात औषध निर्माणशास्त्राद्वारे औषधांचा डोस उपलब्ध होतो. पण, त्यातही आता क्लिनिकल रिसर्च या शाखेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.
शारिरीक, मानसिक अशा विविध पातळ्यांवरच आता रोगांशी सामना करण्यासाठी आवश्यक ती औषधे आजच्या काळाची गरज बनली आहे. ही औषधे शोधून काढणे आणि ती उपलब्ध करुन देणे खरं तर हे धन्वंतरी सारखेच काम आहे. रोगाचे अचूक निदान करून त्यावरच्या एखाद्या औषधाची चाचणी करणे तसेच त्याचे मानवी शरीरावरील परिणाम, दुष्परिणाम वैद्यकीयदृष्ट्या पडताळून पाहणे गरजेचे ठरते. ही सर्व प्रक्रिया ‘क्लिनिकल रिसर्च’ शाखेत केली जाते. दिवसेंदिवस ही शाखा प्रचंड विस्तारत आहे. त्यामुळेच देशातील बहुराष्ट्रीय कंपन्या आणि आऊटसोर्सिंगच्या जॉब्सव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी क्लिनिकल रिसर्च शाखेने उपलब्ध करुन दिली आहे. तसेच या क्षेत्रात असलेला भरपूर पैसाही या शाखेकडे कल निर्माण करणारा आहे.
ठराविक रोगावर एखादे औषध उपयुक्त आहे का हे एकदा समजलं की, त्याच्या गुणवत्तेसंदर्भातील वैद्यकीय चाचण्या करणे गरजेचे असते. त्या औषधाचा मानवी शरीरावर काही परिणाम होतो का, याची खात्री करणे अत्यावश्यक ठरते. औषधाची परिणामकारकता हा ही एक महत्त्वाचा घटक असतो. रुग्णाची रक्त तपासणी करून ते ठरविले जाते. औषधांचा वापर झाल्यावर त्यातील टाकाऊ पदार्थ कशा प्रकारे बाहेर टाकले जातात, त्याचे परिक्षण करणे महत्त्वाचे असते. औषधांची मात्रा अर्थात डोस, त्याच्या वेळा यात वैद्यकीय पद्धतीचा आधार घेऊन योग्य आणि आवश्यक ते बदल केले जातात. अनेकवेळा औषधांच्या फायद्याबरोबर त्याचे दुष्परिणामही असतात. त्याचा गंभीरपणे विचार करुन त्या औषधाची शहानिशा करावी लागते. शारीरिक परिणामांबरोबरच पेशंचट्या मानसिकतेचाही विचार क्लिनिकल रिसर्चमध्ये करणे आवश्यक असते. औषधाची परिणामकारकता, उपयुक्तता, गुणवत्ता आणि दर्जा तपासण्यात आला की त्या औषधाची परवानगी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) घेणे आवश्यक असते.
एफडीएची परवानगी मिळताच ते औषध ड्रग मास्टर फाइलमध्ये (डीएमएफ) नोंद केली जाते. ही नोंद झाली की काम झाले असे नाही. क्लिनिकल रिसर्चचे काम त्यानंतरही सुरुच राहते. या औषधाचा पाठपुरावा करणे, एखाद्या पेशंटवर दुष्परिणाम झाले नाहीत ना, औषधाचा प्रभाव आणि परिणात तोच आहे का, त्यात काही सुधारणा करता येईल का अशा विविध बाबींचा विचार पुढील काळात केला जातो. त्यातूनच या औषधाची गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्यात हातभारही लागतो. त्यामुळे क्लिनिकल रिसर्चही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे. औषधाच्या शोधापासून ते पेशंटच्या हातात पडेपर्यंतचा सर्वच प्रवास क्लिनिकल रिसर्चमध्य येतो. क्लिनिकल रिसर्च हे क्षेत्राला फारशी लोकप्रियता नसली तरी या क्षेत्रात प्रचंड घडामोडी घडत आहेत. त्यामुळेच येत्या काळात या क्षेत्रातील करिअर अत्यंत मौल्यवान ठरणारेच आहे.
शैक्षणिक पात्रता
क्लिनिकल रिसर्चमध्ये करिअर करण्यासाठी बॉटनी, झुऑलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक्स, बायोटेक या लाइफ सायन्सच्या शाखेतील कुठल्याही विषयात किमान ५० टक्के गुण मिळवून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे. काही कोर्सेससाठी केमिस्ट्री, फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्सेस, मेडिसीनमध्ये किमान ५० टक्के मिळवून पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक असते. तसेच नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशन किंवा संबंधित डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक असते.
कोर्सेस
- इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल रिसर्च इंडिया (कोर्स - एम.एस्सी. इन क्लिनिकल रिसर्च प्रोग्राम, कालावधी - दोन वर्षे, ठिकाणे - मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू)
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅडव्हान्स क्लिनिकल रिसर्च. (कालावधी - एक वर्ष)
- पार्ट टाइम कोर्सेस - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट, क्लिनिकल रिसर्च इन फार्माको विजिलन्स, क्लिनिकल ट्रायल मॅनेजमेंट, क्लिनिकल रिसर्च फॉर नर्सेस
- क्लिनिकल रिसर्च स्पेशलायझेशन इन बिझनेस डेव्हलपमेंट- क्वालिटी अॅश्युरन्स अँड ऑडिट
- क्लिनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स, कालावधी - एक वर्ष), (क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट, क्लिनिकल रिसर्च, अॅडव्हान्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च, कालावधी - एक वर्ष)
संधी
अॅनालिटिकल, बायो-अॅनालिटिकल, ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक या विषयात बी.एस्सी. किंवा एम.एस्सी. केल्यानंतर क्लिनिकल असोसिएट्स, क्लिनिकल रिसर्च ऑफिसर्स या हार्डकोअर क्षेत्रांव्यतिरिक्त बायोस्टॅटिस्टिशिअन, क्वालिटी अॅश्युरन्स अँड रेग्युलेटरी अॅस्पेक्ट्स, कॅरेक्टरायझेशन ऑफ ड्रग अशा क्लिनिकल रिसर्चशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल रिसर्च
भारतातील ही राष्ट्रीय स्तरावरील फिजिशिअन्सने स्थापन केलेली स्वतंत्र आणि स्वायत्त क्लिनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. ही संस्था प्रामुख्याने क्लिनिकल ट्रायल मॅनेजमेंटसाठी प्रसिद्ध आहे. या संस्थेची कॅलिफोर्निया सॅन बर्नार्डिगो आणि सॅन दिएगो या ठिकाणी केंद्रे आहेत. संस्थेची २५ मेडिकल ऑफिसेस असून आठ स्थानिक पातळीवरील हॉस्पिटल्ससह त्यांचे कामकाज चालते. संस्थेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार या हॉस्पिटल्सच्या अंतर्गत क्लिनिकल रिसर्च स्टडीज आणि बाहेरच्या स्टडीज हाताळण्याची संधी दिली जाते. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, मॅनेजिंग मल्टीथेरप्युटिक फार्मास्युटिकल आणि बायोटेक क्लिनिकल रिसर्च ट्रायलमध्ये स्पेशलायझेशन करण्याची संधी या संस्थेत आहे.
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा